Thursday, 23 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.01.2020 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 January 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक२३ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****

Ø  मुंबई शहर आणि उपनगरात व्यावसायिक आस्थापनं रात्रभर सुरु ठेवण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी
Ø  ”शिवभोजन” योजनेसाठी आधारकार्ड दाखवण्याची सक्ती नसल्याचा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचा खुलासा 
Ø  नागरिकत्व सुधारणा कायदा तसंच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला तत्काळ स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
Ø  मराठवाड्यातला शिल्पकलेचा आविष्कार हा आर्थिक संपन्नता आणि राजकीय स्थैर्याचं द्योतक - ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रभाकर देव यांचं प्रतिपादन
आणि
Ø  तिसऱ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचा समारोप; ७५ सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र प्रथम
****

 मुंबई शहर आणि उपनगरात येत्या सव्वीस तारखेपासून मॉल्स आणि व्यावसायिक आस्थापनं रात्रभर सुरु ठेवण्याच्या निर्णयाला या राज्य मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची काल मुंबईत बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. रात्रभर आस्थापनं चालू ठेवणं कोणासही बंधनकारक नसेल, तसंच पब आणि बारसाठीची कालमर्यादा मात्र कायम राहणार आहे. या निर्णयामुळे सेवा क्षेत्रातली मनुष्य बळाची गरज वाढून रोजगार निर्मितीला हातभार लागेल, असं मत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.
 कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणारी, 2017 मध्ये केलेली सुधारणा रद्द करण्यात आली आहे. आता पूर्वीप्रमाणे विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्यांची निवड करण्याला कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची थेट निवड पद्धतही रद्द करण्यात आली आहे. आता निवडून आलेल्या नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णयही कालच्या या बैठकीत घेण्यात आला.
 ”तान्हाजी-द अनसंग वॉरियर” या हिंदी चित्रपटाला राज्य वस्तू आणि सेवा करातून सूट देण्याचा तसंच वस्तू आणि सेवा कर सुधारणा अधिनियम, 2019 मध्ये अनुषगिक सुधारणेच्या निर्णयलाही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
 येत्या प्रजासत्ताक दिनापासून सुरू होणार असलेल्या ”शिवभोजन” योजनेसाठी आधारकार्ड दाखवण्याची सक्ती नसल्याचा खुलासा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. या योजनेंतर्गत सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात तसंच महानगरपालिका क्षेत्रात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे. या योजनेनुसार एका भोजनालयात दररोज दुपारी बारा ते दोन या वेळेत किमान ७५ तर कमाल दीडशे थाळी भोजन, दहा रुपये दराप्रमाणे उपलब्ध असेल.
****
 केंद्रीय मंत्रिमंडळाचीही काल बैठक झाली. इतर मागास वर्ग आयोगाला सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं या बैठकीत घेतला. देशातल्या सहा राष्ट्रीय तंत्रज्ञान विद्यापीठांसाठी चार हजार तीनशे एक्काहत्तर कोटी रुपयांचा निधीही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला.
****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल पंतप्रधान राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्राच्या अथर्व मनोजकुमार लोहार या सर्वात कमी वयाच्या तबला वादकाला कला आणि संस्कृती विभागाचा पुरस्कार देण्यात आला तर देवेश पंकज भय्या याला प्रतिभावान युवा गणितज्ज्ञ म्हणून गौरवण्यात आलं.
****
 नागरिकत्व सुधारणा कायदा तसंच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला तत्काळ स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या एकशे त्रेचाळीस याचिकांच्या एकत्रित सुनावणीला कालपासून सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली. यासंदर्भात केंद्रसरकारची बाजू ऐकल्याशिवाय काहीही निर्णय देणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. तसंच, या याचिकांची सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णयही न्यायालयानं काल घेतला. या याचिकांवर प्रतिसाद देण्यासाठी केंद्र सरकारला चार आठवड्यांत उत्तर देण्यास न्यायालयानं सांगितलं.
 याशिवाय, सर्वोच्च न्यायालय या याचिकांवर निर्णय देईपर्यंत कोणत्याही उच्च न्यायालयानं या कायद्यासंदर्भातल्या याचिकांची सुनावणी करू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयानं काल दिले. 
****
 पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २६ जानेवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ६१वा भाग असेल.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

मराठवाड्यात प्राचीन काळापासून दिसून येत असलेला शिल्पकलेचा आविष्कार हा मराठवाड्याच्या आर्थिक संपन्नतेचं, तसंच राजकीय स्थैर्याचं द्योतक आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रभाकर देव यांनी केलं आहे. औरंगाबाद इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात सुरू असलेल्या इतिहास महोत्सवातल्या परिसंवादात ते काल बोलत होते. हा कलाविष्कार स्वांतसुखाय असल्याचं सांगताना प्रभाकर देव म्हणाले...
 अंजठा-वेरूलच्या लेण्यापासून ते पितळखोऱ्याच्या लेण्यापासून ते अगदी चालूक्यकालीन देवळापर्यंत, यादवकालीन देवळापर्यंत झालेला हा सगळा जो कलाविष्कार आहे तो कलाकारांनी केलेला  स्वांतसुखाय हा कलाविष्कार आहे. पहिल्या दूसऱ्या शतकापासून सूरू असलेला हा कलाविष्कार  मराठवाड्यामध्ये थेट तेराव्या शेतकापर्यंत सातत्याने चालू आहे.

