Wednesday, 22 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.01.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 January 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जानेवारी २०२० सायंकाळी ६.००
****

 इतर मागास वर्ग आयोगाच्या कार्यकाळाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.

 दीव-दमण आणि दादरा नगर हवेलीचं एकत्रीकरण होऊन नव्यानं तयार झालेल्या केंद्र शासित प्रदेशाची, दमण हे शहर राजधानी असेल, या निर्णयालाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

 देशातल्या सहा राष्ट्रीय तंत्रज्ञान विद्यापीठांसाठी चार हजार तीनशे एक्काहत्तर कोटी रुपयांचा निधीही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला.
****

 राज्य मंत्रिमंडळाची आज मुंबईत बैठक झाली, मुंबई शहर आणि उपनगरात येत्या सव्वीस तारखेपासून मॉल्स आणि व्यापारी आस्थापनं रात्रभर सुरु ठेवण्याच्या निर्णयाला या बैठकीत मंजूरी देण्यात आली. रात्रभर आस्थापनं चालू ठेवणं कोणासही बंधनकारक नसेल, तसंच पब आणि बारसाठीची कालमर्यादा मात्र कायम राहणार आहे. या निर्णयामुळे सेवा क्षेत्रातली मनुष्य बळाची गरज वाढून रोजगार निर्मितीला हातभार लागेल, असं मत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.

 कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणारी, २०१७ मध्ये केलेली सुधारणा रद्द करून, पूर्वीप्रमाणे विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्यांची निवड करण्याला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची थेट निवड पद्धतही रद्द करण्यात आली आहे. आता निवडून आलेल्या नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णयही आजच्या या बैठकीत घेण्यात आला.

 ”तान्हाजी-द अनसंग वॉरियर” या हिंदी चित्रपटाला राज्य वस्तू आणि सेवा करातून सूट देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.

 महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा अधिनियम, २०१९ मध्ये अनुषगिक सुधारणा करण्याचा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****

 येत्या प्रजासत्ताक दिनापासून सुरू होणार असलेल्या ”शिवभोजन” योजनेसाठी आधारकार्ड दाखवण्याची सक्ती नसल्याचा खुलासा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. या योजनेंतर्गत सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात तसंच महानगरपालिका क्षेत्रात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे. या योजनेनुसार एका भोजनालयात दररोज दुपारी बारा ते दोन या वेळेत किमान ७५ तर कमाल दीडशे थाळी भोजन, दहा रुपये दराप्रमाणे उपलब्ध असेल.
****

 ब्राह्मण समाजाच्या उत्थानासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, तसंच समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित मान्य कराव्यात यासाठी ब्राह्मण समाजाच्या वतीनं बीड इथं जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आज धरणं आंदोलन करण्यात आलं. या मागण्यांचं निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना देण्यात आलं.
****

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या रोजंदारी कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर धरणे आंदोलन केलं. भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं.
****

 मकर संक्रांतीच्या औचित्यानं एक नवा प्रयोग करत वाशिम नगरपालिकेनं शहरातल्या महिलांना वाण म्हणून कचरा पेट्यांचं वाटप केलं. घरातल्या कचऱ्याचं वर्गीकरणही व्हावं, यासाठी लाल आणि निळ्या अशा दोन रंगांच्या सुमारे अकरा हजार कचरापेट्या, नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्या हस्ते महिलांना देण्यात आल्या. आपल्या घरासह शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
****

 मराठवाड्यात प्राचीन काळापासून दिसून येत असलेला शिल्पकलेचा आविष्कार हा मराठवाड्याच्या आर्थिक आणि सामाजिक संपन्नतेचं प्रतक आहे, असं मत ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर देव यांनी व्यक्त केलं आहे. ते आज औरंगाबाद इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात सुरू असलेल्या इतिहास महोत्सवातल्या परिसंवादात बोलत होते. या परिसंवादात राज्य पुरातत्व आणि वस्तू संग्रहालयाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे, यांच्यासह अनेक मान्यवरांची व्याख्यानं झाली.
****

 होमगार्डना १८० दिवस काम देण्याच्या निर्णयाची स्थगिती उठवून थकित मानधन त्वरित द्यावं, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
*****
***

No comments: