Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 21 February 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१
फेब्रुवारी २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø जलसंधारण विभागाच्या
यंत्रणेमध्ये सुसूत्रीकरण करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
Ø काँग्रेस - राष्ट्रवादी
कांग्रेस महाआघाडीचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू; देशात दुबळं नेतृत्त्व उदयाला
आल्याचा शरद पवार यांचा आरोप
Ø सातव्या वेतन
आयोगाच्या वेतन निश्चितीबाबतचे स्पष्टीकरण देणारा अध्यादेश जारी
Ø १२ वीच्या परिक्षांना
आजपासून प्रारंभ
आणि
Ø जालना, बीड आणि
वाशिम जिल्ह्यात गारांचा पाऊस
****
राज्यातल्या जलसंधारण विभागाच्या यंत्रणेमध्ये सुसूत्रीकरण
करण्याच्या निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार
मृद आणि जलसंधारण विभागातल्या काही कार्यालयाचं पुनरूज्जीवन केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे
काही नवीन कार्यालयं निर्माण केले जातील तर काही अनावश्यक कार्यालय बंदही केली जाणार
आहेत. यामुळे या विभागाच्या वार्षिक खर्चात १ कोटी ३७ लाख रूपयांची बचत होणार आहे.
व्यक्ती, संस्था अथवा कंपनी यांना कब्जे हक्कानं
अथवा भाडेपट्ट्यानं दिलेल्या शासकीय जमिनीवर करण्यात आलेल्या बांधकामास मुदतवाढ देण्याबाबत
नवे धोरणात्मक निर्देश लागू करण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
यानुसार आता मुदतवाढीच्या अनुषंगानं आकारण्यात येणाऱ्या अधिमूल्यामध्येही कपात करण्यात
आली आहे.
वस्तु आणि सेवा कर अधिनियमानुसार मुदतीनंतर तीस दिवसांच्या
आत विवरणपत्र दाखल करणाऱ्या नियोक्त्यास एक हजार रूपयांऐवजी दोनशे रुपये विलंब शुल्क
आकारण्यात येणार आहे. तसंच वजावट नाकारलेल्या व्यापाऱ्यास आता चूक दुरुस्तीसाठी निर्धारण
अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करता येणार आहे. अशा सुविधांसाठी यासंदर्भातल्या अधिनियमात
सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
विक्रीकर विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध
कायद्यांखालील थकित आणि विवादित कर, व्याज, दंड तसंच विलंब शुल्क यांच्या तडजोडीसाठी
अभय योजना राबवण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. त्यानुसार राज्य विधिमंडळाच्या आगामी
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळासमोर विधेयक मांडण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित
पदोन्नती परीक्षेच्या अंतिम निकालामध्ये, गुणवत्ताधारक पात्र खुल्या
प्रवर्गातल्या ९८२ उमेदवारांचा समावेश करायला मंजुरी दिली आहे.
****
देशात दुबळं नेतृत्त्व उदयाला आल्यापासून पाकिस्तानकडून
होणाऱ्या हल्ल्याचं प्रमाण वाढलं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
शरद पवार यांनी केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस - राष्ट्रवादी
कांग्रेस महाआघाडीची पहिली प्रचार सभा काल नांदेड इथं झाली, त्यावेळी ते बोलत होते.
नोटबंदी, जीएसटी, सीमा सुरक्षा, शेतकरी कर्जमाफी, शेती मालाला भाव देणे या सर्वच स्तरावर
केंद्र सरकार अपयशी ठरलं असल्याचं पवार म्हणाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव
चव्हाण, छगन भुजबळ, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे
जोगेंद्र कवाडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीही भाषणं झाली.
पवार यांच्या हस्ते सहकार महर्षी पद्मश्री शामराव
कदम यांच्या अर्धाकृती पुतळ्याचही नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परिसरात काल
अनावरण करण्यात आलं.
****
सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीबाबतचे स्पष्टीकरण
देणारा अध्यादेश काल राज्य शासनानं जारी केला. या अध्यादेशामुळे आता राज्य सरकारच्या
कर्मचाऱ्यांचा वेतन निश्चितीचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी चालू महिन्याचे वेतन
सातव्या वेतन आयोगाप्रमाणे करता येणार आहे. पूर्वलक्षी प्रभावानं १ जानेवारी २०१६ पासून
या शिफारशी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आल्या आहेत, मात्र प्रत्यक्षात जानेवारी २०१९
पासून कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाणार आहे. गेल्या तीन वर्षाच्या वेतनाची थकबाकी समान
पाच वार्षिक हप्त्यात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केली जाणार
आहे.
****
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भारतीय जनता पक्ष आणि
शिवसेना युतीच्या जागा वाटपाबाबत मित्र पक्ष रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियानं नाराजी व्यक्त
केली आहे. रिपाई अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याबाबत एक पत्रक
जारी केले. त्यात ही नाराजी व्यक्त करण्यात आली. लोकसभेची निवडणूक दक्षिण- मध्य मुंबई
लोकसभा मतदार संघातून लढवण्याची आपली इच्छा होती. युतीसाठी आपण प्रथमपासून प्रयत्न
केले, मात्र, भाजपा आणि शिवसेनेनं रिपाईला
एकही जागा दिली नाही, अशी खंत आठवले यांनी
व्यक्त केली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळाच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या १२ वीच्या परिक्षांना आजपासून प्रारंभ होत
आहे. राज्यातले एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी ही परिक्षा देत आहेत. नऊ विभागीय केंद्रांच्या माध्यमातून ही परिक्षा
घेतली जात आहे.
****
वन हक्क दावे निकाली काढावेत, शेतकऱ्यांना संपूर्ण
कर्जमाफी मिळावी या तसंच अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने नाशिक ते मंत्रालय
असा पायी लॉंग मार्च आज नाशिकहून मुंबईकडे रवाना होणार आहे. दरम्यान, राज्याचे जलसंपदा
मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ
अशोक ढवळे, अजित नवले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नाशिक जिल्ह्यातले आमदार जीवा
पांडू गावित यांच्याशी दीड तास चर्चा करून आंदोलन थांबवावे अशी मागणी केली. मात्र जोपर्यंत
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लेखी हमीपत्र देणार नाही, तोपर्यंत लॉंग मार्च
सुरूच राहणार असल्याचं किसान सभेनं सांगितलं.
****
बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांच्या नावे कर्ज
प्रकरणात औरंगाबाद इथल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं गंगाखेड शुगर मिलचे मुख्य
मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार शर्मा, ऊस पुरवठा अधिकारी तुळशीदास अंभोरे आणि ऊस विकास
अधिकारी बच्चूसिंग महादु पडवळ अशा तिघांना काल सकाळी अटक केली. राज्यभर गाजलेल्या गंगाखेड
शुगर मिल शेतकरी कर्ज प्रकरणाचा तपास औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या जाफ्राबाद, घनसावंगी आणि भोकरदन,
तालुक्यासह बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातल्या काही भागात काल रात्री वादळी वाऱ्यासह
गारांचा पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातही काल मध्यरात्री वादळी वाऱ्यासह
जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आंब्याचा
मोहरही गळून पडला असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
लातूर शहरामधले जुने देवस्थान श्री रामलिंगेश्वर
मंदिरासाठी राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत १ कोटी ५५ लाख रुपयांचा
निधी देण्यास शासनानं प्रशासकीय मान्यता दिली आहे. लातूरचे उपमहापौर देविदास काळे यांनी
काल ही माहिती दिली. यासोबतच सुरत शहावली दर्ग्यासाठीही ५० लाख रुपयांचा निधी मंजूर
झाला असून त्यापैकी २० लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचंही
ते म्हणाले.
****
राज्य सरकारनं प्रशासकीय सेवेतल्या काही अधिकाऱ्यांच्या
काल बदल्या केल्या. यामध्ये यामध्ये बीडच्या जिल्हाधिकारीपदी आस्तीककुमार पांडे यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. लातूरचे महापालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली
पुण्याला भूजल सर्वेक्षण विकास विभागात करण्यात आली आहे.
****
उन्हाळ्यातली
संभाव्य चारा टंचाई लक्षात घेत परभणी महानगरपालिकेनं वैरण बियाणं आणि खतं वितरण योजना
राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी योजना आणणारी ही राज्यातली पहिली महापालिका आहे.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात मनपा हद्दीतल्या दोनशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांना काल परभणीच्या
महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या हस्ते बियाणे आणि खताचं वाटप करण्यात आलं. उर्वरित
शेतकऱ्यांनाही पुढच्या आठवड्यात हे वाटप होणार आहे.
****
नाशिक इथल्या सार्वजनिक वाचनालयाच्यावतीनं
देण्यात येणारा यंदाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार राष्टवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय
मुंडे यांना घोषित करण्यात आला आहे. ४ मार्च रोजी पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री
शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे.
****
उस्मानाबाद इथल्या आनंदनगर पोलीस ठाण्यातला पोलीस
शिपाई दत्ता जाधव याला एक हजार पाचशे रूपयांची लाच घेतांना काल अटक करण्यात आली. ॲक्टीवा
स्कुटी गाडी सोडवण्यासाठी त्यानं लाचेची मागणी केली होती.
*****
***
No comments:
Post a Comment