Wednesday, 29 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 29.01.2020 TIME - 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 January 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक२९ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** नाशिक जिल्ह्यात परीवहन महामंडळाची बस आणि रिक्षा अपघातानंतर विहिरीत कोसळली; २५ जणांचा मृत्यू, १८ जखमी
** यापुढे राजकीय पक्ष, आणि संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स ॲण्ड ॲग्रीकल्चरचा निर्णय
** शिवभोजन थाळी योजनेची व्याप्ती वाढवण्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचे संकेत
आणि
** नांदेडमध्ये कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण
****
नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यात बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला, तर १८ जण जखमी झाले आहेत. काल दुपारी धुळे इथून राज्य परिवहन महामंडळाची विनाथांबा बस कळवणच्या दिशेनं जात असताना हा अपघात झाला. सौंदाणे- देवळा रस्त्यावर मेशी फाट्यावरच्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं समोरून येणाऱ्या काळ्यापिवळ्या ॲपे प्रवासी रिक्षावर ही बस आदळली. त्यानंतर बससह रिक्षा रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली.  जखमींवर देवळा ग्रामीण, मालेगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला असून, जखमींना तातडीनं योग्य ती वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळानं मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये, तर जखमींना दहा हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
****
विकासाचा वेग साधायला हवा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नागपूर मेट्रोचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल मुंबईतून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.  विकास कामांच्या बाबतीत केंद्र सरकार राज्य सरकारची साथ सोडणार नाही, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्य मंत्रिमंडळातले सदस्य यावेळी उपस्थित होते. नागपूर मेट्रोचं श्रेय आपलं नसून, या मेट्रोसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचं हे श्रेय असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी, गडकरी तसंच फडणवीस यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं
नागपूर मेट्रोच्या या पहिल्या टप्प्यात अकरा किलोमीटर लांबीच्या सीताबर्डी ते लोकमान्य नगर या मार्गावर मेट्रो धावणार असून, या मार्गावरची सहा स्थानकं सुरु झाली आहेत.
****
महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स ॲण्ड ॲग्रीकल्चरनं यापुढे राजकीय पक्ष, संघटना यांनी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. बंदमध्ये व्यापारी, दुकानदार, उद्योजक सहभागी झाल्यानं राष्ट्राचं नुकसान होऊन, ग्राहकांचे हाल होतात, त्यामुळे व्यवसाय बंद न ठेवता यापुढे काळ्या फिती लाऊन बंदला पाठिंबा देणार असल्याचं संघटनेचे अध्यक्ष संतोष मंडले यांनी काल सांगितलं.
****
राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागानं घेतला आहे. सरकारनं घोषित केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी व्हावी, सहकार खात्याचे अधिकारी निवडणूक कामात अडकून पडू नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
****
विद्यापीठ आणि महाविद्यालयातल्या सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीतानेच करावी, असा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मुंबईत एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती निर्माण व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. याशिवाय मातृभाषेचा अभिमान म्हणून सर्व महाविद्यालयाच्या नावाचे फलक हे मराठीतच लावावेत, अशा सूचनाही महाविद्यालयांना देण्यात येणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.
****
दुष्काळी भागातल्या नागरिकांना प्रामुख्यानं पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं या हेतूनं प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी दमणगंगा-पिंजाळ आणि नार-पार-दमणगंगा-तापी-गोदावरी या नदीजोड प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण बैठक काल मंत्रालयात पार पडली. यावेळी महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी महाराष्ट्रालाच मिळावं, अशी भूमिका राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली.
****
शिवभोजन थाळी योजनेची व्याप्ती वाढवण्याचे संकेत, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. या विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी काल भुजबळ यांना, शिवभोजन केंद्रावर दुपारी १२ वाजताच जेवणासाठी लागणाऱ्या रांगा, आणि लाभार्थींची माहिती दिली, त्यावेळी भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवभोजन ॲपच्या माध्यमातून दररोज प्रत्येक जिल्ह्यातल्या या योजनेचे लाभार्थी आणि इतर माहितीचा आढावा घेत असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवभोजन थाळीच्या लाभार्थींशी दूरदृश्य प्रणालीनं संवाद साधून या योजनेचा आढावा घेतला, कोल्हापूर तसंच नंदूरबार इथं या योजनेअंतर्गत भोजन करत असलेल्या लाभार्थींनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना या योजनेबद्दल समाधान व्यक्त केलं.
****
विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संजय दौंड यांनी काल विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधान भवनातल्या आपल्या दालनात दौंड यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
देशात जाती धर्माच्या नावाखाली समाजात द्वेष निर्माण करण्याचं षडयंत्र हाणून पाडत हम भारत के लोग ही संकल्पना जपावी लागेल, असं विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं काल जाहीर सभेत ते बोलत होते. बेरोजगारी, खासगीकरण, देशाची अर्थव्यवस्था, शेतकरी आत्महत्या आदी मुद्यांवरुन त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जाती पातीच्या राजकारणाला बळी न पडता, सरकारला आपले प्रश्न विचारले पाहिजे, असं ते म्हणाले.
****
नांदेडमध्ये कोरोना व्हायरसचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. या रुग्णावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा रुग्ण काही कामानिमित्त चीनमध्ये गेला होता. विमानतळावर तपासणी केली असता व्हायरसची लागण झाली नव्हती, मात्र अचानक सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानं तो स्वत: रुग्णालयात दाखल झाला.
****
परभणी जिल्ह्यातल्या ढोकेश्वर मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतल्या अपहार प्रकरणी अध्यक्ष सतीश काळे यांच्यासह चौघांजणांना पोलिसांनी अटक केली आहे. संस्थेच्या परभणी आणि जिंतूरमधल्या शाखेत ३६ लाख रुपये अपहार केल्याप्रकरणी काल ही कारवाई करण्यात आली. क्षेत्रीय अधिकारी अशोक राठोड, शाखाधिकारी सुनिल मुळे, लेखापाल संतोष आडे अशी उर्वरित तिघांची नावं आहेत. या प्रकरणाची फिर्याद आठ ऑगस्ट २०१८ रोजी दाखल झाली होती, तेव्हापासून हे सर्व आरोपी फरार होते.
****
जालना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पथकानं काल जालना जिल्ह्यात पाच अवैध सावकारांच्या घरांवर छापे टाकून विविध व्यवहारांचे दस्तावेज, नोंदवह्या आणि इतर कागदपत्रं जप्त केली. यामध्ये जालना इथल्या चार तर परतूर इथल्या एका सावकाराचा समावेश आहे. जप्त कागदपत्रांची तपासणी करून संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी सांगितलं.
****
लातूर इथं झालेल्या विभागीय पर्यावरण एकांकिका शालेय नाट्य स्पर्धेत औरंगाबाद इथल्या अनंतराव भालेराव विद्यामंदिराच्या एकांकिकेनं पहिला क्रमांक पटकावला. लातूर इथलं सुशिलादेवी देशमुख मूकबधीर विद्यालय आणि औरंगाबादच्या शारदा मंदीर कन्या प्रशालेच्या संघाला दुसरा क्रमांक विभागून देण्यात आला, तर बीड जिल्ह्यातल्या पाटोद्याच्या छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या संघाचा तिसरा क्रमांक आला. तिन्ही संघांना अनुक्रमे पंधरा हजार, दहा हजार तसंच पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं.
****
नांदेडच्या नानक साई फाउंडेशनच्या राज्यस्तरीय दलितमित्र श्री धनाजीराव घोडजकर समाजभूषण पुरस्कारांची काल अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी घोषणा केली. अकोल्याचे सामाजिक किर्तनकार सत्यपाल महाराज, भटक्या विमुक्त चळवळीतल्या सामाजिक  कार्यकर्त्या पुण्याच्या सुषमा अंधारे आणि मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मधुकर गायकवाड यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ११ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
लातूर शहरात अनधिकृत फलक, कमानी, झेंडे लाऊन शहरास विद्रुप करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना कोर्ट कमिशनर विधिज्ञ जगन्नाथ चित्ताडे यांनी पालिका आयुक्त, महापौर आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे. पोलीस अधिक्षकांनी उपअधिक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करावी, तसंच संबंधित कर्मचारी आणि बीट मार्शल यांना असे अनधिकृत फलक, कमानी, झेंडे लावणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, असं चित्ताडे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
गणपती जन्मोत्सवानिमित्त जालना जिल्ह्यातल्या राजूर इथल्या गणपती मंदिरात काल अखंड हरिनाम सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. जन्मोत्सवानिमित्त गणपती मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
****
नांदेड-औरंगाबाद-नांदेड या विशेष गाडीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नांदेड-श्रीगंगानगर-नांदेड, तसंच नांदेड-पनवेल-नांदेड या दोन्ही रेल्वेगाड्यांमध्ये शयनयान श्रेणीचा एक डबा तात्पुरता वाढवण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड कार्यालयानं दिली आहे. 
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज हॅमिल्टन इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे बारा वाजता सामन्याला सुरुवात होईल
****


No comments: