आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२३ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.००
वाजता
****
भारताकडून आपल्या
सुरक्षेला धोका असल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री
महमूद कुरेशी यांनी, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला लिहिलेल्या पत्रात, पुलवामा
हल्ल्याबाबत कोणत्याही पुराव्याशिवाय भारत, पाकिस्तानला जबाबदार धरत असल्याचं म्हटलं
आहे.
सुरक्षा परिषदेनं
पुलवामा हल्ल्यासंदर्भात जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा स्पष्ट उल्लेख
करत, अशा संघटनांवर कारवाईची गरज व्यक्त केलर होती, या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं जैश
ए मोहम्मद संघटनेचं मुख्यालय ताब्यात घेतल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीर
लिबरेशन फ्रंटचा म्होरक्या यासीन मलिकला काल श्रीनगर इथल्या त्याच्या घरून अटक करण्यात
आली आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
मागील
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा सेवारत मतदारांमधे भरीव
वाढ झाल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. २०१४ च्या
लोकसभा निवडणुकी वेळी सेवारत मतदारांची संख्या १३ लाख २७ हजार होती तर आता ही संख्या जवळजवळ १६ लाख ६३ हजार झाली आहे. निवडणूक आयोगानं सेवारत
कर्मचाऱ्यांसाठी राबवलेल्या विशेष मतदार नोंदणीचं हे फलीत असल्याचं,
आयोगानं म्हटलं आहे.
****
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर
आज आणि उद्या असे दोन दिवस राज्यभरात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव
नोंदणीची सुविधा सुरू असून, १-९-५-० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. औरंगाबाद इथंही मतदारांनी
या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळवलं
आहे.
****
राष्ट्रीय आरोग्य अभियांनाअंतर्गत आज औरंगाबाद इथं
आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या खडकेश्वर इथल्या मैदानावर हा मेळावा
होत असून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि गरजूंवर औषधोपचार केले जाणार आहेत. मेळाव्यात
सहभागी होण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत गरजूंनी नोंदणी करावी असं आवाहन खासदार चंद्रकांत
खैरे यांनी केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment