Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 26 February 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६
फेब्रुवारी २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v मराठवाडा वॉटर ग्रीडच्या पेयजल प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
v प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या शहरी गरिबांसाठी
काल एक लाख एक हजार दोनशे वीस घरांना मंजुरी
v औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील
यांची विष प्राशन करून आत्महत्या
आणि
v इंग्लंड महिला क्रिकेट संघांविरूद्धचा दुसरा सामना जिंकत भारताची
मालिकेत विजयी आघाडी
****
मराठवाडा वॉटर ग्रीडच्या पेयजल
प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री
बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. या ग्रीड द्वारे एक हजार ३३० किलोमीटर
लांबीच्या मुख्य जलवाहिनीवर मराठवाड्यातली सर्व अकरा धरणं जोडणं आणि प्रत्येक तालुक्यात पाणी
पोहोचवण्यासाठी तीन हजार दोनशे वीस किलोमीटर लांब जलवाहिनी टाकणं प्रस्तावित आहे. नागरिकांना पेयजल पुरवण्यापर्यंतच्या
कामासाठी आकस्मिक खर्च, भाववाढ आणि यंत्रसामुग्रीसह अंदाजे नऊ हजार पाचशे पंचाण्णव कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम महाराष्ट्र जीवन
प्राधिकरणामार्फत करणं प्रस्तावित असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं.
****
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल राज्यपाल
सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला. राज्यपालांनी, काश्मीरमध्ये पुलवामा
इथं, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत,
हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अपुऱ्या पावसामुळे दुष्काळाची झळ बसत असलेल्या भागाला,
वीजदेयक तसंच शैक्षणिक शुल्कात सवलत, चारा छावणी, टँकरद्वारे पेयजल पुरवठा, इत्यादी
योजनांचा राज्यपालांनी आढावा घेतला. शेतकरी तसंच पशुपालकांसाठी राज्य सरकार राबवत असलेल्या
विविध योजनांची राज्यपालांनी माहिती दिली.
राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानसभेत नियमित कामकाज
सुरू झालं. विविध विधेयकं यावेळी सदनासमोर मांडण्यात आली. सदनानं दिवंगत सदस्यांना
यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.
विधान परिषदेत पुलवामा इथं दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्मा सैनिकांना,
दोन्ही सदनात, शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरम्यान, विरोधकांनी काल सकाळी
राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत, विधान भवनाच्या पायऱ्यांवर मूक आंदोलन केलं.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर, उत्तरप्रदेशात गोळ्या झाडल्याप्रकरणी
विरोधकांनी फलक झळकावत, निषेध केला.
****
खासगी प्रवासी वाहतूक करताना सुरक्षेबाबत संपूर्ण
दक्षता घेण्याचे निर्देश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत. रायगड जिल्ह्यात
एसटी बसमध्ये नुकत्याच सापडलेल्या स्फोटकाच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या उच्चस्तरीय
बैठकीत ते बोलत होते. अनधिकृत कुरिअर, पार्सल किंवा सामानाची वाहतूक करु नये, असा इशाराही रावते यांनी
खासगी बस वाहतूकदारांना दिला. या प्रकरणी दोषी आढळल्यास परवाना निलंबनाची तसंच बस जप्तीची
कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळाच्या चालक किंवा
वाहकानं अशी अनधिकृत वाहतूक केली तर पहिल्या वेळी बदलीची आणि दुसऱ्या वेळी बडतर्फीची
कारवाई केली जाईल, असंही रावते यांनी म्हटलं आहे.
****
राज्यभरात एकशे सत्तर पूल वजा बंधारे बांधण्याचा
उपक्रम हाती घेतला असून या कामांमुळे महाराष्ट्राचं दुष्काळी चित्र पालटणार आहे, असा
विश्वास, केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. काल राष्ट्रीय
जल पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्राला पहिल्या राष्ट्रीय जल पुरस्कारासह
विविध श्रेणींमधले नऊ पुरस्कार काल गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी
ते बोलत होते. जलसंधारण विषयक विविध कार्यक्रमांचं प्रभावी नियमन करणारं महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण
देशात सर्वोत्तम ठरलं आहे, तर, लातूर, बीड, अहमदनगर आणि वर्धा या जिल्ह्यांनी जलसंधारणाच्या
विविध योजनांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
****
केंद्र शासनानं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या
शहरी गरिबांसाठी काल एक लाख एक हजार दोनशे
वीस घरं मंजूर केली. केंद्रीय गृह निर्माण आणि नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता
आणि संनियंत्रण समितीच्या काल झालेल्या त्रेचाळीसाव्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या योजनेतून महाराष्ट्राला आतापर्यंत सात लाख
तीस हजार दोनशे वीस घरं केंद्राकडून मंजूर झाली आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष
सुरेश पाटील यांनी काल विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी, आपल्या
मृत्यूस सदाशिव गायके आणि नाना पाटील हेच जबाबदार आहेत, अशी चिट्ठी लिहून ठेवली होती.
गायके यांनी वीस वर्षांपासून आपल्या विरुद्ध अनेक खोटे खटले दाखल करून त्रास दिल्याचा
आणि आजही त्यांनी आपल्या विरूद्ध तक्रार दिल्याचा, त्यांच्या या त्रासाला कंटाळून आपण
आत्महत्या करत आहोत, गायके आणि नाना पाटील यांच्या शिवाय आपल्या मृत्यूस कोणाही जबाबदार
धरू नये असं त्यांनी या चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गायके आणि
नाना पाटील यांना ताब्यात घेतलं आहे.
गेल्य अनेक वर्षांपासून पाटील हे जिल्हा
बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आर्थिकदृष्ट्या डबघाईला गेलेली ही बँक काटकसर
आणि अनावश्यक खर्चात कपात करत त्यांनी पुन्हा सुव्यवस्थेत आणली. सुरेश पाटील यांच्या
पार्थिवावर कन्नड तालुक्यात नागद इथं, आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी
त्यांच्या निवासस्थानी आणि जिल्हा बँकेच्या मुख्यालयात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी
ठेवण्यात येणार आहे.
****
नांदेड इथं, माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शंकरराव
चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कालपासून शंकर संगीत दरबार महोत्सवाला प्रारंभ झाला.
परवा २७ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात कथक नृत्य, शास्त्रीय गायन तसंच वादन
सादर होणार आहे. या वर्षी पासून शंकर साहित्य दरबारही होत असून, यात कथा कथन, कविसंमेलन,
परिसंवाद, चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत.
संगीत शंकर दरबारच्या धर्तीवर साहित्यिकांसाठी शंकर
साहित्य दरबार महाराष्ट्राच्या पातळीवर घेण्याचा मनोदय आमदार डी. पी. सावंत
यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
****
विदर्भ पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातल्या
शेगाव इथले संत गजानन महाराज यांचा १४१ वा प्रकटदिन सोहळा काल सर्वत्र भक्तीभावानं
साजरा झाला. औरंगाबाद इथं या निमित्तानं कीर्तन, प्रवचनासह महाप्रसाद आदी कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं होतं.
****
वंचित बहुजन आघाडीच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता,
आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात चमत्कार घडेल, असा विश्वास रिपब्लिकन सेनेचे संस्थापक
अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत
होते. वंचित बहुजन आघाडी ही सत्ताधाऱ्यांची टीम बी असल्याच्या आरोपांचा, त्यांनी स्पष्ट
शब्दात इन्कार केला.
****
भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यान सुरू
असलेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या
मुंबईत झालेल्या दुसऱ्या सामन्यात काल भारतानं इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला.
या विजयाबरोबरच तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली
आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल रस्त्याच्या कामांसाठी आंदोलनं
करण्यात आलं. जिंतूर-परभणी तसंच जिंतूर -औंढा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अराजकीय
तसंच सामाजिक संघटनांनी तहसीलदारांना निवेदन सादर केलं. सोनपेठ तालुक्यातल्या खराब
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी काल पत्रकारांनी परळी-पाथरी रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये
बसून आंदोलन केलं.
****
बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी
बीड शहरात काल एका फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. महिला आणि बाल कल्याण विकास विभागानं
काढलेल्या या फेरीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या.
****
बीड जिल्ह्यातल्या सगळ्या शिधापत्रिकाधारकांचं संगणकीकरण
आणि आधार जोडणीचं कामकाज संबधित स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत बीडच्या तहसील कार्यालयात
सुरू आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांचं हे काम पूर्ण झालं नसेल, किंवा पात्र शिधापत्रिका
संगणक प्रणालीतून कमी झाल्या असतील, त्यांनी आपल्या गावातल्या स्वस्त धान्य दुकानदारांकडे
परवापर्यंत जमा कराव्यात, असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment