Sunday, 24 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.02.2019 07.10AM

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 February 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ सकाळी ७.१० मि.
****

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
 बेरोजगारीच्या मुद्यावरून राहुल गांधी यांची सरकारवर टीका; तर दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडल्याचा शरद पवार यांचा आरोप
 विमान वाहतुक सेवा कंपन्यांना सुरक्षा नियमांच्या चोख पालनाचे निर्देश
 राज्य सरकारकडून तृतीयपंथीय विकास मंडळाची स्थापना
आणि
 विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अपूर्वी चंदेलाचा सुवर्णवेध
****

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. उत्तरप्रदेशात गोरखपूर इथं, पंतप्रधान या योजनेचा प्रारंभ करतील. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यात सहा हजार रुपये मिळणार आहेत.
सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातल्या जिल्हा नियोजन भवनात तर तालुकास्तरावर तालुका मुख्यालयात आज सकाळी साडे दहा ते अकरा या वेळेत, शेतकऱ्यांना या योजनेची माहिती दिली जाणार आहे. आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या ५३ व्या भागातून पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधतील, त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते या किसान सन्मान निधी योजनेच्या उद्घाटन समारंभाचं, थेट प्रसारण होणार आहे. 
दरम्यान, पंतप्रधानांनी काल देशाची अर्थव्यवस्था, तीन लाख कोटी डॉलर एवढी म्हणजेच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठीची रुपरेषा मांडली. नवी दिल्लीत आयोजित जगातिक व्यापार शिखर परिषदेत ते बोलत होते. यासाठी देशामध्ये अनेक स्टार्ट-अप सुरू करण्याचा मानस असून त्याद्वारे देशाला सर्वात आघाडीवर घेऊन जाणं शक्य असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****

देशात बेरोजगारी ही गंभीर समस्या असल्याचं मान्य करण्यास, मोदी सरकार तयार नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. ते काल नवी दिल्लीत, विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी 'शिक्षण - दशा आणि दिशा' या विषयावर बोलत होते. पंतप्रधानांनी रोजगाराच्या संधींबाबत तरुणांशी बोलायला हवं, असं गांधी यांनी यावेळी नमूद केलं. देशातली संपत्ती मूठभर लोकांच्या हातात बंद असल्याचं ते म्हणाले. राफेल, भ्रष्टाचार, रोजगार आणि इतर विषयांवर पंतप्रधानांना चर्चेचं आव्हान दिलं असल्याचं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.
****
दुष्काळात होरपळत असलेले शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला सरकारनं वाऱ्यावर सोडलं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेची काल बीड जिल्ह्यात परळी इथं सांगता झाली, यावेळी झालेल्या महाआघाडीच्या संयुक्त सभेत पवार बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जनतेच्या व्यथा ऐकायलाही तयार नसलेल्या या सरकारने, अद्यापही कर्ज माफी केली नसल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.
****

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचा विजय निश्चित करा, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. काल मुंबईत पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. भारतीय जनता पक्षासोबत युतीचा निर्णय झाल्यानंतर ठाकरे यांची पक्षकार्यकर्त्यांसोबतची ही पहिलीच बैठक होती. युतीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा एक गट नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नागरी उड्डयन सुरक्षा संस्थेनं देशातल्या सर्व विमान वाहतुक सेवा कंपन्यांना सतर्कतेचे आणि सुरक्षा नियमांच्या चोख पालनाचे निर्देश दिले आहेत. एअर इंडिया या प्रमुख विमान वाहतुक कंपनीच्या मुंबई नियंत्रण कक्षाला, दूरध्वनीवरून विमान अपहरणाची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. प्रवाशांची तसंच सामानाची तपासणी, वाहनतळांची सुरक्षा, तसंच विमानतळावरच्या सर्व हालचालींवर, सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे लक्ष ठेवण्याची सूचना विमानतळ व्यवस्थापनांना देण्यात आली आहे.
****

राज्य सरकारनं तृतीयपंथीय विकास मंडळाची स्थापना केली आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी नुकतीच या संदर्भात एक बैठक घेऊन आवश्यक निर्देश दिले होते. तृतीयपंथीयांना शिक्षण, रोजगाराच्या संधी, आरोग्य सुविधा आणि कायदेविषयक सहाय्य मिळावं, समाजात सन्मानानं जगता यावं, हा या मंडळाच्या स्थापनेमागचा उद्देश असल्याचं, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. मंडळामार्फत तृतीयपंथीयांना ओळखपत्र तसंच दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल. पात्र विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत वसतीगृहाची सुविधा तसंच वार्षिक ४८ हजार ते साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे
****
दिल्ली इथं सुरु असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर रायफल प्रकारात भारताच्या अपूर्वी चंदेलानं जागतिक विक्रमासह काल सुवर्णपदक पटकावलं. आठ नेमबाजांसह झालेल्या अंतिम फेरीत अपूर्वीनं अपूर्वीने २५२ पूर्णांक ९ दशांश असे सर्वोच्च गुण मिळवले. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलंच पदक आहे. स्पर्धेतली रौप्य आणि कांस्य पदकं चीनच्या नेमबाजांनी जिंकली आहेत.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान होणाऱ्या दोन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज विशाखापट्टणम् इथं होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल, तर दुसरा सामना बेंगलुरु इथं २७ तारखेला होणार आहे. टी-ट्वेंटी मालिकेनंतर, या दोन्ही संघांत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे, या मालिकेतला पहिला सामना दोन मार्चला हैदराबाद इथं होणार आहे.
****

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदानाची सवलत नसल्याचं, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. अनिवासी भारतीय नागरिक, ऑनलाईन मतदान करु शकतील, अशा आशयाचा संदेश, सामाजिक संपर्क माध्यमांवरून फिरतो आहे. हा संदेश चुकीचा असल्याचं, निवडणूक विभागानं म्हटलं आहे. 

दरम्यान, मतदारांसाठी विशेष नोंदणी अभियान आजही सुरू आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन व्ही एस पी डॉट आय एन या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा तसंच चौकशीसाठी १-९-५-० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मतदान केंद्रांवरही नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
****

हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द करावा, असं सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे. काल सोलापूर इथं, कृषी पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजना आणि ई-नाम योजनेच्या पुरस्कारांचं वितरण देशमुख यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ई-नाम योजनेमुळे शेतकऱ्यांना देशभरातली बाजारपेठ खुली झाली आहे. त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याचं देशमुख म्हणाले.
*****
***

No comments: