Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 30 January 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जानेवारी २०२० सायंकाळी ६.००
****
मराठवाडा वॉटर ग्रीड
प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे, असं राज्याचे वित्त आणि
नियोजन मंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पवार यांनी औरंगाबाद इथं मराठवाड्यातल्या
सर्व जिल्ह्यांच्या बैठका घेऊन, आगामी आर्थिक वर्षाच्या प्रारुप आराखड्यांना मंजूरी
दिली, त्यानंतर ते बोलत होते. वॉटर ग्रीड संदर्भातला निर्णय नंतर घेण्यात येणार असल्याचं
त्यांनी सांगितलं. औरंगाबाद शहरासाठी पाणी पुरवठ्या संदर्भातली योजना, महाराष्ट्र जल
प्राधिकरणाचा ९० टक्के हिस्सा आणि मनपाचा १० टक्के हिस्सा अशा स्वरूपात राबवणार असल्याचं
पवार यांनी सांगितलं.
लातूर जिल्ह्यासाठी
आगामी आर्थिक वर्षाच्या एकशे त्र्याण्णव कोटी २६ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यात
अर्थमंत्र्यांनी ४६ कोटी ७४ लाख रुपयांची वाढ करून २४० कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला
मान्यता दिली. लातूर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमांचं पवार यांनी कौतुक केलं.
नांदेड जिल्हा वार्षिक
योजनेसाठी अर्थमंत्र्यांनी ३१५ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याची मागणी मंजूर केली.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची पॉवर पॉईंट सादरणीकरणाद्वारे
सविस्तर माहिती दिली.
परभणी
जिल्हा वार्षिक योजनेच्या २६२ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला उपमुख्यमंत्र्यांनी
मान्यता दिली. जिल्हा प्रशासनानं १४१ कोटी
रुपयांची अतिरिक्त मागणी वित्तमंत्र्यांकडे केली होती, त्यापैकी वित्तमंत्र्यांनी ४४
कोटी २८ लाख रुपये वाढ मंजूर केली.
या बैठकीपूर्वी
अजित पवार यांनी शेंद्रा
पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात उभारल्या जात असलेल्या ऑरिक सिटीची पाहणी
केली. ऑरिकच्या एकूण परिसराचं नकाशाद्वारे त्यांनी निरीक्षण
केलं. वीज, रस्ते,
पाणी व्यवस्थापन,
शालेय, आरोग्य आदी सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं.
ऑरिकमध्ये येणाऱ्या कंपन्यांसाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ इथेच निर्माण करण्यावर भर देऊन मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा
पवार यांनी व्यक्त केली.
****
कृषी वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात आणि उद्योजकता वाढीसाठी
नवीन ऊर्जा धोरण तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी
दिली. ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत
होते. राज्यात शेतकरी वर्गाकडे असलेली थकबाकी कमी होण्यासाठी
निश्चित धोरण तयार करण्याचे निर्देश राऊत यांनी यावेळी दिले
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
विद्या बाळ यांच्या निधनानं नारीशक्तीचा बुलंद
आवाज हरवला असून स्त्रीवादी चळवळीचं मोठं नुकसान झालं असल्याची शोकभावना मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साहित्यिक, कृतिशील संपादक, स्त्री
हक्क चळवळीतील अग्रणी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं, स्त्री सक्षमीकरण चळवळीतलं त्यांच
योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
विद्या बाळ यांच्या रूपानं स्त्री-
पुरुष समानतेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटलेल्या एका पर्वाची आज अखेर झाली, अशा शब्दात राज्याच्या
महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
विद्या बाळ यांचं आज सकाळी पुण्यात
निधन झालं, त्यांच्या निधनानं समाजाच्या सर्वच थरातून शोक व्यक्त
करण्यात येत आहे.
****
इंडिया पोस्ट पेमेंट बैंक ही टपाल विभागाची महत्त्वाकांक्षी
योजना जनतेला समर्पित झालेला उपक्रम असून, कॅशलेस व्यवहार हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट
असल्याचं टपाल विभागाचे अहमदनगर इथले वरिष्ठ अधीक्षक जे टी भोसले यांनी म्हटलं आहे,
ते आज अहमदनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. या योजनेचा पुढचा टप्पा म्हणून, आधार संबंधित
पेमेंट सिस्टम - ए ई पी एस ला सुरुवात झाल्याची माहिती भोसले यांनी दिली. या सेवेसाठी ग्राहकाचं राष्ट्रीयकृत
बँकेत बचत खातं असणं तसंच हे खातं आधार कार्डशी संलग्न असणं आवश्यक आहे. याद्वारे ग्राहकाला
टपाल कार्यालयातून कमाल दहा हजार रुपये तर
पोस्टमनमार्फत कमाल पाच हजार रुपये काढता येतील. या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण
भागातल्या जनतेचा बँकेपर्यत जाण्याचा त्रास वाचणार असल्याचं, भोसले यांनी सांगितलं.
****
कुष्ठरोग निवारण दिन आणि महात्मा गांधी यांची पुण्यतिथी
यानिमित्तानं आज परभणी इथं संदेश फेरी काढण्यात आली. आरोग्य सेवा सहाय्यक संचालक कार्यालयामार्फत
काढण्यात आलेल्या या संदेश फेरीत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
*****
***
No comments:
Post a Comment