Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 February
2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
भारतानं
आज सौदी अरेबियाशी पर्यटन आणि गृहनिर्माण यासह विविध क्षेत्रातले पाच करार केले. पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर
या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
****
वस्तू
आणि सेवा कर परिषदेची तेहतिसावी बैठक आज नवी दिल्लीमध्ये झाली. उद्योगांसाठी जानेवारीची
विक्री विवरणपत्रं भरण्याची मुदत परिषदेनं, परवा, म्हणजे बावीस तारखेपर्यंत वाढवली
आहे. स्थावर मालमत्ता आणि लॉटरीवरच्या जीएसटी बाबतचा निर्णय परिषदेनं रविवारपर्यंत
पुढे ढकलला. रविवारी पुन्हा एक बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं या परिषदेचे
अध्यक्ष केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
****
राम
जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन विवाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालय येत्या सव्वीस तारखेला सुनावणी
घेणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ
या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. यामध्ये न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड, एस.ए.बोबडे,
अशोक भूषण आणि एस.ए. नझीर यांचा समावेश आहे. विवादित दोन पूर्णांक सत्त्याहत्तर एकर
जमीन तीन पक्षकारांमध्ये समप्रमाणात विभागून देण्याच्या, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या
निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी हे घटनापीठ घेणार आहे.
****
पुलवामा
अतिरेकी हल्ला प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेनं आज जम्मू काश्मीर पोलिसांकडून
स्वत:कडे घेतला. या संस्थेनं या प्रकरणाची पुन्हा नोंद करत एका तपास पथकाची स्थापना
केली असल्याची माहिती या संस्थेच्या प्रवक्त्यानं दिली आहे.
****
गेल्या
आठवड्यात देशभरामध्ये ६५ जणांचा स्वाईनफ्लूमुळं मृत्यू झाल्यानं या वर्षी यात बळी पडलेल्यांची
संख्या ३७७ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार स्वाईनफ्ल्यूची लागण झालेल्यांची
संख्या १२ हजारांहून अधिक झाली आहे. महाराष्ट्रात स्वाईनफ्ल्यूमुळं १७ जण दगावले असून
३३० जणांना याची लागण झाली आहे.
****
अनुदानित
शैक्षणिक संस्थांमधल्या विद्यार्थ्यांच्या परिपोषण अनुदानात वाढ करायला राज्य शासनानं
मान्यता दिली आहे. आज मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र गौरव पुरस्कार
योजनेअंतर्गत, सैन्य दलातल्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना अनुदान देण्याचा निर्णयही
आजच्या बैठकीत घेण्यात आला.
कब्जेहक्कानं
किंवा भाडेपट्ट्यानं दिलेल्या शासकीय जमिनींवरच्या इमारत बांधकामांना मुदतवाढ देण्यासाठी
नवीन धोरण आखण्याला या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुंबईतलं
सोमय्या विद्याविहार आणि पुणे जिल्ह्यातल्या अंबी इथल्या डी. वाय. पाटील या स्वयंअर्थसहाय्यित
विद्यापीठांच्या स्थापनेलाही मंत्रीमंडळानं आज मान्यता दिली.
****
माहिती
तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आवश्यक पोषक वातावरण राज्यात असल्यामुळं आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचं
राज्यात स्वागत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ‘नॅसकॉम टेक्नोलॉजी
अँड लीडरशिप फोरम २०१९’ या जागतिक परिषदे दरम्यान ते आज मुंबईत बोलत होते. माहिती तंत्रज्ञानाचा
वापर करुन शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचता यावं, हा शासनाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं.
****
कोकण
किनारपट्टीवर कुठंही नाणार प्रकल्प उभारायला शिवसेनेचा विरोध राहील, असं पर्यावरण मंत्री
रामदास कदम यांनी म्हटलं आहे. मंत्रीमंडळ बैठकीनंतर आज ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा
निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचं आश्वासन
आज मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कदम यांनी यावेळी सांगितलं.
****
उन्हाळ्यातली
संभाव्य चारा टंचाई लक्षात घेत परभणी महानगरपालिकेनं वैरण बियाणं आणि खतं वितरण योजना
राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी योजना आणणारी ही राज्यातली पहिली महापालिका आहे.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात मनपा हद्दीतल्या दोनशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांना आज परभणीच्या
महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या हस्ते बियाणे आणि खताचं वाटप करण्यात आलं. उर्वरित
शेतकऱ्यांनाही पुढच्या आठवड्यात हे वाटप होणार आहे.
****
No comments:
Post a Comment