Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28
February 2019
Time 6.00 to 6.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी
२०१९ सायंकाळी
६.०० वा.
****
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वैमानिक अभिनंदन
वर्तमान यांना उद्या मुक्त करणार असल्याचं, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी
जाहीर केलं आहे. पाकिस्तान संसदेच्या संयुक्त सत्रात इम्रान खान यांनी आज ही घोषणा
केली, दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी
सांगितलं.
काल सकाळी पाकिस्ताननं काश्मीरमध्ये केलेला हवाई
हल्ला परतवून लावताना, अभिनंदन यांचं मिग विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकव्याप्त काश्मीरमध्ये
कोसळलं, त्यानंतर पाकिस्तानी सैन्यानं त्यांना ताब्यात घेऊन, त्यांची दृश्यफीत जारी
केली होती. भारतानं यावर कठोर शब्दांत आक्षेप घेत, अभिनंदन यांना तत्काळ बिनशर्त, सुरक्षित,
भारतात परत पाठवण्यास सांगितलं होतं.
अभिनंदन यांना पकडून त्यांची चौकशी करत असल्याच्या,
पाकिस्तानातून इंटरनेटवर टाकल्या गेलेल्या दृश्यफीती, हटवण्याचे निर्देश, केंद्रीय
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं, यू ट्यूब ला दिले आहेत.
****
औषधनिर्माण आणि जैव तंत्रज्ञान या विभागांना चालना
देण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आज विज्ञान दिनानिमित्त
नवी दिल्लीत, शांतीस्वरुप भटनागर पुरस्कार पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले,
२०१६, १७ आणि १८ या तीन वर्षांसाठीचे पुरस्कार पंतप्रधानांनी प्रदान केले. पाच लाख
रूपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्कारचं स्वरूप आहे.
****
२०१८-१९ या पीक वर्षांत देशात अन्नधान्याचं विक्रमी
२८१ पूर्णांक ३७ शतांश दशलक्ष टन एवढं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानंही
माहिती दिली. गेल्या पीक वर्षापेक्षा हे उत्पादन तीन पूर्णांक ८९ शतांश टनांपेक्षा
अधिक आहे. यामध्ये भाताचं उत्पादन ११५ दशलक्ष टन, गहू ९९ दशलक्ष टन तर कडधान्यांचं
उत्पादन २४ दशलक्ष टनांपर्यंत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
****
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संस्थगित
झालं. हे अधिवेशन शनिवारपर्यंत चालणार होतं, मात्र भारत आणि पाकिस्तान सीमेवर वाढता
तणाव पाहता, सुरक्षा यंत्रणांवरचा तणाव कमी करण्यासाठी, अधिवेशन दोन दिवस लवकर संपवण्याचा
प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी विधानसभेत मांडला, त्याला सर्व पक्षांनी
पाठिंबा दिला. महाराष्ट्र हा देशाच्या सैन्यदलाच्या मागे ठामपणे उभा आहे, असं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले.
त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी,
अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित होत असल्याची घोषणा केली. चार बैठका झालेल्या या अधिवेशनात,
तेरा तास वीस मिनिटं कामकाज झालं, या दरम्यान, अंतरिम अर्थसंकल्पासह पाच विधेयकं संमत
करण्यात आली.
विधान परिषदेतही मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन लवकर
संस्थगित करण्यामागची भूमिका मांडली, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह सर्व विरोधी
पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. त्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी, सदनाचं
कामकाज संस्थगित करत असल्याचं जाहीर केलं.
****
इयत्ता दहावीच्या परीक्षेला उद्या १ मार्चपासून
सुरुवात होत आहे. या परीक्षेला औरंगाबाद विभागातून औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली
या पाच जिल्ह्यांतून एक लाख ८६ हजार ६६ परीक्षार्थ्यांनी आवेदनपत्र भरले आहेत. २२ मार्चपर्यंत
या परीक्षा चालणार आहेत.
****
धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यात
बंद पडलेल्या पांझरा कान साखर कारखान्यात आज दुपारी मोठी आग लागली. कारखान्याच्या रिकाम्या
चाळीमध्ये ही आग लागल्याने, कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु इमारतीचं मोठं नुकसान
झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. साक्री इथून पाण्याचे बंब मागवून ही आग विझवण्यात
आली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या कंधार शहरात, राज्य वीज पारेषण
मंडळाच्या ३३ किलो व्हॅट क्षमतेच्या वीज उपकेंद्राला आज दुपारी आग लागली. या दुर्घटनेत
या केंद्राचं मोठं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे
****
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी परभणी
जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांची यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून
देण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या ८३५ गावांत चार लाख ४८ हजार २०१ शेतकरी असून, यापैकी,
एक लाख ७७ हजार ७८० शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत, यापैकी ९४ टक्के म्हणजेच एक लाख
६७ हजार १९६ शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर
देण्यात आली आहे. संबंधित पात्र शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत मदतीचा पहिला हप्ता प्रत्येकी
दोन हजार रुपये जमा झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
No comments:
Post a Comment