Thursday, 28 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.02.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ दुपारी .०० वा.

****



 राज्य विधानसभेनं आगामी आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर केला. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांनी आपली लेखी भाषणं पटलावर ठेवणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर आवाजी मतदानानं अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. नियंत्रक आणि महालेखापाल - कॅग तसंच लोकलेखा समितीचा अहवालही सदनाच्या पटलावर ठेवण्यात आला.



 विधान परिषदेतही अर्थसंकल्प आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. ज्या सदस्यांना, अर्थसंकल्प, दुष्काळी उपाययोजना, तसंच इतर विषयांवर सूचना मांडायच्या असतील, त्यांनी त्या लेखी स्वरुपात पटलावर ठेवाव्यात, असं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी, सांगितलं. 



 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ज्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी, तालुकास्तरावर छाननी करण्यात येत आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली.



 शिक्षक आणि इतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी  गेल्या चार दिवसांपासून मुंबईत आंदोलन करत आहेत, त्यांच्याशी सरकारनं चर्चा करावी, अशी मागणी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी यावेळी केली.



****



 भारत आणि पाकिस्तानात सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं समझौता एक्सप्रेसच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. दर सोमवारी आणि गुरुवारी लाहोरहून निघणारी ही रेल्वे, आज सकाळी लाहोरहून अटारीकडे निघाली नाही.



 दरम्यान, काश्मीरच्या पूंछ भागात आजही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सीमेपलिकडून उखळी तोफांचा मारा तसंच गोळीबार करण्यात आला. भारतीय सैन्यानंही या हल्ल्याला चोख उत्तर दिलं.

****



 ज्या आयकर दात्यांनी, आपल्या बँक खात्याशी त्यांचा कायम खाते क्रमांक - पॅन संलग्न केलेला असेल, अशाच आयकर दात्यांच्या बँक खात्यात कर परतावा जमा होईल, असं आयकर विभागानं सांगितलं आहे. ज्या करदात्यांनी आपला कायम खाते क्रमांक अद्याप बँक खात्याशी जोडून घेतलेला नाही, त्यांनी तत्काळ तो संलंग्न करून घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****



 मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू झाला आहे. राज्य सरकार तर्फे ज्येष्ठ अधिवक्ते मुकुल रोहोतगी आणि व्ही ए थोरात यांनी सरकारची बाजू मांडताना, एखाद्या समाजाला मागास म्हणून जाहीर करण्याचा आणि त्याला आरक्षण देण्याचा अधिकार राज्यघटनेनं राज्य सरकारांना दिला आहे, याकडे लक्ष वेधलं. विधीमंडळाने मराठा समाजाला, सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थामधे १६ टक्के आरक्षण देण्याचा ठराव गेल्या वर्षी ३० नोव्हेंबरला जारी केला, यामुळे राज्यात आरक्षणानं ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून, एकूण आरक्षणाचं प्रमाण ६८ टक्क्यांवर पोहोचलं असल्याचं, या याचिकेत म्हटलं आहे.

****



 आज राष्ट्रीय विज्ञान दिन. ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी व्ही रमन यांनी भौतिक शास्त्रात केलेल्या, रमन इफेक्ट या प्रभावी संशोधानाच्या स्मरणार्थ हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी रमण यांना श्रद्धांजली अर्पण करत, विज्ञान आणि संशोधनाचा उपयोग मानवी जीवनमान सुधारण्यासाठी केला गेला पाहिजे आणि प्रयोगशाळेपासून शेतीपर्यंत या विषयावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं ट्वीटरच्या संदेशात म्हटलं आहे. 

 दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथे, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करणार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान  विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी, तरूण शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना देण्यात येणारे हे सर्वात प्रसिद्ध पुरस्कार आहेत. २०१६, २०१७ आणि २०१८ या तीन वर्षांसाठीचे पुरस्कार पंतप्रधान आज प्रदान करतील. पाच लाख रूपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्कारचं स्वरूप आहे

****



 नांदेड जिल्ह्यातले १६ तालुके, ६५ प्राथामिक आरोग्य केंद्र आणि १६ ग्रामीण रूग्णालयांमध्ये कर्करोग जनजागृती आणि नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झालं. आठ तालुक्यांमध्ये कर्करोगाचे विविध ३० रूग्ण आढळून आले. त्यांच्यावर शासकीय दवाखान्यात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

*****

*** 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...