Sunday, 24 February 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 24.02.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 February 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं बोलावलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा निवडणुकीपूर्वीचा अंतरिम अर्थसंकल्प असल्यानं, या अर्थसंकल्पात कोणत्याही लोकप्रिय घोषणा किंवा धोरणात्मक निर्णयाचा समावेश नसेल, अशी अपेक्षा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली. मंत्रिमंडळातल्या अकरा मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप असून, शेतकरी कर्जमाफी आणि जलसंधारणाच्या कामांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक होत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी यावेळी केला.

****

कुंभमेळ्याची ओळख यंदा स्वच्छ कुंभमेळा अशी निर्माण झाली असून, स्वच्छ कुंभ हा संकल्प पूर्ण करण्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. त्रिवेणी संगमावर स्नान आणि पूजन करण्यासाठी ते आज प्रयागराज इथं आले होते. गंगापूजनानंतर त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पायही धुतले.

****

जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं आज पोलिस आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाला, तर एका पोलिस उपअधीक्षकांना वीरमरण आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. कुलगाम जिल्यात तुरीगाम भागांत शोधमोहिम सुरू असताना हा प्रकार घडला.

****

वस्तू आणि सेवाकर परिषदेनं आज झालेल्या बैठकीत निर्माणाधीन घरांवरील करमर्यादा बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणली आहे. तर परवडणाऱ्या घरांसाठी केवळ एक टक्का कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****

निवडणूक आयोगानं मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रमात सुमारे ५० लाख मतदारांची नावं महाराष्ट्राच्या मतदार यादीतून वगळली आहेत. यापैकी बरीच नावं यादीमध्ये दोनदा आली होती, तर काही व्यक्ती मृत झाल्या होत्या. आता महाराष्ट्रात एकूण आठ कोटी ७३ लाख मतदारांपैकी चार कोटी ५७ लाख पुरुष, तर चार कोटी १६ लाख स्त्री मतदार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.

****

येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही मोठ्या पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही, असा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे. संघटनांचे समन्वयक संजीव भोर पाटील यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, छोट्या पक्षांचे उमेदवार किंवा स्वतंत्र उमेदवारांना मराठा संघटनांचा पाठिंबा असेल. भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, या पक्षांना मराठा संघटना पाठिंबा देणार नसल्याचं, पाटील यांनी स्पष्ट केलं.

****

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनानं सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, असा विश्वास परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी आज व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथं झालेल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण जिल्हा नियोजन भवनात करण्यात आलं होतं. यावेळी मौजे तामसवाडी येथील पात्र १० लाभार्थींचा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार केला.

****

दरम्यान, बीड जिल्हाधिकारी कार्यालयातही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी विविध तालुक्यांतून आलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान केला. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरीही या योजनेचे लाभार्थी ठरले.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक अशी अत्यावश्यक माहिती बिनचूक उपलब्ध करुन देण्याचं आवाहनही करण्यात आलं.

****

बालकं आणि किशोरवयीन मुला मुलींमध्ये, तसंच गर्भवती आणि स्तनदा मातांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या रक्तक्षयावर मात करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ॲनिमिया मुक्त भारत अभियान विकसित करण्याचा निर्णय घेतल्याचं परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितलं. लाभार्थींना प्रतिबंधात्मक लोह व फॉलिक ॲसिड औषधी पुरवठा करण्याकरिता विविध स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

****

भारताचा १६ वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीनं आज आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. १० मीटर एअर पिस्टल पुरुष गटात त्यानं २४५ गुणांच्या विश्व विक्रमासह २०२० मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचं तिकीटही जिंकले.

****

No comments: