Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 26 January 2020
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २६ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** भारतीय प्रजासत्ताक दिनाचा देशभर उत्साह; दिल्लीत राजपथावर
मुख्य सोहळा
** देशभरातल्या १४१ जणांना पद्म पुरस्कार; जॉर्ज फर्नांडिस, सुषमा स्वराज, आणि अरुण जेटली यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर मनोहर पर्रिकर यांना पद्मभूषण पुरस्कार, हिवरे बाजारचे
सरपंच पोपटराव पवार, बीज रक्षक राहीबाई पोपेरे आणि सय्यद महबूब शाह कादरी यांचा पद्मश्रीने
गौरव
** औरंगाबादचे सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलिस निरीक्षक गौतम पातारे, जालन्याचे सुभाष भुजंग, आणि नांदेडचे उपनिरीक्षक जमील
इस्माईल सय्यद यांना गुणवत्तापूर्ण सेवा पोलिस पदक
**
आणि
** हिंगोली
जिल्ह्यातल्या नऊ गावांचा नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याच्या मागणीसाठी
रस्ता
रोको आंदोलन
****
भारतीय प्रजासत्ताक
दिनाचा एकाहत्तरावा वर्धापनदिन आज देशभर उत्साहात साजरा होत आहे. शैक्षणिक संस्थांमधून
विद्यार्थ्यांनी प्रभात फेऱ्या काढल्या असून अनेक शासकीय तसंच खाजगी इमारतींवर विद्युत
रोषणाई करण्यात आली आहे. रांगोळी तसंच फुलांनी अनेक रस्तेही फुलले आहेत. प्रजासत्ताक दिनाचा
मुख्य ध्वजारोहण सोहळा दिल्लीत राजपथावर होत आहे. राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, त्यानंतर राष्ट्रपती तिन्ही सैन्य दलांची मानवंदना
स्वीकारतील. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे
म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सोळा राज्यं, केंद्रशासित प्रदेश
आणि सहा केंद्रीय मंत्रालय सहभागी होणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये
यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
सर्व राज्य आणि केंद्रशासित
प्रदेशांमध्येही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येत आहे.
****
देशाची प्रगती आणि
जनकल्याण यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंची भूमिका महत्त्वाची असल्याचं, राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांनी म्हटलं आहे. ते काल
राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात बोलत होते. सत्य आणि अहिंसा हे
महात्मा गांधीजींचे विचार आजही राष्ट्र उभारणीच्या कार्यात मार्गदर्शक असल्याचं
सांगतानाच, हे विचार आपल्या दैनंदिन सवयींचा भाग होणं, आवश्यक बनल्याचं राष्ट्रपती
म्हणाले. स्वत:सोबतच संपूर्ण मानवजातीसाठी सुरक्षित आणि समृद्ध भविष्य घडवण्यासाठी
आपण कटिबद्ध असलं पाहिले, असंही राष्ट्रपतींनी नमूद केलं.
****
केंद्र सरकारने काल १४१ जणांना
पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केली. यामध्ये सात जणांना पद्मविभूषण, १६ जणांना पद्मभूषण
तर ११८ जणांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले आहेत. यामध्ये ३४ महिला आणि १८ विदेशी
नागरिकांचा समावेश आहे. त्याचबरोबर १८ जणांना मरणोत्तर पद्म सन्मान देण्यात आला आहे.
माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस, माजी परराष्ट्र
व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना सामाजिक कार्यासाठी, मरणोत्तर
पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. क्रिडा विभागात मुष्टीयुद्धपटू एम सी मेरी
कोम, कला विभागात बनारसचे शास्त्रीय गायक छन्नुलाल मिश्रा तर सामाजिक कार्यासाठी
मॉरिशसचे नेते सर अनिरुद्ध जगन्नाथ यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर
यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. गायक अजय चक्रवर्ती, व्यापार आणि उद्योग - आनंद
महिंद्रा, क्रिडा - बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांना पद्मभूषण परस्कार जाहीर झाला
आहे.
क्रिकेटपटू जहीर खान, हिवरे बाजारचे
सरपंच पोपटराव पवार आणि सय्यद महबूब शाह कादरी उर्फ सय्यदभाई - सामाजिक कार्य, राहीबाई पोपेरे -
कृषी, डॉक्टर रमण गंगाखेडकर - विज्ञान आणि तंत्रज्ञान, डॉ.संद्रा डेसा सुझा -
वैद्यकीय सेवेसाठी तर कला क्षेत्रातून गायक सुरेश वाडकर, अदनान सामी, करण जोहर, सरीता जोशी, एकता कपूर, कंगना रनौट यांचा पद्मश्री पुरस्कार
विजेत्यांमध्ये समावेश आहे.
****
लष्कराची शौर्य
पदकंही काल जाहीर झाली. सहा शौर्य चक्र, चार उत्तम युद्ध सेवा पदकं, आठ युद्ध सेवा पदकं, यासोबतच परमविशिष्ट
सेवा पदकं, अतिविशिष्ट सेवा पदकं, तसंच विशिष्ट सेवा पदकांचा यात समावेश आहे.
****
राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांनी २०१९ साठीच्या ‘जीवन रक्षा पदकां’ना मंजुरी दिली आहे. ५४ जणांना ही
पदकं जाहीर झाली आहेत. सर्वोत्तम जीवन रक्षा पदकं सात जणांना दिली जाणार असून, यात
महाराष्ट्रातल्या महेश साबळे यांचा समावेश आहे. आठ जणांना उत्तम जीवन रक्षा पदक
दिले जाणार आहेत. ३९ जणांना जीवन रक्षा पदक जाहीर झाली असून यात राज्यातल्या एम.
कार्तिकेयन, कुमारी प्रमोद देवदे, मास्टर शिवराज भंडारवाड आणि दत्तात्रय तेंगले यांचा समावेश
आहे
****
केंद्रीय
गृहमंत्रालयानं पोलीस पदकांची काल घोषणा केली. देशातल्या चार जणांना शौर्यासाठीचं
राष्ट्रपती पोलीस पदक, २८६ जणांना शौर्यासाठीचं पोलीस पदक, ९३ जणांना सर्वोत्कृष्ट
सेवेसाठीचं राष्ट्रपती पोलीस पदक आणि ६५७ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचं पोलीस
पदक जाहीर करण्यात आली. यामध्ये राज्यातल्या दहा जणांना शौर्यासाठीचं पोलीस पदक, चार जणांना
सर्वोत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर चाळीस पोलिस अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा पोलिस पदकं जाहीर करण्यात आली, यामध्ये
मराठवाड्यातले औरंगाबाद इथले सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ, औरंगाबाद इथेच
दहशतवाद विरोधी पथकातले पोलिस निरीक्षक गौतम पातारे, जालना इथले सायबर विभागातले
पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, नांदेड इथले राखीव पोलिस दलातले पोलिस उपनिरीक्षक
जमील इस्माईल सय्यद यांचा समावेश आहे.
औरंगाबाद मध्यवर्ती
कारागृहातले सुभेदार प्रमोद दादू गायकवाड यांना राष्ट्रपती सुधार सेवा पदक जाहीर
झालं आहे.
****
मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देश
केवळ पारतंत्र्यातून मुक्त होणं महत्वाचं नव्हतं तर इथल्या प्रत्येक नागरिकाला
हक्क आणि अधिकार मिळणं आणि प्रत्येकाला स्वातंत्र्यांच्या जोडीनेच समानता मिळणं
गरजेचं होतं आणि म्हणूनच या महान लोकशाहीचं रक्षण करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य
असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. आकाशवाणीवरून आज सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. या
मालिकेचा हा ६१ वा भाग असेल.
****
कोरेगाव भिमा हिंसाचार आणि एल्गार परिषदेचा
तपास केंद्र सरकारनं राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएकडे सोपवताना राज्य सरकारसोबत कोणताही
संवाद आणि राज्य सरकारच्या परवानगी न घेता सोपवल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी
म्हटलं आहे. केंद्र सरकारची ही कृती घटनाबाह्य असून, याबाबत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं
त्यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात समाविष्ट असलेल्या नऊ गावांच्या ग्रामस्थांनी आम्हाला
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यात समाविष्ट करावं या मागणीसाठी नांदेड-हिंगोली
राष्ट्रीय महामार्गावर डोंगरकडा इथं रास्ता रोको आंदोलन केलं. सकाळी साडेअकरा वाजेच्या
सुमारास राष्ट्रीय महामार्ग तासभर अडवल्यामुळे वाहनांची मोठी गर्दी झाली होती. कळमनुरी
तालुक्यातल्या डोंगरकडा, हिवरा, वरुड, झुनझुनवाडी, भाटेगाव, जामगव्हाण, सुकळी, जवळा,
वडगाव या नऊ गावचे ग्रामस्थ या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. तहसीलदार
कैलाशचंद्र वाघमारे यांना आंदोलकांनी मागणीचं निवेदन दिलं.
****
राज्य शासनाच्या
शिवभोजन योजनेला आजपासून सुरुवात होत आहे. औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा इथल्या
जिल्हा सामान्य रूग्णालात, लातूर शहरात एसटी कॅंटीन आणि कृषी उत्पन्न बाजार समिती गेट
समोर, तर जालना इथं जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील प्रसाद भोजनालय आणि जिल्हा महिला
रुग्णालयासमोर शिवभोजन भोजनालय सुरु होणार आहे.
****
पदवीधर मतदार
नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी
बलदेव सिंह यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं राष्ट्रीय मतदार दिनाच्या
अनुषंगानं आयोजित विशेष कार्यक्रमात बोलत होते. पदवीधर मतदारांची ऑनलाईन नोंदणी
प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक संस्थाना सुकाणू समिती म्हणून नियुक्त
करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तर देशाचं भवितव्य
ठरवण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं आवाहन निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र
चपळगावकर यांनी केलं.
विभागात सर्वत्र
राष्ट्रीय मतदार दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.
उस्मानाबाद इथं
मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीनं विविध कार्यक्रम घेण्यात आले. नांदेड
जिल्ह्याच्या मुदखेड शहरात, तसंच जालना इथंही मतदार जनजागरण फेरी काढण्यात आली.
****
राष्ट्रवादी युवक
काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पाटील यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं
निधन झालं, ते ५० वर्षांचे होते. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरचे सरपंच तसंच तेर इथल्या
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते मेहुणे, तसंच माजी खासदार डॉक्टर
पद्मसिंह पाटील यांचे ते भाऊ होत.
****
परभणी जिल्ह्याचे
पालकमंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा वार्षिक नियोजन समितीची
बैठक झाली, या बैठकीत जिल्ह्याच्या २०२०-२१ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या २१९ कोटी दोन
लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेचा
निधी वाढवण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार असल्याचं मलिक यावेळी
म्हणाले.
****
हिंगोली जिल्हा
वार्षिक योजनेअंतर्गत पुढच्या आर्थिक वर्षासाठी १७१ कोटी ७० लाख ५१ हजार रुपये
खर्चाच्या प्रारुप आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री वर्षा गायकवाड
यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महात्मा
ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत मिळावा याकरीता प्रशासनाने
प्रयत्न करण्याचे निर्देश गायकवाड यांनी दिले.
***
No comments:
Post a Comment