Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 24 January 2020
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २४ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** घुसखोरांना देशाबाहेर घालवण्यासाठी केंद्र सरकारला पाठिंबा
देण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्णय;
शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा सोडला नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण
** मराठवाड्यातल्या
सहा धरणांमधून शेतीसाठी पाणी पुरवठा करण्याच्या नियोजनाला मंजुरी
** नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय
नागरिकत्व नोंदणी विरोधात वंचित बहुजन आघाडीचा आज महाराष्ट्र
बंद
आणि
** भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या
मालिकेला आजपासून सुरुवात
****
बांग्लादेश तसंच पाकिस्तानातून आलेल्या घुसखोरांना देशाबाहेर घालवण्यासाठी केंद्र
सरकारला पूर्ण पाठिंबा असून, या कारवाईच्या मागणीसाठी येत्या
नऊ फेब्रुवारीला मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा काढणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पक्षाच्या
अधिवेशनात बोलत होते. नागरिकत्वाच्या मुद्यावर देशानं कडक भूमिका
घेणं गरजेचं असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. या अधिवेशनात ठाकरे यांनी
पक्षाच्या नवीन झेंड्याचं अनावरण केलं. सकारात्मक
गोष्टींसाठी बदल हा आवश्यक असल्यामुळेच झेंडा बदलला. शिवरायांची
राजमुद्रा असलेला हा झेंडा निवडणूक काळात वापरायचा नाही, त्यावेळी
पक्षाचं निवडणूक चिन्ह रेल्वे इंजीन असलेला झेंडा वापरायचा, असे
स्पष्ट निर्देश राज ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिले. मराठी
आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर कधीही तडजोड नाही, याबाबत आपली भूमिका
कायम असल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलं.
सरकारच्या प्रत्येक खात्याच्या कामकाजावर लक्ष
ठेवण्यासाठी पक्षाच्या विशेष समित्या काम करतील, असं ते म्हणाले.
****
मुख्यमंत्रीपदाचा मान शिवसैनिकांना समर्पित करत असल्याचं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या
जयंतीनिमित्त मुंबईत काल शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा साजरा झाला. यावेळी शिवसैनिकांच्या
वतीनं मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी
काँग्रेससोबत उघडपणे सत्ता स्थापन केली असून, शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा सोडला नसल्याचं
ठाकरे यांनी स्पष्ट केलं. यावेळी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचाही सत्कार करण्यात आला.
****
जलसंपदा, जलसंधारण आणि पाणीपुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या
व्यक्तींना माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार
देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. राज्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले
जलसंस्कृतीचे जनक शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा निर्णय
घेण्यात आला. नांदेड शहरातल्या विष्णुपुरी प्रकल्पाजवळ चव्हाण यांचं स्मारक
उभारण्याचा आणि नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू
करण्याचा निर्णयही शासनानं घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
येत्या आर्थिक वर्षात अंगणवाड्यांच्या
चार हजार नवीन खोल्या बांधण्याचं नियोजन करण्यात आल्याचं महिला आणि बालविकास
मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. मुंबईत काल ‘राजमाता
जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण अभियान’ आणि ‘युनिसेफ’च्या राज्यस्तरीय परिषदेत त्या बोलत होत्या.
अंगणवाड्यांमध्ये पिण्याचं पाणी, शौचालय आदी पायाभूत सुविधा
उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र -पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर
अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महत्त्वाची
भूमिका बजावावी, असे निर्देशही ठाकूर यांनी यावेळी
दिले.
****
महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये
दवाखान्यांची संख्या ४९२ वरून एक हजार करणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश
टोपे यांनी सांगितलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ग्रामीण
भागातल्या हृदयविकारांच्या रूग्णांसाठी स्टेमी नावाची योजना राबवण्यात येणार असल्याची
माहिती टोपे यांनी दिली. ते म्हणाले….
स्टेमी नावाची 'STEMI' अशा स्वरूपाचे योजना की ज्याच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयांमध्ये ह्रदय
विकाराचा झटका आल्यानंतर पटकन दवाखान्यात जाणतो Golden Hour आहे, त्या वेळेस योग्य
उपचार होणे गरजेचे आहे. १० जिल्ह्यांमध्ये साधारणपणे राबवण्याचा निर्णय घेतो आहोत आणि
हळूहळू मग ती दुसऱ्या टप्प्यात आणि पूर्ण ३६ जिल्हा पर्यंत आम्ही जाणार आहोत.
दरम्यान, टोपे यांनी काल औरंगाबाद इथं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास
महामंडळाच्या कार्यालयात कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून बैठक घेतली.
मराठवाड्यातल्या सहा धरणांमधून आगामी काळात पाणी
पाळ्यांच्या नियोजनाला यावेळी मंजूरी देण्यात आली. मांजरा धरण
मृतसाठ्यात असल्यामुळे धरणातलं संपूर्ण पाणी पिण्यासाठी तसंच औद्योगिक वापरासाठी राखीव
ठेवण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं. पाटबंधारे विभागातल्या
रिक्त जागा भरणं आणि कालव्यांची दुरुस्ती करणं आवश्यक असल्याचं टोपे म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
साईबाबा जन्मस्थळावरुन सुरु असलेल्या वादावर
पाथरीचे ग्रामस्थ न्यायालयात दाद मागणार आहेत. पाथरीच्या साई जन्मभूमी संस्थानचे सदस्य मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठात पुराव्यासकट याचिका दाखल करणार असल्याचं आमदार आणि संस्थान समितीचे
अध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी पीटीआयला सांगितलं. यासंदर्भात
आपण आता मुख्यमंत्र्यांची भेट न घेता, पुढच्या आठवड्यात थेट न्यायालयात
याचिका दाखल करणार असल्याचं दुर्राणी यांनी सांगितलं, असं या
वृत्तात म्हटलं आहे.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व
नोंदणी विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या कायद्याविरोधात देशभर आंदोलनं होत
असून, त्याचा काहीच परिणाम सरकारवर होताना दिसत नाही,
त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीनं आंदोलनाच्या पुढे जाऊन महाराष्ट्र बंद
करण्याचा निर्णय घेतला असल्याचं पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
****
दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या
हक्काच्या पाण्यासाठी भाजपनं माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात औरंगाबाद इथं
सोमवारी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी एका निवेदनाद्वारे
ही माहिती दिली. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर होणाऱ्या या उपोषणात
पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार असल्याचंही ठाकूर यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
उमरगा तालुक्यातील मूळज इथले शिवाजीराव प्रतापराव चालुक्य यांचं काल दुपारी हृदयविकाराच्या
तीव्र धक्क्यानं निधन झालं. ते एकोणसत्तर वर्षांचे होते. उमरगा इथल्या छत्रपती शिवाजी
शिक्षण संस्थेचे तसंच शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते.
शिवाजीराव चालुक्य यांचा राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय सहभाग
होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अंत्यसंस्कार होणार
आहेत.
****
हैदराबाद मुक्ती संग्रामातले स्वातंत्र्य सेनानी
आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दिनकर बोरीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'सान्निध्य एका शिस्तीचे' या ग्रंथाचं काल औरंगाबाद इथं प्रकाशन झालं. सामाजिक
कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी संपादित केलेल्या या ग्रंथात विविध क्षेत्रात कार्यरत
अनेकांनी बोरीकरांवर लिहिलेल्या बावन्न लेखांचा समावेश आहे. या
प्रकाशनावेळी अनेक मान्यवरांनी बोरीकरांच्या आठवणींना उजाळा दिला.
****
आझाद हिंद सेनेचे प्रमुख स्वातंत्र्यसेनानी नेताजी
सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्तानं काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. मंत्रालयासह सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातून
सुभाषबाबूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नांदेड शहरातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात नेताजींच्या जयंतीनिमित्त
विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. शहरात वजीराबाद भागातून
मिरवणूकही काढण्यात आली होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं
काल विविध कार्यक्रम घेण्यात आले. नांदेड इथं रक्तदान शिबीर घेण्यात आलं, अनेकांनी उत्स्फुर्तपणे
याशिबीरात रक्तदान केलं. शिवसेनेच्या लातूर जिल्हा शाखेच्या वतीनं
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयास पाच चाकाच्या खुर्च्या,
पाच स्ट्रेचर भेट देण्यात आले.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर इथल्या कृषी उत्पन्न
बाजार समितीचे प्रशासक म्हणून शासनानं मनोज थिटे यांची नियुक्ती केली आहे. थिटे यांनी काल पदभार स्वीकारला.
कृषी उत्त्पन्न बाजार समितीवर पहिल्यांदाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचं वर्चस्व
आलं असून, संपूर्ण समितीवरही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य आहेत.
****
लातूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदावर
भारतीय जनता पक्षाचे चारही सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. समाज कल्याण सभापतीपदी रोहिदास वाघमारे
तर महिला आणि बालकल्याण सभापती पदी ज्योती राठोड यांची निवड झाली असून, गोविंद चिलकूरे आणि संगिता घुले यांचं खातेवाटप लवकरच जाहीर होईल, असं जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितलं.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या पाच टी ट्वेंटी
सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना आज ऑकलंड इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल.
****
परभणी इथल्या हजरत तुरबुल हक यात्रेनिमित्त प्रभारी
जिल्हाधिकारी बी. पी.
पृथ्वीराज, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय,
आणि आयुक्त रमेश पवार यांनी काल यात्रेच्या परिसराची पाहणी केली.
विद्युत पुरवठा, वीज जोडणी, अग्निशामक व्यवस्था, स्वच्छता, पाणी व्यवस्था आदीं सोयीसुविधांचा त्यांनी आढावा घेतला.
****
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त काल औरंगाबादमध्ये दिव्यांग
मतदारांची रॅली काढली. जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात झालेल्या या रॅलीला उपजिल्हा
निवडणूक अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी हिरवा झेंडा दाखवला.
****
No comments:
Post a Comment