Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 23 February 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३
फेब्रुवारी २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v नांदेड- लातूर रोड- गुलबर्गा रेल्वेमार्ग मंजूर करण्यासाठी
प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; आवश्यकता भासल्यास ५० टक्के निधी देण्याची
राज्याची तयारी
v मतदार यादीत नाव नोंदणीसाठी आज आणि उद्या राज्यभर विशेष मोहीम
v शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच आता शिक्षकांनाही सातवा वेतन
आयोग लागू
आणि
vइंग्लंड महिला क्रिकेट संघाविरूद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट
सामना भारतानं ६६ धावांनी जिंकला
****
नांदेड- लातूर रोड- गुलबर्गा हा रेल्वेमार्ग मंजूर करण्यासाठी रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा
केला जाईल तसंच आवश्यकता भासल्यास राज्य शासन
५० टक्के आर्थिक सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी दिली
आहे. लातूर जिल्हा पॅकेज अंतर्गत अहमदपूर इथं ११ हजार ६८० कोटी रूपयांच्या विविध विकास
कामांचं लोकार्पण आणि भूमीपूजन त्यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते.
लातूर जिल्ह्यानं जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी करून देशपातळीवर प्रथम पारितोषिक
मिळवल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं. केंद्रीय
रस्ते वाहतूक , महामार्ग आणि जलसंपदा मंत्री
नितीन गडकरी यांनी यावेळी बोलतांना, पिंजर -दमणगंगा प्रकल्प आणि तापी- नर्मदा प्रकल्प पूर्ण झाल्यास,
या प्रकल्पातलं पाणी गोदावरी नदीत
सोडून जायकवाडी प्रकल्पात आणलं जाणार आहे.
त्यामुळं मराठवाड्याचा पाणी प्रश्न
कायमस्वरुपी सुटेल आणि जवळपास साडेपाच
लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असं सांगितलं.
नांदेड इथं भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यालाही
काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं. केंद्र आणि राज्य सरकारनं गरीबांसाठी
कल्याणकारी योजना आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याचा दावा त्यांनी यावेळी बोलतांना
केला. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना, जनधन योजना, प्रधानमंत्री
पीक विमा योजना, रस्ते विकास, रेल्वे प्रकल्प विकास, अशा योजनांच्या यशोगाथा सर्वसामान्यापर्यंत
पोचवण्याचं आवाहन फडणवीस यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं.
बीड जिल्ह्यात परळी इथं गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान
व्दारा आयेाजित ८९ जोडप्यांच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यालाही मुख्यमंत्री
फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
बडेजाव टाळून होत असलेला हा सामुदायिक विवाह सोहळा सर्वांसाठी आदर्शवत असल्याचं सांगितलं. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे,
सिनेअभिनेता अक्षय कुमार, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आदी मान्यवर
उपस्थित होते. यावेळी अभिनेते अक्षयकुमार यांनी नवविवाहित जोडप्याला प्रत्येकी एक लाख
रूपयांची मदत केली तर दहशतवाद्यांच्या हल्ल्याल्या शहिदांसाठी एक कोटी रूपयांची मदत
ही त्याने मुख्यमंत्र्याकडे दिली.
****
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी आज आणि उद्या असे दोन
दिवस राज्यभरात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. मतदारांच्या सोयीसाठी डब्ल्यू डब्ल्यू
डब्ल्यू डॉट एन व्ही एस पी डॉट आय एन या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा तसंच
चौकशीसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध
करुन देण्यात आला आहे. मतदान केंद्रांवरही नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली
आहे.
दरम्यान, दिव्यांग मतदारांना मतदान करणं सुलभ व्हावं,
यासाठी राज्य निवडणूक आयोगानं, त्यांना मोफत वाहतुक सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला
आहे. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली. आगामी लोकसभा
निवडणुकीत मतदानासाठी, दिव्यांग मतदारांना, त्यांच्या घरापासून मतदान केंद्रावर जाण्या-
येण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिलं जाईल. राज्यातल्या ४८ लोकसभा मतदार संघातल्या दोन
लाख २४ हजार १६२ दिव्यांग मतदारांना या सुविधेचा लाभ घेता येईल.
****
नव्व्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं
काल सायंकाळी नागपूर इथं जेष्ठ नाटककार महेश
एलकुंचवार यांच्या हस्ते उद्धाटन झालं. नाटककार प्रेमानंद गज्वी या संमेलनाचे अध्यक्ष
आहेत. यावेळी बोलतांना एलकुंचवार यांनी राज्यकर्ते कधीही सहिष्णू नसतात, असं सांगत
धर्म हा व्यापक आणि गहन विषय आहे असं सांगितलं. नाट्यदिंडीनं संमेलनाचा प्रारंभ झाला.
