Saturday, 25 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.01.2020 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 January 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ जानेवारी २०२० दुपारी१.०० वाजता
****

 टेंभू जलसिंचन योजनेच्या सर्व अपूर्ण कामांना आणि शेवटच्या सहाव्या टप्प्याला राज्य सरकारनं तत्वतः मंजुरी दिली आहे.

 मुंबईत  मंत्रालयात काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस जलसंपदामंत्री जयंत पाटील, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.
टेंभू योजनेची कामं १९९६ पासून  निधीसाठी रखडली होती. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातल्या वंचित गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातल्या कायम दुष्काळी अशा सुमारे पन्नास गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
****

 कृषी प्रदर्शनातून आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळते त्यामुळे शेतकऱ्याला शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं, असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातल्या कळस इथं काल चार दिवसीकृषी प्रदर्शनाचं उद्धाटन केल्यानंतर ते बोलत होते. पशुजन्य उत्पादनांची मागणी लक्षात घेता, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच पशुपालन करावं असं आवाहनही आठवले यांनी यावेळी केलं.
****

 लोकसभा तसंच विधानसभा २०१९ च्या निवडणुकांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात मतदार जनजागृती अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सुमारे  ३५ हजार चारशे सत्त्याहत्तर उपक्रमांची लंडनच्या वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये जागतिक विश्वविक्रम म्हणून नोंद झाली आहे. या विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र नगरच्या स्वीप समितीला  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते देण्यात आलं.

 १ जानेवारी २०१९ ते २० एप्रिल २०१९ आणि १ जुलै २०१९ ते १९ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये  २७ प्रकारच्या  ३५ हजार  ४७७ उपक्रमांची दखल लंडनच्या वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली.

 अहमदनगर जिल्हास्वीप समितीनं गाव, तालुका, शहर  तसंच जिल्हा  पातळीवर विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयं, सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालय तसेच कॅम्पस अँम्बेसिडर, यांच्या माध्यमातून  उपक्रम राबवले.
****

 परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ इथल्या श्री महालिंगेश्वर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक पंढरीनाथ जोशी यांना पाच हजार रुपये लाच घेताना काल अटक करण्यात आली. सातव्या वेतन आयोगानुसार वेतन फरकाचं देयक काढण्यासाठी त्यानं सहा हजार रुपये लाच मागितली होती, तडजोडीअंती पाच हजार रुपये घेताना लाचलुपचत प्रतिबंधक पथकानं सापळा रचून त्यास अटक केली..
****

 बीड जिल्ह्यात रस्ते अपघातातल्या मृत्यूंचं प्रमाण ७ टक्क्या पर्यंत कमी करण्यात यश आलं असल्याची माहिती जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा संसदीय क्षेत्र समितीच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी दिली. यासंदर्भात बीड इथं घेण्यात आलेल्या बैठकीत काल त्या बोलत होत्या.

 अपघात घडणारी ठिकाणं आणि अपघातप्रवण ब्लॅाक स्पॉटबाबत संबंधित विभागांनी केलेल्या उपाययोजनांमुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी, मांजरसुंबा, नामलगाव अशा ठिकाणांवरील पूर्वीचं अपघात प्रवण क्षेत्र कमी करण्यात यश आलं असल्याचं मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

 जिल्ह्यात नव्यानं काही अपघातप्रवण ठिकाणं तयार झाली आहेत.  याबाबतची माहिती पाहून तालुकास्तरावर आमदारांच्या उपस्थितीत बैठक घेऊन या अनुषंगानं उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी संबंधित विभागांनी कार्यवाही करावी अश्या सूचनाही त्यांनी दिली.

     अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. यामध्ये दुचाकी धारकांनी  हेल्मेटचा वापर करणं, चार चाकी चालकांनी सीट बेल्टचा वापर करणं याच बरोबर मद्य पिऊन वाहन न चालवणं अशा उपायांची गरज आहे. लोकांमध्ये जनजागृती बरोबरच नियमांची अंमलबजावणी देखील केली जावी. असे खासदार डॉ. मुंडे म्हणाल्या.
****

 देशभरात आज राष्ट्रीय मतदार दिन साजरा होत आहे. औरंगाबाद इथं छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्यात येत आहे. यावेळी उपस्थितांना मतदार जनजागृतीची शपथ देण्यात आली.  जिल्ह्यात सध्या ६० हजार नवमतदारांची नोंदणी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.
*****
***

No comments: