Sunday, 1 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.12.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 December  2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****

 राज्य सरकार मराठवाडा आणि विदर्भासाठी विशेष स्तरावर काम करेल, अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे. त्यांचं आज राज्य विधीमंडळ सदस्यांसमोर अभिभाषण झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी, बेरोजगार, महिला, ज्येष्ठ यांचे प्रश्र्न सोडवण्याला सरकार प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं. राज्याच्या पश्चिम भागात आलेल्या पुरामुळे फार मोठं नुकसान सहन करावं लागलं असून अन्य भागात दुष्काळ होता, त्यात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ सहाय्य देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकार शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी आवश्यक तरतूद करेल आणि तात्काळ नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जातील, तसंच  शेतकऱ्यांच्या आपत्तीचं निवारण करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा याकरता सरकार पुढाकार घेईल, असंही राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितलं.
****

 राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांची आज बिनविरोध निवड झाली, तर विरोधी पक्षनेतेपदी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. या निवडणुकीतले भाजपा उमेदवार किसन कथोरे यांनी आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे नाना पटोले यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असलेले नाना पटोले यांची सभागृहाच्या अध्यक्षपदी तर, प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करुन आपली मतं मांडणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल सर्व पक्षीय सदस्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला आहे.
****

 देवेंद्र फडणवीस यांचं केवळ विरोधी पक्षनेता म्हणून नाही, तर सभागृहातला एक जबाबदार नेता म्हणून अभिनंदन करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा हा मुख्यमंत्रिपदाइतकाच महत्वाचा आहे असं जयंत पाटील यांनी सांगितलं आणि फडणवीस  यांच्या अभ्यासू वृत्तीचा सभागृहाला याआधीप्रमाणेच  लाभ होईल अशा शब्दांत जयंत पाटील यांनी फडणवीस यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, प्रहारचे नेते बच्चू कडू, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी देखील अध्यक्ष पदावर नाना पटोले, तर  विरोधीपक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.
****

 तत्पूर्वी, विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून विधिज्ज्ञ यशोमती ठाकूर, शंभूराज देसाई, नवाब मलिक आणि कालिदास कोळंबकर यांच्या नियुक्तीची घोषणा हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केली.
****

 परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या  चारठाणा या गावापासून जवळच असलेल्या मौजे रायखेडा, मौजे मोळा या दोन्ही गावातल्या शेत जमिनी २००७-८ या वर्षामध्ये  रोजगार हमी योजनेअंतर्गत पाझर तलावासाठी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर जमिनींचा मोबदला या शेतकऱ्यांना मिळाला नाही. यासंदर्भात या गावांमधल्या शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, येत्या एक महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करुन शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. सुनावणीअंती न्यायालयानं प्रतिवादींना नोटीस जारी करण्याचेही आदेश दिले आहेत. यासंदर्भातली पुढील सुनावणी येत्या नऊ डिसेंबरला होणार आहे.
***

 जागतिक एड्स दिनानिमित्त हिंगोली शहरात आज विविध कार्यक्रम झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयापासून प्रभातफेरी काढण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीनिवास यांच्यासह विविध आधिकारी, आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक या फेरीत सहभागी झाले. सर्वांना यावेळी शपथ देण्यात आली. जनजागृती साठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमही या निमित्त घेण्यात आले.
****

 गडचिरोली जिल्ह्यातल्या वांगेपल्ली इथल्या प्राणहिता नदीत नाव उलटून झालेल्या अपघातात दोन जण बेपत्ता झाले आहेत. या अपघातामध्ये बुडालेल्या चार जणांना सुरक्षितरित्या नदीबाहेर काढण्यात आलं आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही दूर्घटना झाली. तेलंगणा राज्यातल्या आसिफाबाद जिल्ह्यातून प्रवासी घेऊन ही नाव वांगेपल्लीच्या दिशेने येत होती.
****

 लखनऊमध्ये झालेल्या सैयद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंट स्पर्धेच्या अंतिम लढतीत सौरभ वर्माला पराभवाचा सामना करावा लागला आहे. चीनी ताईपेईच्या वांग त्जू वेईनं त्याला सत्तेचाळीस मिनिटांच्या सामन्यात २१-१५, २१-१७ असं पराभूत केलं.
*****
***

No comments: