Monday, 27 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 27.01.2020 TIME - 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 January 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक२७ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा; राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ
** हिंसेचा मार्ग अवलंबणाऱ्यांनी देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं आवाहन
** मराठवाडा पाणी प्रश्नी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादमध्ये एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण
आणि
** दुसऱ्या टी- ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर सात गडी आणि १५ चेंडू राखून विजय
****
सार्वभौम भारताचा एकाहत्तरावा प्रजासत्ताक दिन काल देशभर उत्साहात साजरा झाला. राजधानी दिल्लीराजपथावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर झालेल्या पथसंचलनाला प्रमुख पाहुणे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या संचलनात सोळा राज्यं, केंद्रशासित प्रदेश आणि सहा केंद्रीय मंत्रालयांनी सहभाग घेतला. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून आला. 
****
मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. आपलं राज्य प्लॅस्टिकमुक्त, कचरामुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केलं.
****
मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात काल प्रजासत्ताक दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.
औरंगाबाद इथं पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी पोलिस पथकानं राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. जिल्ह्यात चार नव्या औद्योगिक वसाहती सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी दिली. ते म्हणाले,

चार नव्या औद्योगिक वसाहती या जिल्ह्यांमध्ये नव्याने स्थापन करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे अनेक शाळांच्या इमारती या धासळल्या, नादुरुस्त झालेल्या त्याच्यातले अनेक तर पाडून नव्याने बांधल्या पाहिजे आणि त्याचबरोबर असंख्य शाळांचे दुरुस्ती केली पाहिजे यासाठी उपलब्ध निधी मध्ये कशी वाढ करता येईल याचा प्रयत्न सुरू केला आहे. आवास योजनाचं एकात्मिक असा विचार करून त्या अधिक व्यापक कशा करता येतील. जे त्या योजना पासून दूर आहेत. त्यांना त्यामध्ये समाविष्ट कसा करता येईल या आपल्या महत्वाकांक्षी ध्येयाकडे घेऊन कसा जाता येईल याचा विचार सुरू केला आहे.



यावेळी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झालेले सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ, दहशतवाद विरोधी पथकातले पोलिस निरीक्षक गौतम पातारे, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातले सुभेदार प्रमोद दादू गायकवाड यांचा आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध खेळाडूंचा देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. महानगर पालिकेत महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या उपस्थितीत तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
****
जालना इथं पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पथसंचलनाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या भाषणात पालकमंत्री टोपे म्हणाले…..

स्टेमी नावाची 'STEMI' अशा स्वरूपाचे योजना की ज्याच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयांमध्ये ह्रदय विकाराचा झटका आल्यानंतर पटकन दवाखान्यात जाणतो Golden Hour आहे, त्या वेळेस योग्य उपचार होणे गरजेचे आहे. १० जिल्ह्यांमध्ये साधारणपणे राबवण्याचा निर्णय घेतो आहोत आणि हळूहळू मग ती दुसऱ्या टप्प्यात आणि पूर्ण ३६ जिल्हा पर्यंत आम्ही जाणार आहोत.

बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन मुंडे यांनी केलं. शेतकरी कर्जमाफी योजनेचं काम अंतिम टप्प्यात आलं असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.
****
परभणी इथं पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पालकमंत्र्यांनी पथसंचलनाचं निरीक्षण करून स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी केलेल्या भाषणात मलिक म्हणाले

ह्या देशामध्ये अधिकार असतांना जबाबदारी पण आहेत, अधिकारंच हनन होणार नाही. जेव्हा व्यक्ती आपले जबाबदारी पार पाडायला लागली तर मला वाटते तेव्हा आपली लोकशाही आणखी भक्कम होऊ शकते.

****
हिंगोली इथं पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी केलेल्या भाषणात पालकमंत्री गायकवाड यांनी जिल्ह्याच्या चौफेप्रगतीसाठी जागरूक नागरिक म्हणून योगदान देण्याचं आवाहन केलं.

कर्ज माफी अनुशंगाने सर्व शेतकरी बांधवांसाठी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तहशिल कार्यालयांमध्ये सहायता कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू व्यक्तींना केवळ दहा रुपयांमध्ये सकस आहार देण्यात येणार आहे.

****
लातूर इथं पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. भावी पिढ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा दूर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

भावी पिढ्यांचा पाण्यांचा प्रश्न कायम सोडविला जाणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजने अंर्तगत खरीप हंगाम २०१९ मधील जिल्ह्यातील अधिसुचित पिकांसाठी १० लाख ८२ हजार ९३७ पीक विमा अर्ज सादर केले असून ६ लाख ११ हजार ३३० हेक्टर पीक संरक्षित केले आहे.
****
नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पोलिस दलाच्या वतीनं यावेळी मानवंदना देण्यात आली. पथसंचलनाचं निरीक्षण करण्यापूर्वी केलेल्या भाषणात अशोक चव्हाण म्हणाले…..

नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या वर्षी आरोग्यसेवेत भरारी घेतली असून यामध्ये १०० M.B.BS विद्यार्थ्यांचा क्षमतेवरून १५० M.B.BS त्यांची मान्यता भारत सरकार कडुन प्राप्त झाली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये उच्च दर्जाचे कॅन्सरचे निदान सेक्टर उभारण्याचे प्रस्तावित आहे
****
उस्मानाबाद इथं पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीतून उस्मानाबाद जिल्हा बाहेर काढण्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचं गडाख यांनी सांगितलं.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात व क्रीडात क्षेत्रात अधिक प्रगती होण्यासाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाणार जिह्याल्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी यासाठी आपण सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी शिस्तीचे व कायदाचे व सुव्यवस्थेचे पाईक होऊन एकजुटीने काम करुया.

****
विभागातल्या सर्व शासकीय कार्यालयं तसंच शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वजारोहणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा झाला. संस्था संघटनांच्या वतीनं तिरंगा फेरी, रक्तदान शिबीरसह विविध उपक्रम राबवण्यात आले.
****
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभही राज्यातल्या सर्व जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आला. दहा रूपयांत गरीबांना जेवण उपलब्ध करून देण्याची तरतूद या योजनेत आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
***
हिंसा कोणत्याही समस्येवर तोडगा असूच शकत नाही असं सांगत हिंसेचा मार्ग अवलंबणाऱ्यांनी देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचं आवाहन,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या ६१व्या भागात ते काल बोलत होते. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आजही हिंसा आणि हत्यार यांच्या बळावर समस्येचं उत्तर शोधणाऱ्या लोकांनी आपल्या आणि देशाच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं.
२०२२ मध्ये राबवण्यात येणारं गगनयान मिशन म्हणजे २१व्या शतकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारतानं केलेला ऐतिहासिक पराक्रम असेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पद्म पुरस्कार विजेत्यांविषयी सर्वांनी जरुर माहिती घ्यावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी श्रोत्यांना केलं.
****
मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज सकाळी दहा वाजेपासून एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं जाणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र डणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, यांच्यासह अन्य नेते या उपोषणात सहभागी होणार असल्याचं प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितलं.
****
ऑकलंड इथं काल झालेल्या दुसऱ्या टी- ट्वेंटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर भारतानं सात गडी आणि १५ चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडनं दिलेलं १३३ धावांचं लक्ष्य भारतानं १७व्या षटकातच तीन गडी गमावत पूर्ण केलं. ५७ धावा करणारा के. एल. राहुल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे.
****
नांदेड इथं कालपासून कुसुमताई चव्हाण स्मृती महोत्सवाला सुरुवात झाली. यानिमित्त घेण्यात येणाऱ्या मुलींच्या क्रिकेट स्पर्धाचं उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झालं.
****




No comments: