Saturday, 25 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.01.2020 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 January 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक२५ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****

Ø  राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
Ø  नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद
Ø  आज राष्ट्रीय मतदार दिवस
आणि
Ø  न्यूझीलंडविरुद्ध टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताचा सहा गडी राखून विजय
****

 राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे फोन टॅपिंग अर्थात दूरध्वनीवरचं संभाषण ध्वनिमुद्रीत केल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन भारतीय जनता पक्ष सरकारनं त्यावेळी विरोधी पक्षांत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे दूरध्वनी `टॅप` करण्यासाठी काही अधिकाऱ्यांना आवश्यक प्रणाली खरेदी करायला इस्त्रायलला पाठवलं होतं, असा आरोपही देशमुख यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून, दूरध्वनी `टॅप` करणं ही राज्याची संस्कृती नसल्याचं नमूद केलं आहे.
****

 नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात वंचित बहुजन आघाडीनं काल पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागलं.

 औरंगाबाद शहरातल्या शहागंज, कॅनॉट परिसर, इथं बंद पाळण्यात आला. औरंगाबादमध्ये महापालिकेच्या शहर वाहतूक बसवर तसंच पैठण मार्गावर परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक करण्यात आली.

 परभणी जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीनं मोर्चा काढून आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं. 

 हिंगोली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलकांनी मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

 नांदेड जिल्ह्यातही ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. नांदेड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं.

 राज्यात इतरत्रही, वाशिम, सातारा, सोलापूर, धुळे याठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.



 मुंबईतल्या घाटकोपरमध्ये पूर्व जलदगती महामार्गावरची वाहनं अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यात सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

 दरम्यान, हा बंद यशस्वी झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मुंबईत काल ते वार्ताहरांशी बोलत होते. बंदच्या काळात जोर जबरदस्तीनं जनजीवन बंद पाडण्यात आलेलं नाही, तसंच शांततापूर्ण बंद पुकारण्यात आला होता, असं त्यांनी सांगितलं. देशात पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोर असल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आरोप निराधार असून, त्यांनी घुसखोरांचे आकडे आणि पुरावे द्यावेत, अशी मागणीही आंबेडकर यांनी यावेळी केली. येत्या नऊ फेब्रुवारीचा मनसेचा प्रस्तावित मोर्चा हा केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 
****

 केंद्र सरकारनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या दिल्लीतल्या घराची सुरक्षा हटवल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही सुरक्षा हटवल्याचं पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता ही सुरक्षा हटवण्यात आल्याचं पवार यांच्या कार्यलयातून सांगण्यात आलं. पवारांसोबत आणखी ३९ जणांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे.
****

 प्रजासत्ताक दिनी सुरु होणाऱ्या शिवभोजन योजनेचा लाभ देताना स्वच्छता आणि शुद्ध जेवणाकडे लक्ष ठेवण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. मंत्रालयात काल शिवभोजन योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
****

 ७१व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संध्याकाळी सात वाजता देशाला संबोधित करणार आहेत. आकाशवाणीवर सुरवातीला हिंदीतून आणि नंतर इंग्रजीमधून राष्ट्रपतींच्या संदेशाचं प्रसारण होणार आहे. प्रादेशिक भाषांमधून या संदेशाचा अनुवाद रात्री साडे नऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी २६ जानेवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणीवरून उद्या सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. या मालिकेचा हा ६१वा भाग असेल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 राष्ट्रीय मतदार दिवस आज पाळला जात आहे. यानिमित्त मंत्रालयात काल अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली. सशक्त लोकशाहीकरिता निवडणूक साक्षरता हे राष्ट्रीय मतदार दिनाचं यंदाचं ब्रीद असल्याचं अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

 औरंगाबाद इथल्या जिल्हा माहिती कार्यालयातही मतदार दिनाची प्रतिज्ञा देण्यात दिली.

 हिंगोली इथं यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी, लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकानं मतदान करणं आवश्यक असून त्यासाठी मतदार यादीत नावनोंदणी करण्याचं आवाहन केलं.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयातही मतदार दिनानिमित्त शपथ देण्यात आली.
****

 न्यूझीलंडविरुद्धच्या ऑकलंड इथं झालेल्या पहिल्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात काल भारतानं सहा गडी आणि एक षटक राखत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या संघानं विजयासाठी भारताला २०४ धावाचं लक्ष्य दिलं होतं. श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं हे लक्ष्य एकोणीसाव्या षटकांतच पार केलं. पाच सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे.
****

 लातूर शहराला उजनी धरणातून पाणी देण्याबाबत विचार सुरु असून, याकरता तयार करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेची व्यावहारिकता जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनानं तपासावी, अशी सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. लातूर इथं काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा वार्षिक योजना सन २०२० - २१ साठी ३०७ कोटी ६४ लाख ८९ हजाराच्या प्रारुप आराखडयास यावेळी मान्यता देण्यात आली. विकासात्मक योजना राबवण्यासाठी दिला जाणार निधी संबंधित योजनांवर खर्च करण्याची गांभीर्यपूर्वक दक्षता घ्यावी आणि विकास योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावा, असं देशमुख यावेळी म्हणाले.
****

 जालना इथं काल पालकमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. जिल्हा वार्षिक योजनेतून वर्ष २०२०-२१ साठीच्या २५७ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्याला नियोजन समितीनं या बैठकीत मान्यता दिली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोठेवून काम करण्याचं आवाहन टोपे यांनी यावेळी केलं.
****

 औरंगाबाद महापालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची माहिती औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. या निवडणुकीत कोणत्याही पक्षांसोबत युती केली जाणार नसल्याचं सावे यांनी सांगितलं.
****

 बीड जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची काल बिनविरोध निवड झाली. समाज कल्याण सभापतीपदी माजलगाव तालुक्यातले कल्याण आबुज, महिला आणि बालकल्याण सभापतीपदी गेवराई तालुक्यातल्या शिवसेनेच्या यशोदाबाई जाधव यांची निवड झाली. माजलगाव तालुक्यातले जिल्हा परिषद सदस्य जयसिंह धैर्यशील सोळंके आणि गेवराई तालुक्यातल्या सविता मस्के यांची विषय समिती नंतर जाहीर केली जाणार आहे.
****

 लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथल्या रेणा सहकारी  साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या एकूण १९ जागेसाठी १९ अर्ज आल्याचं ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. सहा फेब्रुवारीनंतर संचालक मंडळाची औपचारिक घोषणा करण्यात येईल, असं निवडणूक अधिकारी तथा ज़िल्हा उप निबंधक समृत जाधव यांनी सांगितलं.
****


नांदेड जिल्ह्यातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव लहानकर यांचं काल सकाळी नांदेड इथं निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते. लहानकर हे डोंगरकड्याच्या मराठवाडा सहकारी साखर कारखान्याचे माजी प्रशासकीय अध्यक्ष, तसंच नांदेड पंचायत समितीचे सभापती होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल नांदेड इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****

 जमिनीच्या सुपिकतेसाठी शेतीला पशुधनाची जोड देण्याची गरज असल्याचं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विलास पाटील यांनी म्हटलं आहे. लातूर इथल्या श्री केशवराज शैक्षणिक संकुलाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काल झालेल्या कृषि  चेतना शिबीरात  ते बोलत होते. शेतीमध्ये सेंद्रीय पदार्थांच्या वापराचं महत्त्व सांगतानाच डॉ. पाटील यांनी, पिकांचा फेरपालटही आवश्यक असल्याचं नमूद केलं.
****

 जालना इथं काल जैन गुरु गणेशलाल महाराज यांच्या ५८व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हजारो भाविकांनी गुरु गणेश तपोधान इथं महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
*****
***

No comments: