Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 28 January 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जानेवारी २०२० सायंकाळी ६.००
****
शिवभोजन थाळी योजनेची व्याप्ती वाढवावी लागेल, असं
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. शिवभोजन केंद्रावर दुपारी १२
वाजताच जेवणासाठी लागणाऱ्या रांगा, आणि लाभार्थींची माहिती या विभागाचे प्रधान
सचिव महेश पाठक यांनी भुजबळ यांना दिली, त्यावेळी भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया
व्यक्त केली. शिवभोजन ॲपच्या माध्यमातून दररोज प्रत्येक जिल्ह्यातल्या या योजनेचे
लाभार्थी आणि इतर माहितीचा आढावा घेत असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी आज शिवभोजन थाळीच्या लाभार्थींशी दूरदृश्य प्रणालीने संवाद
साधून या योजनेचा आढावा घेतला, कोल्हापूर तसंच नंदूरबार इथे या योजनेअंतर्गत भोजन
करत असलेल्या लाभार्थींनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना या योजनेबद्दल समाधान व्यक्त
केलं.
****
भारतीय जनता पक्षानं, आज कोल्हापूर जिल्हाधिकारी
कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. शेतकऱ्यांचा सातबारा संपूर्ण कोरा करून, त्यांना
कर्जमुक्त करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास
आघाडी सरकारनं दिलं होतं. मात्र फक्त पीक कर्ज माफीची घोषणा करून, ठाकरे सरकारनं राज्यातल्या
लाखो शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी
यावेळी केली, ही कर्जमाफी पूर्णपणे फसवी असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.
****
वैद्यकीय उपचारांच्या
होमिओपॅथी शाखेमध्ये संशोधन आणि विकासाची गरज वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
यांनी वर्तवली आहे. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी यांच्या वतीने देण्यात येणारे
डॉ. हॅनिमन जीवनगौरव पुरस्कार, देशमुख यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले,
त्यावेळी ते बोलत होते. विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित
होते. राज्यात आज होमिओपॅथीची ५४ खासगी महाविद्यालयं आहेत, येणाऱ्या
काळात शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं
वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं. यावेळी २०१२ ते २०२० या आठ वर्षांचे
पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये मराठवाड्यातले औरंगाबाद इथले डॉ. विलास
वोरा, डॉ. शांतीलाल देसरडा, आणि परभणीचे डॉ. संदीप नरवाडकर यांचा
समावेश आहे. डॉ देसरडा आणि डॉ नरवाडकर यांना हे पुरस्कार मरणोत्तर देण्यात आले.
****
नाशिक जिल्ह्यात आज बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला.
कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात आज दुपारी मेशी जवळ समोरासमोर धडक होवून दोन्ही
वाहनं जवळच्या विहीरीत कोसळली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंग यांनी आता पर्यंत
दोन जणांच्या मृत्यूची पुष्टी केली असून मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात
येत आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असल्याचं डॉ सिंग यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या ढोकेश्वर मल्टीस्टेट क्रेडीट
को-ऑपरेटिव्ह सोसायटीत अपहार प्रकरणी सोसायटीचे चेअरमन सतीश काळे यांच्यासह चौघांविरोधात
गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संस्थेच्या परभणी आणि जिंतूर
इथल्या शाखेत ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारत ३६लाख रुपये अपहार केल्याप्रकरणी ही कारवाई
करण्यात आली आहे.
****
जालना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पथकानं आज जालना
जिल्ह्यात पाच अवैध सावकारांच्या घरांवर छापे टाकून विविध व्यवहारांचे दस्तावेज, नोंदवह्या
आणि इतर कागदपत्रं जप्त केली. यामध्ये जालना इथल्या चार तर परतूर इथल्या एका सावकाराचा
समावेश आहे. जप्त कागदपत्रांची तपासणी करून संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात येणार
असल्याचं जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी सांगितलं.
****
विभागीय पर्यावरण एकांकिका शालेय नाट्यस्पर्धेत औरंगाबाद
इथल्या अनंतराव भालेराव विद्यामंदिराच्या एकांकिकेनं पहिला क्रमांक पटकावला. लातूर
इथलं सुशिलादेवी देशमुख मूकबधीर विद्यालय आणि औरंगाबादच्या शारदा मंदीर कन्या प्रशालेच्या
संघाला दुसरा क्रमांक विभागून देण्यात आला, तर बीड जिल्ह्यातल्या पाटोद्याच्या छत्रपती
शाहू महाराज विद्यालयाच्या संघाचा तिसरा क्रमांक आला. तिन्ही संघांना अनुक्रमे पंधरा
हजार, दहा हजार तसंच पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं. या स्पर्धेचं
हे चौदावं वर्ष असून, यंदा प्रथमच ही स्पर्धा लातूर इथं घेण्यात आली.
****
नांदेड-औरंगाबाद-नांदेड या विशेष गाडीला ३१
मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नांदेड श्रीगंगानगर नांदेड, तसंच नांदेड पनवेल नांदेड या दोन्ही रेल्वेगाड्यांमध्ये
शयनयान श्रेणीचा एक डबा तात्पुरता वाढवण्यात
आला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment