Thursday, 21 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGAABAD 21.02.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ फेब्रुवारी २०१९ दुपारी .०० वा.

****



 राफेल विमान खरेदी प्रकरणी दाखल पुनर्विचार याचिकांवर विचार करणार असल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर झालेल्या सुनावणीत, संबंधित निर्णयाच्या पुनर्विचारासाठी, न्यायाधीशांचं पीठात बदल करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. न्यायालयासमोर चुकीची माहिती देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर खोटी माहिती दिेल्या प्रकरणी खटला चालवण्याची मागणीही करण्यात आली आहे. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी, आणि विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी, या याचिका दाखल केल्या आहेत. न्यायालयानं त्या, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात फेटाळल्या होत्या.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दक्षिण कोरियाची राजधानी सिओल इथं भारत कोरीया स्टार्ट अप हब ची सुरुवात केली. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांच्याशी पंतप्रधान आज विविध विषयांवर चर्चा करतील. सिओल मधल्या भारतीय नागरिकांशीही पंतप्रधान चर्चा करतील. या दौऱ्यात, पंतप्रधानांना आंतरराष्ट्रीय सिओल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****



 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आज साजरा होत आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी या दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात, विविध भाषा समृद्ध बनवण्यासाठी, नागरिकांनी आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे, असं म्हटलं आहे. भाषेचा घसरता स्तर, हा संस्कृतीला नुकसानकारक ठरू शकतो, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, मातृभाषा हेच योग्य माध्यम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

****



 भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं दिलेली मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करावी, अशी मागणी भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे केली आहे. जाधव यांच्या जबाबात मोडतोड करून, त्या आधारे पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं ही सजा सुनावल्याचं, परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव दीपक मित्तल यांनी, न्यायालयाला सांगितलं. हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरू असलेल्या या सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी मित्तल यांनी, जाधव यांची बाजू मांडत, त्यांची सुटका करून, भारतात सुरक्षितरित्या परत पाठवण्याची विनंती केली.



 हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपावरुन पाकिस्ताननं जाधव यांना अटक करून, एप्रिल २०१७ मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

****



 प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार बडजात्या यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. मुंबईतल्या सर हरकिसनदास रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. प्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे वडील असलेले राजकुमार बडजात्या यांनी, राजश्री प्रोडक्शन या आपल्या चित्रपट कंपनीच्या माध्यमातून, नदिया के पार, चितचोर, मैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है, विवाह, प्रेम रतन धन पायो, आदी अनेक प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली होती.

****



 पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात रांजणी जाधववाडी इथं, बोअरवेलच्या २०० फूट खोल खड्ड्यात पडलेल्या सहा वर्षांच्या बालकाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल - एनडीआरएफ च्या पथकानं १६ तास केलेल्या अथक प्रयत्नांमुळे, आज सकाळी नऊ वाजता या बालकाला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****



 रायगड जिल्ह्यातल्या आपटा तालुक्यात राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्यामुळे या भागात खळबळ उडाली. बसच्या वाहक आणि चालकाला या बसमध्ये एक संशयास्पद पिशवी आढळल्यानंतर, अलिबाग इथल्या बाँम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आलं. सदरील बाँम्ब निकामी करण्यात पोलिसांना यश आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या, मागण्यांबाबत सरकारनं दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप करत, शिक्षकांनी बारावी परीक्षेच्या संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पगार आणि अनुदानासह इतर मागण्या पूर्ण करण्यावर अंमलबजावणी होईपर्यंत, बारावी परीक्षेच्या कामकाजासह, उत्तरपत्रिका तपासण्यावरही बहिष्काराचा इशारा विना अनुदानित उच्च माध्यमिकशाळा कृती समितीने दिला आहे. 

****



         नवी दिल्ली इथं, येत्या २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या विश्वचषक स्‍पर्धेचे उदघाटन, आज क्रीडामंत्री कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या हस्ते होणार आहे. येत्या २०२० मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत समावेशासाठी, स्पर्धकांची या स्पर्धेतली कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.

*****

***

No comments: