Thursday, 21 February 2019

Tex-AIR News Bulletin Aurangabad 21.02.2019....Evining Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 February 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी घेण्यात आलेल्या एलगार परिषदेसंदर्भात पुणे पोलिसांनी कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांच्यासह पाच जणांविरोधात, आज विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. या परिषदेत झालेल्या भाषणांमुळे, एक जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा इथं हिंसाचार उसळल्याचं पोलिसांनी सांगितलं. यासंदर्भात, आरोपींकडून हस्तगत इलेक्ट्रॉनिक उपकरणातून मिळालेले पुरावे, न्यायालयाला सादर केल्याचं, पुण्याचे सह पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितलं.

****

जलयुक्त शिवार ही कंत्राटदारांची पैसे खाण्याची योजना असून, या योजनेमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याची टीका, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ एच एम देसरडा यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ही पर्यावरणाला मारक योजना असून, निसर्गानेच ही बाब स्पष्ट केल्याचं, त्यांनी सांगितलं. दुष्काळ हा निसर्गचक्राचा एक भाग असल्याचं सांगतानाच, देसरडा यांनी, राज्यातल्या दुष्काळाला, अपुऱ्या पावसासोबतच, सार्वजनिक धोरणाचं अपयश आणि जल स्रोतांच्या नियोजनाचा अभाव ही कारणंही जबाबदार असल्याचं सांगितलं.

****

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान महासभेचा महामोर्चा, नाशिकहून आज मुंबईकडे निघाला. दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, महाराष्ट्राचं पाणी गुजरातकडे जावू देऊ नका, आदी प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहे.

****

नाशिक जिल्ह्यात लासलगांव बाजार समितीत कांद्याच्या दरात क्विंटलमागे नव्वद रूपयांची घसरण झाली. बाजार समितीत आज कांद्याची या हंगामातली विक्रमी ४० हजार ९७६ क्विंटल आवक झाली. यावेळी कांद्याचा सरासरी भाव ४०० रूपये प्रतिक्विंटल होता. भाव घसरल्याने कांदा उत्पादकांमध्ये नाराजी दिसून आली. गेल्या चार वर्षात लागवडीमध्ये दुपटीने वाढ झाल्यानं, उत्पादन वाढल्यामुळे कांद्याचे दर घसरल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रमामधून प्रशिक्षण घेतलेल्या सहा जिल्ह्यांतल्या शेतकऱ्यांनी, ७९ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे ठराव संमत केले आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातून सर्वाधिक ३६ ठराव करण्यात आले आहेत. त्या खालोखाल नांदेड जिल्ह्यातून बारा, वर्धा-१०, नागपूर- नऊ, बीड-आठ आणि चंद्रपूर जिल्ह्यातून चार ठराव झाले आहेत.

****

ज्येष्ठ लेखक, संपादक आणि गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त, श्रीधर माडगूळकर यांचं आज दुपारी पुण्यातल्या, एका खाजगी रूग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. माडगुळकर यांच्या निधनानं साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. माडगुळकरांचं जिप्सी हे मासिक, 'आठी आठी चौसष्ट' ही कादंबरी तसंच “मंतरलेल्या आठवणी” हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

****

राज्य हिंदी साहित्य अकादमीचे सन २०१७-१८ या वर्षासाठीचे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. 'महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार' प्राध्यापक रंगनाथ तिवारी तसंच ‘डॉ. राममनोहर त्रिपाठी अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार’ रामेश्वरनाथ मिश्र 'अनुरोध' यांना जाहीर झाला आहे. या दोन अखिल भारतीय जीवनगौरव पुरस्कारांसह, आठ राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार, तसंच २० विधा पुरस्कार असे एकूण ३० पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

****

राज्य सरकारनं, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्ष असेल, या फेरनियुक्तीबद्दल रहाटकर यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.

****

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. २०१२ पासून २०१८ पर्यंतचे हे पुरस्कार अनुक्रमे भारती आपटे, विमल साळवे, मंगल खिंवसरा, अंजली रावते वाघमारे, डॉक्टर गीता लाटकर, आणि आस्मा निखत यांना जाहीर झाले आहेत. परवा शनिवारी २३ फेब्रुवारीला, नांदेड इथं कुसुम नाट्यगृहात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पाच हजार रुपये, आणि मानपत्र, असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****


No comments: