Saturday, 23 February 2019

Tex -AIR News Bulletin Aurangabad 22.02.2019 Evining Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 February 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

देशात बेरोजगारी ही गंभीर समस्या असल्याचं मान्य करण्यास, मोदी सरकार तयार नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. ते आज नवी दिल्लीत विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी शिक्षण - दशा आणि दिशा या विषयावर बोलत होते. पंतप्रधानांनी रोजगाराच्या संधींबाबत तरुणांशी बोलायला हवं, असं गांधी यांनी यावेळी नमूद केलं. देशातली संपत्ती मूठभर लोकांच्या हातात बंद असल्याचं ते म्हणाले. राफेल, भ्रष्टाचार, रोजगार आणि इतर विषयांवर पंतप्रधानांना चर्चेचं आव्हान दिलं असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं.

****

काश्मीरमधील पुलवामा हल्यातल्या हुतात्मा सैनिकांच्या पाठीशी, फक्त देशच नाही तर सर्व जग उभं असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राजस्थान मध्ये हुतात्मा सैनिक कुटूंबाच्या सांत्वन प्रसंगी बोलत होते. राजस्थान मध्ये आलेल्या नवीन सरकारने निवडणूक जाहीरनाम्यानुसार दहा दिवसात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी न दिल्यामुळे हे सरकार अपयशी ठरलं असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

नागरी उड्डयन सुरक्षा संस्थेनं देशातल्या सर्व विमान वाहतुक सेवा कंपन्यांना सतर्कतेचे आणि सुरक्षा नियमांच्या चोख पालनाचे निर्देश दिले आहेत. एअर इंडिया या प्रमुख विमान वाहतुक कंपनीच्या मुंबई नियंत्रण कक्षाला, दूरध्वनीवरून विमान अपहरणाची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. प्रवाशांची तसंच सामानाची तपासणी, सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.

****

राज्य सरकारनं तृतीयपंथीय विकास मंडळाची स्थापना केली आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी नुकतीच या संदर्भात एक बैठक घेऊन आवश्यक निर्देश दिले होते. तृतीयपंथीयांना शिक्षण, रोजगाराच्या संधी, आरोग्य सुविधा आणि कायदेविषयक सहाय्य मिळावं, समाजात सन्मानानं जगता यावं, हा या मंडळाच्या स्थापनेमागचा उद्देश असल्याचं, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. मंडळामार्फत तृतीयपंथीयांना ओळखपत्र तसंच दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल. पात्र विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत वसतीगृहाची सुविधा तसंच वार्षिक ४८ हजार ते साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

****

औरंगाबाद इथं राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या वतीनं जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी आज मोफत आरोग्य मेळावा घेण्यात आला. या एकदिवसीय मेळाव्यात १९ आरोग्य कक्षाद्वारे विविध आजारांचं निदान करण्यासाठी मोठ्या संख्येत नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

****

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत परभणी जिल्ह्यात, सुमारे एक लाख ३० हजार ५२ पात्र शेतकरी कुटुंबीयांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण शेतकऱ्यांपैकी ७६ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

उद्या सकाळी उत्तरप्रदेशात गोरखपूर इथं, पंतप्रधानांच्या हस्ते या योजनेला प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातल्या जिल्हा नियोजन भवनात तर तालुकास्तरावर तालुका मुख्यालयात उद्या सकाळी साडे दहा ते अकरा या वेळेत, शेतकऱ्यांना या योजनेची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर, सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाचं प्रसारण आणि पंतप्रधानांच्या हस्ते या योजनेच्या उद्घाटन समारंभाचं थेट प्रसारण होणार आहे. 

****

नांदेड जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच ३८७ अनुकंपा धारकांची प्रतिक्षा यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीबाबतचे आक्षेप, मंगळवार २६ फेब्रुवारी पर्यंत, पुराव्यासह जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागास सादर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान होणाऱ्या दोन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना उद्या विशाखापट्टणम्‌ इथं होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना बेंगलुरु इथं २७ तारखेला होणार आहे. टी-ट्वेंटी मालिकेनंतर, या दोन्ही संघात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे, या मालिकेतला पहिला सामना दोन मार्चला हैदराबाद इथं होणार आहे.

****

दिल्ली येथे सुरु असलेल्या महिलांच्या जागतिक १० मिटर रायफल प्रकारात भारताच्या अपुर्वी चंदेलानं जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकलं आहे. यातील रोप्य आणि कांष्य पदके चीनच्याच अनुक्रमे रउझू झावो आणि झु हाँग यांनी जिंकली आहेत.

****

No comments: