Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 January 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जानेवारी २०२० सायंकाळी ६.००
****
आगामी आर्थिक वर्षात विकासाचा
दर साडे सहा टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालात वर्तवण्यात आला
आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज अर्थसंकल्पीय
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या दोन्ही सदनांसमोर सादर केला, या अहवालात आगामी
आर्थिक वर्षात विकासाचा दर सध्याच्या पाच टक्क्यांच्या तुलनेत सहा ते साडे सहा टक्के
राहील. खातेधारकांचा विश्वास संपादित करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या
प्रशासकीय कामकाजात सुधारणा तसंच करभरणा, मालमत्ता नोंदणी, नवीन व्यवसाय उभारणी आदी
व्यवहार अधिकाधिक सुलभ करण्याची आवश्यकता या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून मांडण्यात
आली आहे.
****
काँग्रेस पक्षानं राष्ट्रपतींच्या
आजच्या अभिभाषणावर टीका केली आहे. या अभिभाषणात महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांच्या
समस्यांचा उल्लेख केला नाही, असं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी
म्हटलं आहे. भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी मात्र, राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून
राजकीय आणि वैचारिक चौकटीपलिकडे जाऊन देश बळकट करण्यासाठी आवाहन केलं, या शब्दात या
अभिभाषणाबद्दल समाधान व्यक्त केलं.
****
कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या
पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सध्या राज्यात नऊ जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात
आलं आहे. यापैकी नांदेडला १, मुंबईला ३, तर पुण्यामध्ये पाच जणांना रुग्णालयात दाखल
करण्यात आलं आहे. आतापर्यंत मुंबई विमानतळावर ४ हजार ८४६ प्रवाशांची तपासणी करण्यात
आली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे बाधित झालेला एकही रुग्ण राज्यात आढळून आलेला
नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे
****
समान काम - समान वेतन,
कामाची निर्धारित वेळ, निवृत्तीवेतन आदी मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या
वतीनं दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. याअंतर्गत राष्ट्रीयकृत बँक, ओल्ड
जनरेशनच्या खासगी बँक आणि विभागीय ग्रामीण बँकेच्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी आज
ठिकठिकाणी निदर्शनं केली. औरंगाबाद शहरातल्या अदालत रस्त्यावरील महाराष्ट्र बँकेसमोर
निदर्शनं करण्यात आली. संघटनांनी पुकारलेल्या या दोन दिवसीय या संपात जिल्ह्यातले तीन
हजाराहून अधिक अधिकारी कर्मचारी सहभागी झाले असल्याचं बँक संघटनेचे सचिव देविदास तुळजापूरकर
यांनी सांगितलं.
लातूर इथंही अधिकारी कर्मचाऱ्यांनी
महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखेसमोर धरणे आंदोलन केलं. या आंदोलनाला कॉंग्रेस तसंच
शेकापच्या नेत्यांनी पाठिंबा दिला. हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे
कर्मचारी अधिकारी या संपात सहभागी झाले आहेत.
****
मराठवाडा वाटरग्रीड योजना
तांत्रिक कारण देत, रद्द केल्यास, संपूर्ण मराठवाड्यात तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा
इशारा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला आहे. ते आज जालना इथं वार्ताहरांशी बोलत
होते. पाणीप्रश्नावर राजकारण न करता आता तरी मराठवाड्यावर अन्याय करू नये, असं लोणीकर
म्हणाले. मराठवाड्यातल्या सर्व नेत्यांनी राजकीय भूमिका बाजूला ठेवून या योजनेच्या
कामासाठी एकत्र यावे, असं आवाहन लोणीकर यांनी यावेळी केलं. योजना रद्द केल्यास न्यायालयीन
लढा उभारण्याची आपली तयारी असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं आहे.
****
मराठवाड्यातल्या विविध
विषयांवर विचारमंथन करून उपाय योजना करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची परवा रविवारी
दोन फेब्रुवारीला औरंगाबाद इथं बैठक बोलावली असल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी
दिली. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. इतर विभागांच्या तुलनेत मराठवाड्याचं
मागासलेपण दूर करण्यासाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज असल्याचं
ते यावेळी म्हणाले.
****
न्यूझीलँडसोबत सुरू असलेल्या
टी ट्वेंटी मालिकेतला चौथ्या सामन्यात भारतानं सुपर ओव्हर जिंकून विजय मिळवला. भारतीय
संघानं प्रथम फलंदाजी करत आठ बाद एकशे पासष्ट धावा केल्या. न्यूझीलँड संघानेही निर्धारित
षटकात सात बाद एकशे पासष्ट धावा केल्यानं, सुपर ओव्हर खेळवण्यात आली. न्यूझीलँड संघानं
या ओव्हरमध्ये एक बाद तेरा धावा केल्या, भारतीय संघानं एक बाद चौदा धावा करून विजयावर
शिक्कामोर्तब केलं. सामन्याच्या अखेरच्या षटकांत प्रभावी गोलंदाजी करून यजमान संघाचे
चार गडी तंबूत पाठवणारा शार्दुल ठाकूर सामनावीर ठरला. मालिकेतला तिसरा सामनाही भारतानं
सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता. आजच्या विजयानंतर भारतानं चार शून्य अशी विजयी आघाडी
घेतली असून मालिकेतला पाचवा सामना परवा रविवारी दोन फेब्रुवारीला होणार आहे.
****
No comments:
Post a Comment