 या परिसंवादात राज्य पुरातत्व आणि वस्तू संग्रहालयाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे, जवाहरलाल नेहरु विद्यापीठातले निवृत्त प्राध्यापक डॉ हरबन्स मुखिया यांची व्याख्यानं झाली. आज या इतिहास महोत्सवाचा समारोप होणार आहे.
****
 केरळमध्ये तिरुवनंतपुरम इथं झालेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी राही नितीन गायकवाड आणि जाह्नवी संजू मुकींद सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या. स्मार्ट इलेक्ट्रीक व्हीकल चार्जिंग अॅंड स्पीड कंट्रोलर प्रकल्प त्यांनी या परिषदेत सादर केला. पर्यावरण रक्षण तसंच सुरक्षित रस्ते वाहतूक, इंधन बचत आदींसाठी उपयुक्त अशा या प्रकल्पाचं या परिषदेत कौतुक झालं. या यशाबद्दल या विद्यार्थिनींसह त्यांच्या मार्गदर्शक डॉ. प्राध्यापक वंदना जाधव यांना महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव थोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. 
****

 गुवाहाटी इथं काल तिसऱ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचा समारोप झाला. केंद्रीय क्रिडा मंत्री किरेन रिजिजू, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत ७५ सुवर्ण पदकांसह एकूण २४५ पदकं जिंकून महाराष्ट्रानं प्रथम क्रमांक मिळवला. ६३ सुवर्ण पदक मिळवून हरियाणा दुसर्या, तर ३६ सुवर्ण पदकांसह दिल्ली तिसर्या स्थानावर राहीला. या तिनही संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला.
****

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठं आणि महाबीज यांच्या कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन काल डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेत २०० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत.
****

स्वामी रामानंद तीर्थ यांनी पुकारलेला हैदराबाद मुक्तिलढा हा प्रतिगामी अन्याय्य निजामी राजवटी विरुद्धचा लढा होता, असं मुस्लीम सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते प्राध्यापक शमसुद्दिन तांबोळी यांनी म्हटलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल अंबाजोगाई इथं, जागर लोकशाहीचा या कार्यक्रमात ते बोलत होते. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
****

 जनता दल सेक्युलरच्या नांदेड शाखेचा सुधाकरराव डोईफोडे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी नेते सदाशिवराव पाटील यांना काल प्रदान करण्यात आला. तर सुधाकरराव डोईफोडे राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार अहमदनगर इथले पत्रकार सुधीर लंके यांना प्रदान करण्यात आला. माजी खासदार डॉ व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतीचिन्ह, देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
****

 ब्राह्मण समाजाच्या उत्थानासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, तसंच समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित मान्य कराव्यात यासाठी ब्राह्मण समाजाच्या वतीनं बीड इथं जिल्हाधिकारी कार्यलयासमोर काल धरणं आंदोलन करण्यात आलं. या मागण्यांचं निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना देण्यात आलं. अंबाजोगाई इथंही ब्राह्मण समाजाच्यावतीनं उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्याचं निवेदन सादर केलं.
****
 नागरिकत्व सुधारणा कायदा हा शरणार्थी हिताचा असून घुसखोरांविरोधात कारवाई करणारा असल्याचं प्रसिद्ध अभिनेते दलितमित्र राहुल सोलापूरकर यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं, एका व्याख्यानात बोलत होते. जे लोक वर्षानुवर्षे भारतात राहत आहेत त्यांना या कायद्यामुळे कसलाही धोका नाही, याकडे सोलापूरकर यांनी लक्ष वेधलं.
****
 नांदेड जिल्ह्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एक आरोपी शिक्षक सय्यद रसुल याला पोलिसांनी अटक केली आहे. या चारही शिक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे.

 दरम्यान, आरोपी शिक्षकांना अटक करुन फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी काल जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आरोपी शिक्षकांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन करण्यात आलं. बिलोली शहरात बंद पाळण्यात आला. आरोपींवर कारवाईच्या मागणीची निवदेनंही विविध संघटनांकडून प्रशासनाला देण्यात आली.
*****
***

No comments: