Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 24 January 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २४
जानेवारी
२०२० दुपारी ०१.०० वाजता
****
नागरिकत्व
सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात वंचित बहुजन आघाडीनं पुकारलेल्या
राज्यव्यापी बंदला सर्वत्र संमीश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबाद शहरात वंचित बहुजन
आघाडीचे कार्यकर्ते व्यापाऱ्यांना बंदमधे सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहेत. शहरातील
शहागंज, कॅनाट परिसर इथं बंद पाळला जात असून खुल्ताबाद इथंही बंद पाळला जात आहे. नांदेड,
हिंगोली, वाशीम जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात बंद
पाळला जात आहे. सोलापूर इथं शहर बससेवेवर दगडफेक करण्यात आली. धुळे शहरात आज वंचित
बहुजन आघाडी आणि समविचारी संघटनांनी मोर्चा काढला तसंच जिल्ह्यातील साक्री इथं कडकडीत
बंद पाळण्यात आला. मुंबईतील घाटकोपरमध्ये पूर्व जलदगती महामार्गावरील वाहनं अडवण्याचा
प्रयत्न करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पालघर जिल्ह्यातील
बोईसर रेल्वे स्थानकापासून आंदोलकांनी फेरी काढली. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी
राज्यात सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात
आला आहे.
****
तालुका
आणि जिल्हा पातळीवरील प्रमुख आदर्श गावांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या रकमेत
वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत
नेते आर. आर. पाटील यांचं नाव या योजनेला देण्यात येणार आहे. ग्राम विकास मंत्री हसन
मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. या संदर्भातील प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळासमोर
ठेवण्यात येणार असून या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यात
येणार असल्याचं त्यांनी नमुद केलं आहे. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण तसंच माहिती
तंत्रज्ञान, अक्षय उर्जा स्त्रोत आदी क्षेत्रात काम करणाऱ्या गावांना या योजनेत सन्मानित
करण्यात येतं. आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पुर्वी तालुका पातळीवर दहा लाख आणि जिल्हा
पातळीवर चाळीस लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येत असे. आपल्या सरकारनं आता तालुका पातळीवर
वीस लाख रुपये आणि जिल्हा पातळीवर पन्नास लाख रुपयांचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला
असल्याची माहितीही मुश्रीफ यांनी दिली आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या एकोनपन्नास मुलांशी
नवी दिल्ली इथं संवाद साधला. विविध श्रेणीत पुरस्कार प्राप्त मुलांशी बोलताना या मुलांकडून
प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या मुलांना देश तसंच समाजाप्रती
असलेल्या कर्तव्याचा जाणीवेबद्दल त्यांचा अभिमान असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
****
मुख्यमंत्रीपदाचा
मान शिवसैनिकांना समर्पित करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत काल शिवसेनेचा वचनपूर्ती
सोहळा साजरा झाला. यावेळी शिवसैनिकांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला,
त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत उघडपणे सत्ता स्थापन
केली असून, शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा सोडला नसल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले.
****
राष्ट्रीय
मतदार दिनानिमित्त आज मंत्रालयात अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मंत्रालयातील
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली. राष्ट्रीय मतदार दिवस उद्या असून मंत्रालयाला
सुट्टी असल्यानं मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना आजचं प्रतिज्ञा देण्यात आली.
सशक्त लोकशाहीकरिता निवडणूक साक्षरता हे राष्ट्रीय मतदार दिनाचं ब्रीद असल्याचं अतिरिक्त
मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद
महापालिकेची येत्या एप्रिल महिन्यात होणारी निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवणार
असल्याची माहिती औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांनी दिली आहे. ते आज औरंगाबादमधे
पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
नांदेड
जिल्ह्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते साहेबराव लहानकर यांचं आज सकाळी नांदेड इथं निधन
झालं. ते ८३ वर्षांचे होते. लहानकर हे मराठवाडा सहकारी साखर कारखाना डोंगरकडा या संस्थेचे
माजी प्रशासकीय अध्यक्ष तसंच नांदेड पंचायत समितीचे सभापती होते. त्यांच्या पार्थीवावर
आज संध्याकाळी नांदेड इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
न्यूझीलंडनं
भारताविरुद्धच्या पहिल्या टीट्वेंटी क्रिकेट सामन्यात सहा षटकांमध्ये बिनबाद ६८ धावा केल्या आहेत. ऑकलंड इथं सुरू या
सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं.
****
No comments:
Post a Comment