Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 February
2019
Time 6.00 to 6.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ फेब्रुवारी
२०१९ सायंकाळी ६.०० वा.
****
राष्ट्राची
सुरक्षा प्रथम कर्तव्य असून, देश सुरक्षित हातात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. ते आज राजस्थानात चुरू इथं, जाहीर सभेत बोलत होते. वायूदलानं आज पहाटे
केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईच्या पार्श्वभूमीवर ते नागरिकांशी बोलत होते. भारतातल्या
स्थिर सरकारच्या बळाची आज जगाला पुन्हा एकदा जाणीव झाली, असं पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांच्या
हस्ते आज नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत- इस्कॉन या संस्थेच्या मंदिरात
जगातल्या सर्वात मोठ्या आकाराच्या श्रीमद् भगवत गीतेचं लोकार्पण करण्यात आलं.
दरम्यान
भारताने आज सकाळी केलेली कारवाई ही, संभाव्य आत्मघातकी हल्ले रोखण्यासाठी केलेली प्रतिबंधात्मक
कारवाई असल्याचं, परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. सर्व प्रमुख देशांच्या राजदूतांना
पाठवलेल्या पत्रात, मंत्रालयानं ही बाब नमूद केली आहे.
दुसरीकडे,
पाकिस्ताननं मात्र, आजच्या या कारवाईबाबत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे तक्रार
करणार असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब प्रांतातल्या भारत पाकिस्तान सीमेलगतच्या
अमृतसर, गुरदासपूर, पठाणकोट, आदी सहा जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
****
भारतीय
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था -डीआरडीओ नं आज जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची
यशस्वी चाचणी केली. ओडीशाच्या चांदीपूर किनाऱ्यावर ही चाचणी करण्यात आली. संरक्षणमंत्री
निर्मला सीतारामन यांनी या यशाबद्दल डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.
****
वायूदलाच्या
विमानांनी आज पहाटे पाकिस्तानात केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईबद्दल आज उस्मानाबाद जिल्ह्यात
ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. उस्मानाबाद, उमरगा, आदी ठिकाणी साखर वाटण्यात आली, तर
लोहाऱ्यात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.
परभणी
शहर तसंच जिल्ह्यातही नागरिकांनी फटाके फोडून या कारवाईबद्दल आनंद व्यक्त केला.
औरंगाबाद
इथंही गुलमंडी परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला.
****
राज्याचा
सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प उद्या २७ फेब्रुवारीला विधीमंडळात
सादर होणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार दुपारी दोन वाजता विधानसभेत तर वित्त
राज्यमंत्री विधान परिषदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.
मुद्रांक
शुल्क सुधारणा विधेयक आज विधानसभेत संमत झालं. मुद्रांक शुल्कावरची शास्ती कमी करण्याचा
प्रस्ताव या विधेयकात आहे. माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी यावर बोलताना, निवडणुका
डोळ्यासमोर ठेवून, कर कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका केली. सर्वसामन्यांनी
मालमत्ता खरेदी व्यवहार कमी केल्यामुळे मुद्रांक शुल्काद्वारे मिळणारा महसूल कमी झाल्याचं
पाटील यांनी नमूद केलं.
शेतजमीन
धारणा कमाल मर्यादा सुधारणा विधेयकावर सध्या विधानसभेत चर्चा सुरू आहे.
पुण्यात
आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर तरुणांवर लाठीमार प्रकरणाची चौकशी करून, दोषींवर कठोर कारवाई
करण्यात येईल, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितलं. विरोधी
पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
****
पंजाब
नॅशनल बँकेत सुमारे तेरा हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केलेला उद्योजक नीरव मोदी याची
सुमारे एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसूली संचालनालयानं जप्त केली आहे.
यामध्ये मुंबई आणि सुरत इथल्या, काही इमारती, आठ कार, दागदागिने, काही यंत्रसामुग्री
तसंच महागडी चित्रं, अशा चल- अचल संपत्तीचा समावेश आहे. नीरव मोदीची आतापर्यंत सुमारे
एक हजार सातशे पंचवीस कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
****
भूमीहीन
शेतमजूरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज देशव्यापी धरणे आंदोलन केलं. लालबावटा शेतमजूर
संघटना तसंच भारतीय खेत मजदूर संघटनेच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाचा भाग म्हणून,
औरंगाबाद इथंही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. रोजगार हमी मजूरांना
५०० रुपये दैनिक वेतन, व्याजासह वेतन थकबाकी,
दरमहा दोन रूपये किलो दराने ३५ किलो धान्य, दादासाहेब गायकवाड भूमिहीन योजनेचा लाभ,
या सह इतर मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.
****
स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरकर यांच्या चौपन्नाव्या आत्मसमर्पण दिनानिमित्त राज्यात आज त्यांना
आदरांजली वाहण्यात आली. रत्नागिरीत, ब्रिटिशांनी सावरकरांना ज्या विशेष कारागृहात ठेवलं
होतं, ती कोठडी वारसा म्हणून जतन करण्यात आली आहे. आता त्या वास्तूचं सावरकर स्मृती
वास्तू म्हणून रूपांतर करण्यात आलं आहे.
****
याबरोबरच
हे बातमीपत्र संपलं, आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी
No comments:
Post a Comment