Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 25 February 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५
फेब्रुवारी २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला प्रारंभ; शेतकऱ्यांच्या
खात्यात योजनेचा पहिला हप्ता जमा
v जीएसटी परिषदेकडून घर खरेदी कराच्या दरात कपात
v विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; विरोधकांचा चहापानावर
बहिष्कार
v नव्व्याण्णवाव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा समारोप
आणि
v नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सौरभ चौधरीला सुवर्णपदक.
****
प्रधानमंत्री किसान
सन्मान योजनेचा काल उत्तरप्रदेशात गोरखपूर इथं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ
केला. या योजनेअंतर्गत कमाल पाच एकरापर्यंत जमीन असलेल्या देशभरातल्या शेतकऱ्यांना
वार्षिक सहा हजार रुपये, तीन टप्प्यात मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येकी दोन
हजार रुपयांच्या पहिला हप्त्यापोटी, देशभरातल्या एक कोटी एक लाख सहा हजार आठशे ऐंशी
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात, एकूण दोन हजार २१ कोटी रुपये निधी थेट जमा झाला. या योजनेमध्ये
राज्यातील एक कोटी पेक्षा जास्त खातेदार पात्र ठरले असून पहिल्या टप्प्यात १४ लाख २६
हजार ९२७ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरच हा
निधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाचं सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या
जिल्हा नियोजन भवनात थेट प्रक्षेपण करण्यात आलं. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हाधिकारी
पी शिवशंकर यांनी, बीड इथं जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी, जालना इथं जिल्हाधिकारी
रवींद्र बिनवडे यांनी, नांदेड इथं जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी, विविध तालुक्यांतून
आलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान केला.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यातही
काल दोन हजार रुपये जमा झाले. कळंब तालुक्यातल्या मलकापूर इथले शेतकरी अजय लोमटे या
योजनेचे लाभार्थी ठरले, त्यांनी या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ रोजी शेतकरी
किसान सन्मान निधी योजनांतंर्गत माझ्या आकांऊंट मध्ये दोन हजार रूपये जमा झालेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्रजी यांचे खूप खूप धन्यवाद.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार क्रमांक
आणि बँक खाते बिनचूक उपलब्ध करुन देण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
****
दरम्यान, आकाशवाणीच्या
मन की बात या कार्यक्रम मालिकेद्वारे पंतप्रधानांनी काल देशवासियांशी संवाद साधला.
पुलवामा हल्ल्यानंतर हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचे दृढ निर्धाराचे दाखले देताना, दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी वीरांचं
हौतात्म्य निरंतर प्रेरणा देत राहील, असं पंतप्रधान म्हणाले.
दिल्लीतील इंडिया गेट आणि अमर जवान ज्योत परिसरात उभारण्यात आलेलं, राष्ट्रीय
युद्ध स्मारक, आज लष्कराकडे सुपूर्द करण्यात येणार असून, या
स्मारकाला नागरिकांनी भेट द्यावी, असं आवाहन
पंतप्रधानांनी केलं.
निष्काम भावनेने कार्य करणाऱ्या कर्मयोगी लोकांना यंदा पद्म पुरस्कार प्रदान
करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. मराठवाड्यातले
गो सेवक शब्बीर सैयद यांच्यासह अनेकांच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख
केला.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी देशभरातील सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना त्यांनी शुभेच्छा
दिल्या. लोकसभा निवडणुकीमुळे मन की बात कार्यक्रम मालिकेचा, या पुढचा भाग, मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी होईल. त्यावेळी नागरिकांशी पुन्हा संवाद साधताना आनंद वाटेल, असं पंतप्रधान
म्हणाले.
****
वस्तू आणि सेवाकर - जीएसटी परिषदेनं घर खरेदीवरच्या कराच्या
दरात कपात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल नवी दिल्लीत, जीएसटी
परिषदेच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. निर्माणाधीन घरांवरील करमर्यादा १२ टक्क्यांवरून
पाच टक्क्यांवर आणण्यात आली असून, परवडणाऱ्या घरांसाठी केवळ एक टक्का कर आकारण्याचा
निर्णय घेतला असल्याचं जेटली यांनी सांगितलं. स्वस्त घरांची मर्यादा ४५ लाख रुपयांपर्यंत
वाढवण्यात आली असून, क्षेत्रफळानुसार महानगरांमध्ये ६० चौरस मीटर, तर इतर गावांमध्ये
९० चौरस मीटर पर्यंत या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्य विधीमंडळाच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत प्रारंभ होत आहे. आज सकाळी राज्यपाल सी विद्यासागर
राव यांच्या भाषणानं या अधिवेशनाला सुरुवात होईल. उद्या पुरवणी मागण्या तर परवा अंतरिम
अर्थसंकल्प सादर होईल. गुरुवारी अर्थसंकल्पावर चर्चा तर राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर
एक आणि दोन मार्च रोजी चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन, राज्यसरकार शेतकऱ्यांच्या
पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचा पुनरुच्चार केला. दुष्काळग्रस्त ८२ लाख शेतकऱ्यांना मदत
करण्यात येत असून ४२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा झाल्याची तर उर्वरित
शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं बोलावलेल्या
चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. विधान सभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील,
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
हा निवडणुकीपूर्वीचा अंतरिम अर्थसंकल्प असल्यानं, या अर्थसंकल्पात कोणत्याही लोकप्रिय
घोषणा किंवा धोरणात्मक निर्णयाचा समावेश नसेल, अशी अपेक्षा मुंडे यांनी यावेळी व्यक्त
केली. शेतकरी कर्जमाफी आणि जलसंधारणाच्या कामांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक
होत असल्याचा आरोप विखेपाटील यांनी केला.
****
नागपूर इथं आयोजित नव्व्याण्णवाव्या अखिल भारतीय
मराठी नाट्य संमेलनाचा काल समारोप झाला. यावेळी बोलतांना संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी
यांनी, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून, सरकारला
जागं केलं पाहिजे, असं मत नमूद केलं. शंभरावं नाट्य संमेलन पुढच्या वर्षी १०० गावांमध्ये
होणार असून त्याची सुरूवात सांगलीतून होणार असल्याची घोषणा, नाट्य परिषदेचे अध्यक्ष
प्रसाद कांबळी यांनी केली.
****
भारत आणि ऑस्टेलिया यांच्यात काल विशाखापट्टणम् इथं
झालेला पहिल्या टी-२० क्रिकेट सामना, ऑस्टेलियानं तीन गडी राखून जिंकला. अखेरच्या चेंडूपर्यंत
रोमांचक ठरलेल्या या सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियासमोर १२६ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी
अखेरच्या चेंडूवर दोन धावा काढून, सामना जिंकला. मालिकेचा दुसरा आणि शेवटचा सामना बुधवारी
बंगळुरु इथं खेळला जाणार आहे.
****
नेमबाजी
महासंघाच्या विश्वचषक स्पर्धेत, भारताच्या
१६ वर्षीय सौरभ चौधरीनं १० मीटर
एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. २४५ गुण पटकावण्याचा विश्वविक्रमासह सौरभनं
2020 मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचं तिकीटही जिंकलं आहे.
****
येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही मोठ्या पक्षाला
नव्हे, तर छोट्या पक्षांचे उमेदवार किंवा स्वतंत्र उमेदवारांना पाठिंबा द्यायचा निर्णय,
मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे. भाजप-शिवसेना किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं,
मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, या पक्षांना पाठिंबा देणार नसल्याचं,
संघटनेनं स्पष्ट केलं आहे.
****
मनमाड -धुळे-इंदूर हा रेल्वेमार्ग विकासाचं दार उघडणारा
मार्ग ठरणार असल्याचा विश्वास, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केला आहे,
त्या काल धुळ्यात, शिक्षण महर्षी बापूसाहेब विसपुते यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण
केल्यानंतर बोलत होत्या. धुळे जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा यावेळी
गौरव करण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यात, मांजरा साखर कारखाना परिसरात दिवंगत
केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काल अनावरण करण्यात
आलं. यावेळी खासदार अशोक चव्हाण, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील चाकूरकर,
यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते, विलासरावांच्या कार्याला यावेळी उजाळा
देण्यात आला.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं वाळुतस्करांनी तलाठी
चंद्रकांत साळवे यांच्यासह अक्षय नेमाडे यांना मारहाण केल्याची घटना घडली. काल सकाळी
ही घटना घडली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे.
****
नाशिक जिल्ह्यात मुंबई-आग्रा
महामार्गावर दोन आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सहा जण ठार तर
२५ जण जखमी झाले.
सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी
एक कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. बीड जिल्ह्यात, पाली या
गावाजवळ हा अपघात झाला.
*****
***
No comments:
Post a Comment