आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.00
वाजता
****
जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेचा
म्होरक्या, मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावं, अशी मागणी अमेरिका,
फ्रान्स, ब्रिटननं संयुक्त राष्ट्र संघाकडे केली आहे. या मागणीचा नवा प्रस्ताव या तीनही
देशांनी, पंधरा देश सदस्य असलेल्या सुरक्षा परिषदेकडे सादर केला आहे. या प्रस्तावानुसार
मसूदवर प्रवासबंदी, शस्त्रबंदी लागू करून, त्याची संपूर्ण संपत्ती जप्त करावी, अशी
मागणी या देशांनी केली आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सैन्य
कारवाई टाळावी, असं आवाहन, अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाकडून करण्यात आलं आहे. ब्रिटनचे
परराष्ट्र मंत्रीही भारत पाकिस्तान सीमेवरचा तणाव कमी व्हावा, यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या
परराष्ट्र मंत्र्यांच्या संपर्कात आहेत.
****
राज्य विधीमंडळात आज आगामी आर्थिक वर्षाच्या अंतरिम
अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. दरम्यान, उद्या आणि परवा विधीमंडळात, राज्यातल्या दुष्काळी
परिस्थितीवर चर्चा होऊन, या अधिवेशनाची सांगता होणार आहे.
****
पंतप्रधान जन आरोग्य योजनेतंर्गत परभणी जिल्ह्यातल्या नागरीकांसाठी आयुष्यमान भारत या योजनेच्या कार्डाचं
वाटप काल जिल्हा सामान्य रुग्णालय इथं खासदार संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं.
दरम्यान येत्या शनिवारी २ मार्चला महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत
परभणी इथं, आरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ – सीबीएसईच्या परीक्षा
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असून, परीक्षार्थी तसंच पालकांनी अफवांवर विश्वास
ठेऊ नये, असं आवाहन मंडळानं केलं आहे. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून
सुरू झाल्या असून, तीन एप्रिलपर्यंत चालणार आहेत, तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून
सुरू झाल्या असून, त्या २९ मार्चपर्यंत चालणार आहेत.
****
सरकारनं कर्करोगावरच्या ४२ औषधांची किंमत नियंत्रणाखाली
आणली आहे. यामुळे या औषधांची किंमत ८५ टक्क्यांनी कमी झाली आहे. हे नवीन दर ८ मार्चपासून
लागू करण्यात येतील.
*****
***
No comments:
Post a Comment