Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 27 January 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जानेवारी २०२० सायंकाळी ६.००
****
मुंबईत कोरोना विषाणूच्या
एका संशयित रुग्णाला कस्तुरबा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताडदेव इथले रहिवासी अभिषेक बाफना हे ३ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीत
चीनमध्ये होते. कोरोना संदर्भातल्या उपचारांबाबत कस्तुरबा रूग्णालयात उभारलेल्या स्वतंत्र
कक्षात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
****
दुधाची स्वच्छता आणि
गुणवत्तेसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्लास्टिकच्या कॅन वापरू नयेत, असा सल्ला औरंगाबाद
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी दिला आहे. औरंगाबाद
इथं दूध उत्पादक संघाच्या गांधेली इथल्या दुग्धशाळेचं विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण प्रकल्पाचं
उद्घाटन रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी
बागडे बोलत होते. बीड जिल्ह्यात पाटोदा आणि आष्टी तालुका हा डोंगराळ भाग असूनही तिथून
दोन लाख लीटर पेक्षा अधिक दूध उत्पादन केलं जातं, असं सांगतानाच दूध उत्पादकांची चिकाटी
आणि कामसूपणाचं बागडे यांनी कौतुक केलं.
****
दोंडाईचा शहराच्या नगराध्यक्षा आणि शिंदखेड्याचे
भाजपा आमदार जयकुमार रावल यांच्या विरुध्द आक्षेपार्ह मजकुराची पत्रकं वाटल्या प्रकरणी
दोंडाईचा पोलिस ठाण्यात ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किशोर शामराव
भिल यांनी तक्रार केली होती त्यानुसार काल दोंडाईचा शहरातील रावल स्टेडीयममध्ये तसंच
परिसरात आक्षेपार्ह मजकूर छापलेल्या पत्रकांचे वाटप केलं गेल्याचं आढळून आलं. सहा जणांविरुध्द
गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर सीमा भोळे यांनी
राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या भारती सोनवणे यांची
बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेनंही भाजपला समर्थन दिल्याने त्यांची निवड बिनविरोध
झाली. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी सोनवणे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली
आहे.
****
बीड इथं १० वा राष्ट्रीय मतदार दिन मोठया उत्साहात
साजरा करण्यात आला. सकाळी शालेय विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रभातफेरी
काढून त्यानंतर जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी राष्ट्रीय मतदार
दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली. यावेळी
उत्कृष्ट काम करणारे अधिकारी आणि तरुण मतदार, दिव्यांग मतदार इत्यादींचा प्रमाणपत्र
देऊन प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला.
****
परभणी तालुक्यातील पीएम-किसान
अंतर्गत लाभार्थ्यांनी केंद्र सरकारच्या नवीन सूचनेप्रमाणे पीएम-किसान योजनेचा लाभ
घेण्यासाठी आधार कार्डावरील नावात योग्य दुरुस्ती करावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात
आलं आहे. या योजनेत पोर्टलवरील आणि आधारकार्डवरचं नाव सारखं नसल्यास या योजनेचा लाभ
मिळू शकणार नाही.
दरम्यान, मतदार पडताळणी कार्यक्रमाबाबत
कुठलाही गैरसमज न ठेवता आपल्याकडे आलेल्या बीएलओंना माहिती देवून या मोहीमेला सहकार्य
करावं असं आवाहन परभणीचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केलं आहे.
****
पार्श्वगायक अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार
जाहीर करणं, हा एकशे तीस कोटी भारतीयांचा अपमान असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं
म्हटलं आहे. पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी, आज मुंबईत पीटीआयशी बोलताना, नागरिकत्व
सुधारणा कायदा तसंच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या दोन निर्णयांवरून होत असलेल्या टीकेवर
सारवा सारव म्हणून हा पुरस्कार जाहीर केल्याची टीका केली.
****
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील लोणंद इथं
सोना अलोईज या कंपनीच्या व्यवस्थापाकास मारहाण करत खंडणी मागितल्या प्रकरणी माजी खासदार
उदयनराजे भोसले यांच्यासह १२ जणांची सातारा जिल्हा न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता
केली. २०१७ यावर्षी ही घटना घडली होती.
****
मेलबर्न इथं सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस
स्पर्धेच्या मिश्र दुहेरी उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या रोहन बोपन्ना आणि युक्रेनच्या
नादिया किचेनोक यांनी प्रवेश केला. या जोडीनं निकोल मेलिचार आणि ब्रूनो सोरेस या जोडीला ६-४, ७-६ अशा फरकानं
पराभूत केलं. लिएंडर पेस आणि जेलेना ओस्टापेंको या जोडीनं मिश्र
दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच या दोघांनी पुरुष
एकेरी फेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
****
ऑकलंड इथं झालेल्या भारत आणि न्यूझीलंडच्या महिला
हॉकी संघांत आज दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला २-१ असं पराभूत केलं.
*****
***
No comments:
Post a Comment