या चार दिवसीय नाट्य संमेलनात विविध विषयांवर चर्चासत्र तसंच नाट्य प्रवेशांचं सादरीकरण
केलं जाणार आहे.
****
राज्यात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं
सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावासह सरसकट कर्जमाफी देण्यात येईल, असं आश्वासन
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. परभणी इथं राज्यस्तरीय
कृषी आणि पशू पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते काल बोलत होते. सततची नापिकी,
दुष्काळ ही संकटं शेतकऱ्यांपुढे उभी असल्यामुळे, शेतकरी जगला पाहिजे, हे धोरण शासनानं
अवलंबलं, तरच शेतकरी तरेल. असंही मुंडे यावेळी म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच आता शिक्षकांनाही सातवा
वेतन आयोग लागू होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातल्या अनुदानित खासगी प्राथमिक,
माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये आणि सैनिकी
शाळांतल्या पू शिक्षक तसंच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित
वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे.
****
धर्म हा जगभर
विभाजक आहे, अस्मितेचं साधन बनतो आहे आणि जगाला संकटाच्या खाईकडे नेण्याचं साधन
बनतो आहे, म्हणून सद्य:स्थितीत महात्मा गांधी यांच्या सर्व धर्मसमभावाची संकल्पना गरजेची
असल्याचं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर बेडकिहाळ यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद
इथं सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक दिनकर बोरीकर स्मृती व्याख्यान
मालेत, ‘महात्मा गांधीजींची धर्म आणि सर्वधर्म समभावाची संकल्पना’ या विषयावर पहिलं
पुष्प काल त्यांनी गुंफलं. त्यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक जीवनात धर्म अटळ असून
सर्व धर्माच्या चांगल्या मूल्यांचा संग्रह आपआपल्या धर्मात होणे गरजेचं असल्याचं राष्ट्रपिता
महात्मा गांधी नेहमी म्हणत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
बचत गटांच्या उत्पादनांच्या व्यापक विक्रीसाठी कायमस्वरुपी
विक्री दालन निर्माण करणं आवश्यक असल्याचं मत विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी
व्यक्त केलं. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त
कार्यालय आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित बचत गटांच्या
उत्पादीत वस्तूंचं विभागस्तरीय प्रदर्शन आणि विक्री ‘सिद्धा महोत्सव २०१८-१९’ च्या
उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रशासनानं प्रथम या बचत गटांसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी
असं त्यांनी सूचित केलं. विभाग आणि जिल्हा स्तरावरच्या बचत गटांना यावेळी पुरस्कार
प्रदान करण्यात आले.
****
भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघादरम्यान सुरू
झालेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतानं इंग्लंडवर ६६ धावांनी
विजय मिळवला. काल मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात, भारतीय संघानं प्रथम
फलंदाजी करत, इंग्लंड संघासमोर २०३ धावांचं लक्ष्य ठेवलं, मात्र इंग्लंडचा संघ ४१ व्या
षटकांत अवघ्या १३६ धावांवर सर्वबाद झाला. आठ षटकांत २५ धावा देत चार बळी घेणारी भारताची
एकता बिष्ट, सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.
****
उस्मानाबाद शहरात बार्शी नाका, जिजाऊ चौक, इथं महाराष्ट्र
राज्य सहकारी बॅंकेच्या शाखेचा येत्या २ मार्चपासून शुभारंभ होत आहे. उस्मानाबाद जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बॅंकेमुळं अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी या बँकेची
उस्मानाबाद इथं शाखा सुरू करण्याकरता भारतीय
जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी प्रयत्न केले होते.
****
औरंगाबाद इथं आज सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय
आरोग्य अभियांनाअंतर्गत आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या खडकेश्वर
इथल्या मैदानावर हा मेळावा होत असून रूग्णांची
मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार केले जाणार आहेत. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी दुपारी
३ वाजेपर्यंत रूग्णांनी नोंदणी करावी असं आवाहन खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.
****
दुष्काळातल्या शेतकऱ्यांना मदत करायचीच असेल तर उदार
मनाने करावी त्यासाठी अटी आणि शर्तींचं काय काम असा सवाल करत खासदार नारायण राणे यांनी
राज्यातल्या सरकारवर टीका केली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातल्या वाडीकुरोली
इथं आयोजित कै. वसंतराव काळे यांच्या अमृत
महोत्सवी शेतकरी मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार
शिंदे होते. शेतकऱ्यांना मदत जाहीर करताना चारा छावण्यासाठी अटी आणि शर्ती लागू केल्याचं
सांगून सरकारनं याबाबत फेरविचार करावा आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी असं आवाहन
त्यांनी यावेळी केलं.
*****
***
No comments:
Post a Comment