आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.00
वाजता
****
परराष्ट्रमंत्री
सुषमा स्वराज आज सकाळी चीन दौऱ्यावर पोहोचल्या. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांची
त्यांनी आज भेट घेतली. या भेटीत त्यांनी पुलवामा इथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत हल्ल्याबाबत
चर्चा केली. हा हल्ला करणाऱ्या जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेला पाकिस्तानचा पूर्ण
पाठिंबा असल्याचं सांगत, संयुक्त संघानं या संघटनेवर बंदी घातली असूनही पाकिस्तान मात्र
काहीही कारवाई करत नसल्याचं स्वराज यांनी नमूद केलं. पाकिस्तानकडून सतत सुरू असलेल्या
कागाळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी भारतानं काल हवाई कारवाई केल्याचं, असं स्वराज यांनी
सांगितलं.
भारत पाकिस्तानदरम्यानची
सध्याची स्थिती जास्त चिघळू नये, अशी भारताची इच्छा असून, भारत याबाबतीत जबाबदारीनेच
वागणार असल्याचंही स्वराज यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान,
पाकिस्ताननं त्यांच्या भूमीवरून अतिरेकी कारवाया करणाऱ्या संघटनांवर कठोर कारवाई करावी,
असं अमेरिकेनं बजावलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोंपिओ यांनी पाकिस्तानचे
परराष्ट्रमंत्री शाह महेमूद कुरेशी यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना, कोणत्याही प्रकारच्या
सैनिकी कारवाईपासून दूर रहावं, असं सांगितलं.
भारताच्या
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना माईक यांनी, भारत आणि
अमेरिकेदरम्यानच्या संरक्षण सहकार्य तसंच शांती आणि सुरक्षा कायम ठेवण्याच्या, संयुक्त
उद्दिष्टावर जोर दिला.
****
राज्याचा
२०१९-२० या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर होत आहे. वित्तमंत्री
सुधीर मुनगंटीवार दुपारी दोन वाजता विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर विधान
परिषदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.
****
रायगड जिल्ह्यात
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेनं सर्वाधिक म्हणजे अट्ठावीस ग्रामपंचायतींवर
वर्चस्व मिळवत जिल्हयात आघाडी घेतली आहे. त्या खालोखाल शेतकरी कामगार पक्षानं एकवीस,
राष्ट्रवादी काँग्रेसनं तेरा, कॉग्रेसनं चार, भारतीय जनता पक्षानं तीन आणि अन्य आघाड्यांनी
दहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment