Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 February
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० फेब्रुवारी
२०१९ दुपारी १.०० वा.
****
तंत्रज्ञानाचा जलदगतीनं विकास होण्याच्या आजच्या काळात ऊर्जा आणि पर्यावरण
हे विषय महत्त्वाचे असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ऊर्जा
आणि पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते आज नवी
दिल्लीमध्ये बोलत होते. पर्यावरण रक्षणाबाबत, अंमलात आणता येतील, अशी धोरणं तज्ज्ञांनी
आखावीत, असं आवाहनही त्यांनी केलं. सगळ्या नागरिकांना परवडणाऱ्या दरात ऊर्जा उपलब्ध
करून देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं.
****
आशिया खंडातल्या
प्रतिष्ठित अशा एअरो इंडिया या द्विवार्षिक हवाई कवायतीच्या बाराव्या भागाचं बंगलुरुच्या
येलहंका वायुसेना केंद्रात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज उद्घाटन केलं.
सरकारनं संरक्षण क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीला शंभर टक्के परवानगी दिल्याची माहिती
देताना सीतारामन यांनी गुंतवणूकदारांनी संरक्षण क्षेत्रात
गुंतवणूक करावी, असं आवाहन यावेळी केलं. या जागतिक कार्यक्रमात यावर्षी विक्रमी संख्येनं
विमानं सहभागी होत आहेत. पाच दिवसांच्या या उपक्रमात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या
परिषदेसह स्टार्ट अप, तंत्रज्ञान, महिला वैज्ञानिक यासंदर्भातले विविध कार्यक्रम होणार
आहेत. शेवटच्या दिवशी तेजस, राफेल, सारस, सारंग आणि योकोलेव्ह या विमानांची हवाई प्रात्यक्षिकं
सादर होणार आहेत.
****
भारत आणि सौदी अरेबिया
दरम्यानचे संबंध कायम ठेवणं आणि दोन्ही देशांच्या हिताकरता ते आणखी दृढ करण्यासाठी
आपण उत्सूक असल्याचं सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दूल अजीज उल सऊद
यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. युवराज हे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्याशी परस्पर हितांच्या विविध मुद्दांवर विस्तारानं चर्चा करणार असून
त्यानंतर विविध करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. सौदी अरेबियाचे युवराज काल
संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.
****
सर्वोच्च न्यायालयानं
आज रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्यासह या समुहाच्या अन्य दोन कंपन्यांच्या
अध्यक्षांना न्यायालयाची अवमानना केल्याप्रकरणी दोषी ठरवलं. दूरसंचार विषयक उपकरणं
निर्माण करणाऱ्या एरिक्सन या कंपनीची पाचशे पन्नास कोटी रुपये इतकी थकित रक्कम देण्याचा
न्यायालयाचा आदेश अंबानी यांनी हेतूपूर्वक न पाळल्याचं नमूद करत न्यायालयानं हा निर्णय
दिला असून, ही रक्कम चार आठवड्यात चुकती करावी, अन्यथा तीन महिन्यांचा कारावास भोगावा
लागेल, असा इशारा दिला आहे. रिलायन्स टेलीकॉम आणि रिलायन्स इन्फ्राटेल या कंपन्यांनी
प्रत्येकी एक कोटी रुपये न्यायालयाच्या नोंदणी विभागात चार आठवड्यात जमा करावेत असा
आदेशही न्यायालयानं दिला असून, असं न केल्यास या कंपन्यांच्या अध्यक्षांना एक महिन्याचा
कारावास भोगावा लागेल, असं स्पष्ट केलं आहे.
****
भारतीय लष्कर आणि
संरक्षण मंत्रालयानं आयुधं निर्माण मंडळाला एकशे चौदा धनुष तोफांचं उत्पादन करायला
मंजुरी दिली आहे. धनुष ही भारतात तयार होणारी पहिली लांब पल्ल्याची तोफ असून, मेक इन
इंडिया योजनेचं हे महत्त्वाचं यश आहे, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री
राजनाथ सिंह आणि महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी काल नवी दिल्लीत महिला
सुरक्षेसाठीच्या आपत्कालीन प्रतिसाद सहाय्य यंत्रणेचा प्रारंभ केला. सुरुवातीला ही
योजना मुंबई शहरासह सोळा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी असून, नंतर टप्प्याटप्प्यानं
देशभरात सुरू होणार आहे. या योजनेमुळे या ठिकाणचे नागरिक कुठल्याही आपत्कालीन स्थितीत
११२ या दूरध्वनी क्रमांकावर सहाय्य मागू शकतील.
****
उद्योजक रॉबर्ट वाड्रा
आज दिल्लीत सक्त वसुली संचालनालयासमोर हजर झाले. काळा पैसा वैध करण्यासंदर्भात त्यांची
चौकशी सुरू आहे. काल ते प्रकृतीच्या कारणामुळे या चौकशीसाठी हजर राहू शकले नव्हते.
वाड्रा यांची सक्त वसुली संचालनालयाच्या दिल्ली तसंच जयपूर कार्यालयांमध्ये दोन वेवेगळ्या
प्रकरणांसाठी आतापर्यंत एकूण तेवीस तास चौकशी झाली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment