Monday, 22 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.04.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

मराठी बातमीपत्र

२२ एप्रिल  २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं उद्या मतदान होत आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची काल सांगता झाली. १३ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतल्या ११६ मतदारसंघांत या टप्प्यात निवडणूक होत आहे. यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद, जालना, रावेर, जळगाव, अहमदनगर, पुणे, बारामती, माढा, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड या चौदा मतदार संघांत मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये एकूण २४९ उमेदवार आपलं राजकीय भवितव्य अजमावत आहेत. तर दोन कोटी ५७ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

****



 औरंगाबाद लोकसभा मतदार संघातले १८ लाख ८६ हजारावर मतदार उद्या, एकूण दोन हजार २१ मतदान केंद्रांवर मतदान करतील. यामध्ये नऊ लाख ९२ हजारावर पुरूष, आठ लक्ष ९२ हजारावर महिला तर  २५ तृतीय पंथी मतदार आहेत. लोकसभा मतदारसंघातल्या ११ हजार १३१ दिव्यांग मतदारांना मतदानासाठी घरापासून मतदार केंद्रापर्यंत आणि मतदान केंद्रापासून घरापर्यंत पोहोचण्यासाठी शहरात 300 ऑटोरिक्षा नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचं, जिल्हाधिकारी तसंच निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी सांगितलं आहे.



 जालना लोकसभा मतदार संघात दोन हजार ५६ मतदान केंद्रावर १८ लाख ६५ हजार ४६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये नऊ लाख ८८ हजार ५१३ पुरुष, आठ लाख ७६ हजार ५२४ महिला मतदारांचा समावेश आहे. सैनिक मतदारांची संख्या दोन हजार १७४ असून त्यांच्यासह कर्तव्यावर असलेल्या ७३५ कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संवेदनशील ३९ केंद्रावर सशस्त्र बंदोबस्त तैनात असणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी ही माहिती दिली.



 अहमदनगर लोकसभा मतदार संघात उद्या १८ लाख ५४ हजारावर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी नऊ लाख ७० हजार ६३१ पुरुष तर आठ लाख ८३ हजार ५२९ महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदान प्रक्रियेसाठी  आठ हजार ९३२ अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आज मतदान साहित्यासह आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना होतील. मतदारांनी मोठया संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केलं.

****



 रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल दत्तात्रय तटकरे यांच्यासह आणखी दोन उमेदवार सुनिल सखाराम तटकरे  आणि सुनील पांडूरंग तटकरे निवडणूक रिंगणात आहेत, मात्र त्यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाचा हिशोब दाखल केला नाही आणि ते निवडणूक यंत्रणांच्या बैठकांना देखील उपस्थित राहिले नसल्यानं निवडणूक आयोगाने त्यांना नोटिसा बजावल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार आणि दिंडोरी इथं, भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार आहेत. नंदुरबारहून हिना गावीत आणि दिंडोरीहून डॉ भारती पवार निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही मतदार संघात पुढच्या सोमवारी २९ एप्रिलला मतदान होणार आहे.

****



 अमरावती जिल्ह्यातल्या  अठरा  रेतीघाटांच्या  लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यापोटी ३ कोटी ३९ लाखांचे महसुली उत्पन्न मिळालं आहे. शासनाच्या परवानगीनंतर खनिकर्म विभागानं ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. सध्या नवीन लिलाव प्रक्रिया सुरू असल्याची माहिती, जिल्हा खनिकर्म अधिकारी शिरीष नाईक यांनी दिली दिली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचं आपलं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्...