आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या एकोनपन्नास मुलांना
नवी दिल्ली इथं भेटणार आहेत. ते या पुरस्कारप्राप्त मुलांशी यावेळी संवाद साधणार असल्याची
माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी दिली आहे.
****
संपूर्ण
देशात एक्काहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरु आहे. नवी दिल्लीत राजपथावरच्या
संचलनाची तयारी उत्साहात सुरु आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संरक्षणदलांकडून
मानवंदना स्वीकारतील. या समारंभाला ब्राझीलचे अध्यक्ष जैर मेसियास बॉलसोनरो हे प्रमुख
पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
****
दिल्ली
विधानसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या एकूण उमेदवारी अर्जांपैकी छाननीनंतर सातशे अर्ज
वैध ठरले आहेत. विधानसभेच्या सत्तर जागांसाठी एकूण एक हजार एकोणतीस उमेदवारांनी अर्ज
दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. निवडणुकीचं एकूण
वातावरण बघता दिल्ली विधानसभेमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढ्च्या
महिन्याच्या आठ तारखेला मतदान होणार आहे.
****
सौदी अरेबियाच्या
एका रुग्णालयात काम करणारी एक भारतीय परिचारिका कोरोना विषाणूनं बाधित झाल्याचं समोर
आलं आहे. तिच्या सहकाऱ्यांपैकी अनेक परिचारिका केरळमधल्या आहेत. या बाधित परिचारिकेवर
उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा होत आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार
राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली आहे.
****
नागरिकत्व
सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात वंचित बहुजन आघाडीनं पुकारलेल्या
महाराष्ट्र बंदला हिंगोली शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. वाशीम जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बंद पाळला जात
आहे. या कायद्याविरोधात देशभर आंदोलनं होत असून, त्याचा काहीच परिणाम सरकारवर होताना
दिसत नसल्यानं वंचित बहुजन आघाडीनं आंदोलनाच्या पुढं जाऊन महाराष्ट्र बंद करण्याचा
निर्णय घेतला असल्याचं पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment