Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 04 January 2020
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०४ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
Ø महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांना वेळेत देण्यासाठी बँकांनी अचूक माहिती तत्काळ सादर करावी - मुख्यमंत्र्यांची सूचना
Ø नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थनासाठी भाजपचं विशेष अभियान
Ø औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वैधानिक पेच; आज निर्णय
आणि
Ø ‘सायबर सेफ वुमन’ मोहिमेला
राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
****
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती
योजनेचा लाभ शेतकऱ्यांना वेळेत देण्यासाठी बँकांनी अचूक माहिती तत्काळ सादर करावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी केली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय बँकर्स
समितीच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आगामी खरीप
हंगामात पीक कर्ज घेण्यासाठी शेतकरी
पात्र असणं गरजेचं आहे, त्यामुळे
कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीमध्ये बँकांनी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं. ३० सप्टेंबर २०१९ नंतर दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याज आकारु नये,
असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण २०२०
च्या अनुषगांनं मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातले महानगरपालिका आयुक्त
आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद
साधत, कचरामुक्त शहरांसाठी
घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करण्याची सूचना केली.
****
नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देऊ इच्छिणाऱ्या
नागरिकांसाठी भारतीय जनता पक्षानं मिस कॉल देण्याकरता ८८ ६६ २८ ८६ ६२ हा क्रमांक जाहीर
केला आहे. नागरिकत्व सुधारणा
कायद्याला समर्थन मिळवण्यासाठी उद्यापासून पक्ष दहा दिवसांचं
अभियान राबवत असून याकाळात तीन कोटी परिवारांशी
संपर्क साधला जाणार आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल राजस्थानातल्या जोधपूर
इथून नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेविषयी जनजागृती
अभियानाला प्रारंभ केला. जोधपूरमध्ये पाकिस्तानातून आलेल्या आणि भारताचं नागरिकत्व
मिळवण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या निर्वासितांची संख्या
लक्षणीय आहे.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक
प्रक्रिया काल स्थगित करण्यात आली, ही प्रक्रिया आज पूर्ण होणार आहे. शिवसेनेच्या विद्यमान
अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरल्यानं, निवडणुकीत चुरस निर्माण झाली. भाजप उमेदवारानं माघार
घेतल्यानं, काँग्रेसच्या मीना शेळके आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार
देवयानी डोणगावकर यांच्यात थेट लढत झाली. एका सदस्यानं दोन्ही उमेदवारांना मतदान
केलं, हा वैधानिक पेच निर्माण झाल्यानंतर सभागृहात गोंधळ झाल्यामुळे कालची विशेष सभा स्थगित करून, यावर आजच्या सभेत
निर्णय घेतला जाणार आहे.
****
बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी
आज निवड होत आहे. एकूण ६० सदस्य संख्या असलेल्या या जिल्हा परिषदेत, दोन सदस्यांच्या
जागा रिक्त झाल्या असून सहा सदस्यांचा मतदानाचा हक्क उच्च न्यायालयानं गोठवला आहे.
आज होणाऱ्या निवडणुकीचा निकाल येत्या १३ जानेवारी पर्यंत जाहीर करू नये असा आदेश ही
न्यायालयानं दिला आहे.
****
जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या
रंजना पाटील निवडून आल्या, तर जळगाव जिल्ह्यातल्या पंधरा पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी काल
झालेल्या निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक आठ जागा पटकावल्या, शिवसेनेनं पाच तर राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन जागा जिंकल्या.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती
सावित्रीबाई फुले यांना काल त्यांच्या जयंतीनिमित्तानं सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद सह जालना,
बीड, नांदेड, परभणी,
लातूरसह मराठवाड्यात सर्वत्र सावित्रीबाई फुले
यांना विविध पक्ष संघटनांच्या आदरांजली वाहण्यात आली.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त
राज्यातल्या महिला, युवतींसाठी
पोलिस दलाच्या सायबर विभागाच्या वतीनं ‘सायबर सेफ वुमन’ जनजागृती मोहीम राबवण्यात आली, या अभियानाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातले
३४ जिल्हे आणि दहा आयुक्तालयं अशा एकूण
दीडशे ठिकाणी झालेल्या कार्यशाळेत
हजारो महिला, महाविद्यालयीन युवती तसंच शालेय विद्यार्थीनींनी
सहभाग घेत, इंटरनेट, समाज माध्यमाचा
सुयोग्य वापर करण्याचा दृढ संकल्प केला.
औरंगाबाद पोलिस आयुक्त कार्यालयात 'सायबर सेफ वुमन' या विषयावरच्या कार्यशाळेत खासदार इम्तियाज जलिल यांनी मार्गदर्शन केलं.
इंटरनेटच्या धोक्यांपासून बचावासाठी तंत्रज्ञान वापरतांना सतर्कता बाळगणं
आवश्यक असल्याचं, ते म्हणाले.
लातूर इथंही या महिमेअंतर्गत काल कार्यशाळा घेण्यात आली. महिलांनी फक्त साक्षर असून चालणार नाही,
तर सायबर साक्षर झालं पाहीजं, असं मत पोलिस उपअधिक्षक
सचिन सांगळे यांनी यावेळी व्यक्त केलं.
परभणी इथं शिवाजी महाविद्यालयात झालेल्या
कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केलं. विशेष कक्ष दामिनी
किंवा छेडछाड विरोधी पथकात महिलांनी निर्भिडपणे
तक्रार दाखल करावी असं सूर्यवंशी यांनी सांगितलं.
हिंगोली इथं यानिमित्त घेतलेल्या कार्यशाळेत पोलीस अधिक्षक
योगेशकुमार यांनी मार्गदर्शन केलं. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आजच्या डिजिटल युगात
‘सायबर सुरक्षा’ हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून, त्याबाबत प्रत्येकानं सदैव सतर्क असावं
असं त्यांनी नमूद केलं.
****
तुळजापूर इथं कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या
शाकंभरी नवरात्र महोत्सवास कालपासून प्रारंभ झाला. मंचकी निद्रा संपल्यानंतर
देवी काल पहाटे सिंहासनारूढ झाली, त्यानंतर संभळाच्या कडकडाटात विधीवत घटस्थापना करण्यात
आली. काल पहिल्या दिवशी देवीच्या
दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
****
केंद्रीय सामजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारतीय कृत्रीम अवयव निर्माण महामंडळ
आणि जिल्हा परिषद लातूर यांच्या वतीनं लातूर जिल्ह्यातल्या दिव्यांगाना आवश्यक ते कृत्रिम अवयव देण्यासाठी जिल्ह्याच्या सर्व दहा तालुक्यात दिव्यांग तपासणी शिबिराचं
आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय दिव्यांग संस्थाचे कार्यकारी
सदस्य सुरेश पाटील यांच्या हस्ते काल लातूर इथून तपासणी शिबीरांना सुरुवात झाली.
****
औरंगाबादच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा स्वातंत्र्य सैनिक
वि.वा.देसाई स्मृती पुरस्कार, लातूर जिल्ह्यातल्या यमगरवाडीच्या भटके विमुक्त विकास
प्रतिष्ठानला, काल प्रदान करण्यात आला. हरिभक्त परायण जलाल महाराज
सय्यद यांचं यावेळी भारतीय तत्वज्ञान: जागतिक संदर्भ या विषयावर व्याख्यान झालं.
****
उस्मानाबाद इथल्या नियोजित त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या
प्रसिद्धीसाठी काल उमरगा तालुक्यातल्या अचलबेट इथून साहित्य ज्योत
काढण्यात आली. उमरगा शहरातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना साहित्य
संमेलनाची माहिती दिल्यानंतर ही साहित्य ज्योत यात्रा लोहारा मार्गे तुळजापूरकडे मार्गस्थ
झाली.
****
लातूरहून तिरुपती
आणि अजमेर इथं जाण्यासाठी साप्ताहिक रेल्वे सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वेच्या झोनल सल्लागार समितीचे सदस्य निजाम
शेख यांनी केली आहे. लातूर इथं काल मध्य रेल्वेच्या सल्लागार
झोनल समितीची बैठक महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ही मागणी करण्यात आली. लातूर - पुणे रेल्वे सुरु करावी, कोल्हापूर ते धनबाद दीक्षाभूमी
एक्स्प्रेस पंढरपूर- लातूर- नांदेड मार्गे सोडावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान,
- अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली असल्याचं दक्षिण
मध्य रेल्वेच्या नांदेड कार्यालयानं कळवलं आहे.
****
६५ व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेला कालपासून
अहमदनगर इथं प्रारंभ झाला. देशभरातून २६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment