Tuesday, 26 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.02.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२६ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.00 वाजता

****



 भारतीय वायूसेनेनं, पाकिस्तान मधल्या दहशतवादी तळांवर, आज पहाटेच्या सुमारास लक्ष्यभेदी कारवाई केल्याचं वृत्त, पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. पाकिस्तानच्या, खैबर पखतुनवा प्रांतात, बालाकोट इथले, जैश ए मोहम्म्द या दहशतवादी संघटनेचे तळ, वायूसेनेनं उध्वस्त केल्याचं वृत्त आहे. पुलावामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, वायूसेनेनं ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे.



 पाकिस्तानच्या सुरक्षा विभागानंही ट्वीट करून, भारतीय वायूसेनेच्या विमानांनी नियंत्रण रेषेचा भंग केल्याचं म्हटलं आहे.



 वायूसेनेच्या या कामगिरीबद्दल, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अभिनंदन केलं आहे.



 काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी, तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही, वायूसेनेचं  अभिनंदन केलं आहे. वायूसेनेच्या वैमानिकांना आपण सलाम करतो, या आशयाचं ट्वीट गांधी यांनी केलं आहे. काँग्रेस पक्षानंही यासंदर्भात ट्वीट करून, भारताच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या, वायूसेनेचं कौतुक असल्याचं म्हटलं आहे.



 दरम्यान, पंतप्रधानांच्या निवासस्थानी, सध्या मंत्रिमंडळाच्या संरक्षण विषयक समितीची बैठक सुरू असून, वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं साडे अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार आहे.



 दुसरीकडे काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेत्यांच्या घरांवर राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा - एनआयए नं छापे घातले आहेत. आज सकाळपासून नऊ जणांच्या घरांवर एनआयएनं धाडी टाकल्याचं वृत्त आहे. दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्याच्या आरोपवरून ही कारवाई केली जात आहे.

****



 नवी दिल्लीत इंडिया गेटजवळ उभारण्यात आलेलं राष्ट्रीय युद्ध स्मारक काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला अर्पण केलं. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या सन्मानासाठी हे स्मारक निर्माण करण्यात आलं आहे.

****



 येत्या तीन आणि चार मार्चला हिंगोली इथे आयोजित विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत, समीक्षक डॉ.प्रल्हाद लुलेकर यांची निवड करण्यात आली आहे. राधिका वेमुला या संमेलनाच्या उद्घाटक आहेत. संमेलनाचं हे चौदावं वर्ष आहे.

*****

***

No comments: