Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 31 January 2020
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ३१ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** संसदेच्या
अधिवेशनाला आजपासून प्रारंभ; आज आर्थिक सर्वेक्षण तर उद्या अर्थसंकल्प सादर होणार
** मराठवाडा
वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या व्यवहार्यतेची फेरतपासणी करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
** मराठवाड्यातल्या
आठही जिल्ह्याच्या वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी
** समान
काम- समान वेतनासह विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा आज आणि उद्या संप
आणि
** ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन
**
****
संसदेचं
अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं
या अधिवेशनाला प्रारंभ होईल. आज सकाळी अकरा वाजता, संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त
सभेला राष्ट्रपती संबोधित करतील. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण
अहवाल संसदेत सादर करतील. उद्या २०२०- २१ वर्षासाठीचा
अर्थसंकल्प सादर केला जाईल.
या अधिवेशनात
विविध ४५ विधेयकं संसेदत मांडली जाणार असल्याचं, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी
यांनी सांगितलं.
दोन टप्प्यात
होणाऱ्या या अधिवेशनाचा पहिला टप्पा अकरा फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, दुसरा टप्पा
दोन मार्च ते तीन एप्रिलपर्यंत चालणार आहे.
****
मराठवाडा
वॉटर ग्रीड प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचं तज्ज्ञांचं मत असून या प्रकल्पाच्या
व्यवहार्यतेची फेरतपासणी केली जाणार असल्याचं राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री अजित
पवार यांनी म्हटलं आहे. पवार यांनी काल औरंगाबाद इथं मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या
बैठका घेऊन, आगामी आर्थिक वर्षाच्या प्रारुप आराखड्यांना मंजूरी दिली, त्यानंतर ते
वार्ताहरांशी बोलत होते. जनतेचा पैसा वाया न जाता तो योग्य ठिकाणी उपयोगात आला पाहिजे.
असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. ते म्हणाले……
तज्ञ अधिकाऱ्यांनी सांगितलं ही योजना पुन्हा एकदा
तपासायची गरज आहे, कारण ही योजना वायबल नाहीये जी काही वीज लागेल त्या विजेचे बिल काही
हजार कोटी रुपये दरवर्षी त्या ठिकाणी येणारे असा एक मतप्रवाह आहे, त्याकरता थोडासा
मी माहिती घेऊन आम्हाला वाटलं की बाबा हे खरोखरीच शंभर टक्के यशस्वी तर पुढे पण जायला
आमची काही कुणाची ना नाही.
राज्यात
नवीन जिल्हा निर्मितीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मराठवाड्यातल्या
आठही जिल्ह्याच्या वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्याला काल पवार यांनी वेगवेगळ्या
जिल्ह्यांच्या घेतलेल्या बैठकीत मंजुरी दिली.
औरंगाबाद
शहरासाठी पाणी पुरवठ्या संदर्भातली योजना, महाराष्ट्र जल प्राधिकरणाचा ९० टक्के हिस्सा
आणि मनपाचा १० टक्के हिस्सा अशा स्वरूपात राबवणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
औरंगाबाद
जिल्ह्याच्या ३२५ कोटी ५० लाख रुपयांच्या, जालना जिल्ह्याच्या २३५ कोटी रुपये, बीडच्या
३०० कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला काल उपमुख्यमंत्री पवार यांनी मान्यता दिली.
लातूर
जिल्ह्यासाठीच्या आगामी आर्थिक वर्षाच्या एकशे त्र्याण्णव कोटी २६ लाख रुपयांच्या प्रारुप
आराखड्यात अर्थमंत्र्यांनी ४६ कोटी ७४ लाख रुपयांची वाढ करून २४० कोटी रुपयांच्या आराखड्याला
मान्यता दिली. नांदेड जिल्हा वार्षिक योजनेसाठी अर्थमंत्र्यांनी ३१५ कोटी रुपयांच्या
प्रारुप आराखड्याची मागणी मंजूर केली. परभणीच्या २६२ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला
उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. उस्मानाबाद
जिल्ह्याच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील असल्याचं सांगत उपमुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्याला
१०० कोटी रूपये अतिरिक्त मंजूर केले. जिल्ह्यानं १२५ कोटी रूपयांची अतिरिक्त मागणी
केली होती.
या बैठकीपूर्वी
अजित पवार यांनी शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात उभारल्या जात असलेल्या ऑरिक
सिटीची पाहणी केली. ऑरिकच्या एकूण परिसराचं नकाशाद्वारे त्यांनी निरीक्षण केलं. वीज,
रस्ते, पाणी व्यवस्थापन, शालेय, आरोग्य आदी सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं.
ऑरिकमध्ये येणाऱ्या कंपन्यांसाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ इथंच निर्माण करण्यावर
भर देऊन मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
****
कृषी वीज
ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात आणि उद्योजकता वाढीसाठी नवीन ऊर्जा धोरण तयार करण्यात
येणार आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ
अधिकाऱ्यांसोबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात शेतकऱ्यांकडे असलेली थकबाकी
कमी होण्यासाठी निश्चित धोरण तयार करण्याचे निर्देश राऊत यांनी यावेळी दिले
****
समान काम-
समान वेतन, कामाची निर्धारित वेळ, निवृत्तीवेतन आदी मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्या संप पुकारला आहे.
यामुळे आजपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार
आहेत.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबाद
महापालिकेच्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी तीन फेब्रुवारीला वॉर्डांचे आरक्षण
सोडत काढण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. चार फेब्रुवारीला प्रारूप प्रभाग रचनेची
अधिसूचना प्रसिध्द केली जाणार असून, ११ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती
आणि सूचना स्वीकारण्यात येणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं काल काढलेल्या आदेशात
म्हटलं आहे.
****
महिलांच्या
हक्क आणि प्रगतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं
काल दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी
पुणे आकाशवाणीवर दोन वर्षे कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून नोकरी केली. त्यानंतर काही
काळ त्यांनी स्त्री या मासिकात सहायक संपादक म्हणून काम केलं. १९८९ मध्ये मिळून साऱ्याजणी
हे मासिक त्यांनी सुरू केलं. या मासिकाद्वारे
स्त्रियांचे विश्व उलगडत विद्या बाळ यांनी महिलांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडत प्रबोधन
केलं. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
औरंगाबाद
शहरातल्या हज हाऊसचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अल्पसंख्याक विकास आणि
औकाफ, मंत्री नवाब मलिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. काल हज हाऊस संदर्भात मलिक
यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
****
मराठवाडा
साहित्य परिषदेच्यावतीनं कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं देण्यात
येणारा कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी
अध्यक्ष डॉक्टर अक्षयकुमार काळे यांना जाहीर झाला आहे.
कवयित्री
लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार नांदेडचे कवी डॉ. दिनकर मनवर यांना दिला जाणार असल्याचं
परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल जाहीर केलं.
****
भारत आणि
न्यूझिलंड यांच्यातला चौथा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट सामना आज वेलिंग्टन इथं खेळला जाणार
आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता हा सामना सुरू होईल. पाच सामन्यांच्या
या मालिकेत भारत तीन-शून्य अशा फरकानं आघाडीवर आहे.
****
परभणी
इथं हजरत सय्यद शाह तुराबूल हक्क साहेब यांचा उरूस आजपासून सुरू होत आहे. मनोरंजनाच्या
विविध साहित्यांसह मीना बाजार, विविध मिठाईची दुकानं उभारण्यात आली आहेत. या उरूसाला
राज्य आणि परराज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात.
****
बीड जिल्ह्यात
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडण्यासाठी ६ फेब्रुवारीला विशेष शिबिराचं आयोजन
करण्यात आलं आहे. असं टपाल खात्याच्या बीड विभागाचे डाक अधिक्षकांनी कळवलं आहे. या खात्याचा उपयोग पिक विमा योजना, कृषी सन्मान
योजना, मातृत्व वंदना योजना, रोजगार हमी योजना, निराधार योजना तसंच विद्यार्थ्यांना
शिष्यवृतीसाठी आणि इतर योजनांसाठी करता येईल.
****
संत ज्ञानेश्वरांनी
पैठण इथं रेड्यामुखी वेद वदवल्याच्या घटनेला काल सातशे तेहेतीस वर्षं पूर्ण झाली. इसवी
सन १२८७ साली वसंत पंचमीच्या दिवशी पैठणच्या नागघाटावर ही घटना घडल्याचं सांगितलं जातं.
यानिमित्तानं काल पैठण इथं नागघाटावर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ज्ञानेश्वरीतल्या
ओव्यांचं पठण, कीर्तन, भजन आदी कार्यक्रमात नागरिक भक्तिभावानं सहभागी झाले.
****
कुष्ठरोग
निवारण दिन आणि महात्मा गांधी यांची पुण्यतिथी यानिमित्तानं काल परभणी इथं संदेश फेरी
काढण्यात आली. आरोग्य सेवा सहाय्यक संचालक कार्यालयामार्फत काढण्यात आलेल्या या संदेश
फेरीत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
हिंगोली
शहरात पीक विम्याचा प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीक
विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. या कार्यालयात पीक विम्याबाबत चौकशी करायला
गेले असतांना, कोणीही अधिकारी न भेटल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड
केली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
****
No comments:
Post a Comment