आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ फेब्रुवारी २०१९ सकाळी १०.५६
वाजता
****
राज्य विधीमंडळाच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत प्रारंभ होत आहे. आज सकाळी राज्यपाल सी विद्यासागर
राव यांच्या भाषणानं या अधिवेशनाला सुरुवात होईल. उद्या पुरवणी मागण्या तर परवा अंतरिम
अर्थसंकल्प सादर होईल. गुरुवारी अर्थसंकल्पावर चर्चा तर राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर
एक आणि दोन मार्च रोजी चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन, राज्यसरकार शेतकऱ्यांच्या
पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचा पुनरुच्चार केला. दुष्काळग्रस्त ८२ लाख शेतकऱ्यांना मदत
करण्यात येत असून ४२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा झाल्याची तर उर्वरित
शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, हा निवडणुकीपूर्वीचा
अंतरिम अर्थसंकल्प असल्यानं, या अर्थसंकल्पात कोणत्याही लोकप्रिय घोषणा किंवा धोरणात्मक
निर्णयाचा समावेश नसेल, अशी अपेक्षा विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी
व्यक्त केली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार
टाकल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
****
आगामी
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा राहणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण
राणे यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं आयोजित पत्रकार
परिषदेत ते बोलत होते. एनडीएला पाठिंबा असला, तरी
शिवसेनेला आपला विरोध राहणार असल्याचं राणे यांनी स्पष्ट केलं.
****
ऑस्कर पुरस्कारांच्या उत्कृष्ट लघु वृत्तकथा या श्रेणीत
‘पीरीयड- एंड ऑफ सेंटेन्स’ या भारतीय वृत्त कथेनं सर्वोत्तम वृत्तकथेचा पुरस्कार पटकावला
आहे. कॅलिफोर्नियात लॉस एँजिलिस इथं हा पुरस्कार वितरण सोहळा सध्या सुरू आहे. गुणीत
मोंगा यांची ही वृत्तकथा, मासिक पाळी दरम्यान महिलांच्या सामाजिक कुचंबणेवर आधारित
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment