Saturday, 23 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.02.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ फेब्रुवारी २०१९ दुपारी .०० वा.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला तीन लाख कोटी डॉलर एवढी म्हणजेच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठीची रुपरेषा मांडली. ते आज नवी दिल्लीत आयोजित जगातिक व्यापार शिखर परिषदेत बोलत होते. यासाठी देशामध्ये अनेक स्टार्ट-अप सुरू करण्याचा मानस असून त्याद्वारे देशाला सर्वात आघाडीवर घेऊन जाणे शक्य असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. आमचं सरकार जात, धर्म आणि भाषेच्या पलिकडे जाऊन समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी काम करत असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा त्रेपन्नावा भाग आहे.



****



 केंद्र सरकारनं सर्व राज्यांना जम्मू आणि काश्मीरमधल्या नागरिकांना संरक्षण देण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयालानं केंद्र सरकारला दिलेल्या निर्देशांनंतर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना याबाबत मार्गदर्शिका जारी केली आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरमधल्या नागरिकांवर झालेले कथित हल्लयांबाबत सरकार गंभीर असल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 जंगलांमध्ये राहणाऱ्या आदिवासींबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर आदिवासींच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सर्व उपाय करेल, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. वन हक्क कायद्यामधल्या तरतूदींची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना वेळोवेळी सूचना करत आलं असल्याचं आदिवासी व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानं २१ राज्यांना ज्या आदिवासींचा जंगलातल्या जागेसाठीच्या हक्काचे दावे फेटाळले आहेत त्यांना जंगलांमधून बाहेर काढण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मागवली आहे.

****

 येत्या लोकसभा निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदानाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचं, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. भारतीय पारपत्र धारक अनिवासी नागरिक, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदान करुन शकतील, अशा आशयाचा संदेश, सामाजिक संपर्क माध्यमांवरून फिरतो आहे, हा संदेश चुकीचा असल्याचं, निवडणूक विभागानं म्हटलं आहे. अनिवासी भारतीय नागरिकांसाठी मतदार नोंदणीची ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे, परंतु मतदान करण्यासाठी संबंधितांना, त्यांचं नाव असलेल्या मतदारसंघातल्या मतदान केंद्रावर, प्रत्यक्ष उपस्थित राहूनच मतदान करावं लागेल, असंही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केले आहे.

                             

****



 राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला परवा सोमवारपासून मुंबईत प्रारंभ होणार आहे. सोमवारी सकाळी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं, या अधिवेशनाला सुरुवात होईल. सहा दिवसांच्या या सत्रात २६ तारखेला पुरवणी मागण्या, तर २७ तारखेला अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल. २८ तारखेला अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. त्याशिवाय, राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर एक आणि दोन मार्च रोजी चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या या अधिवेशनात काँग्रेससह विरोधीपक्षांकडून सरकारला शेतकरी आत्महत्या तसंच कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 औरंगाबाद - अहमदनगर मार्गावर दुधाचा टँकर आणि आराम बसच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले. कांगोनी फाट्याजवळ आज पहाटे हा अपघात झाला, अपघातातल्या जखमींवर अहमदनगरच्या सामान्य रुग्णालयात तसंच नेवासे इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

****



 औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूरजवळ ट्रक आणि कारच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीनं तिघा जखमींना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केलं. या दुर्घटनेनंतर वैजापूर -औरंगाबाद मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

****



 संतरागाछी-नांदेड या साप्ताहिक एक्स्प्रेस रेल्वे गाडीच्या, मार्च महिन्यात चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेड इथून चार आणि अकरा मार्च रोजी तर संतरागाछी इथून सहा आणि तेरा मार्च रोजी सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. या मार्गावर आधुनिकीकरण आणि सुरक्षेसंबंधित काम सुरू असल्यानं, हा निर्णय घेतल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळलं आहे.

****



 आजपासून सुरू होत असलेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी चषक स्पर्धेत महिलांच्या १० मीटर रायफल प्रकारात अंजूम मौडगील, अपुर्वी चंडेला आणि इलावेनील वालरैवान या भारताकडून सहभागी होत आहेत.

*****

***

No comments: