Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 28 January 2020
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २८ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** केंद्राकडे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी
लावण्यासाठी खासदारांची समिती नेमण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घोषणा
** राज्यात सरपंच पदाची थेट निवडणूक घेण्याची पद्धत रद्द करण्याच्या राज्य
सरकारच्या निर्णयाला नऊ हजार ग्रामपंचायतींचा विरोध
** भारतीय जनता पक्ष
सरकारच्या काळातल्या योजना बंद केल्यास, तीव्र आंदोलन करण्याचा विधानसभेचे विरोधी पक्ष
नेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
आणि
** स्वच्छता आणि गुणवत्तेसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्लास्टिकच्या कॅनचा वापर न करण्याचं आमदार हरिभाऊ बागडे यांचं आवाहन
****
केंद्राकडे प्रलंबित असलेले प्रश्न लवकर मार्गी
लावण्यासाठी खासदारांची समिती नेमण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
यांनी केली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर
राज्यातल्या सर्व खासदारांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली
काल झाली, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या प्रश्नांबाबत विषयनिहाय गट करून कसोशीने पाठपुरावा करणार असल्याचं सांगत
शिवसेना खासदार अरविंद सावंत समितीचे समन्वयक असतील असंही त्यांनी जाहीर केलं.
****
पार्श्वगायक अदनान सामी यांना
पद्मश्री पुरस्कार जाहीर करणं, हा एकशे तीस कोटी भारतीयांचा अपमान असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं म्हटलं आहे. पक्षाचे प्रवक्ते
नवाब मलिक यांनी, काल मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलताना, नागरिकत्व सुधारणा कायदा तसंच राष्ट्रीय
नागरिकत्व नोंदणी या दोन निर्णयांवरून होत असलेल्या टीकेवर सारवा सारव म्हणून हा केंद्र
सरकारनं अदनान सामीला हा पुरस्कार जाहीर केल्याची टीका केली.
****
राज्यात सरपंच पदाची थेट निवडणूक
घेण्याची पद्धत रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला हजारो ग्रामपंचायतींनी विरोध
केला असल्याचं महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी काल सांगितलं.
नऊ हजार ग्रामपंचायतींनी सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात प्रस्ताव
पारित केल्याचं ते म्हणाले. आता नवीन नियमानुसार निवडून आलेले
सदस्यच सरपंचाची निवड करतील.सरपंचाच्या थेट निवडीचा नियम मागच्या
भारतीय जनता पक्ष सरकारच्या काळात बनवला होता, याला त्यावेळी सत्तेत असलेल्या शिवसेनेनं विरोध केला होता.
****
मुंबईत व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक
यांनी काल राज्यभरातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं राज्यातली १००
आयटीआय केंद्र व्हर्च्युअल क्लासरुमद्वारे जोडली आहेत, या
विभागाचं सक्षमीकरण करुन तरुणांच्या कौशल्यांचा विकास करणं
आणि त्याद्वारे बेरोजगारी दूर करणं हे आपल्या विभागाचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. संचालनालयाच्या कार्यालयाला भेट
देऊन मलिक यांनी विविध योजनांचा आढावा घेतला.
****
दिल्लीतल्या निर्भया लैंगिक
अत्याचार आणि हत्या प्रकरणातला दोषी मुकेशकुमार सिंहनं दाखल केलेल्या याचिकेचीर प्राधान्यानं सुनावणी घेण्यास न्यायालयानंही मंजुरी दिली आहे. सुनावणीसाठीची आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या
पीठानं, मुकेशकुमारच्या वकिलांना दिले आहेत. मुकेशकुमारचा
दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला होता, त्या विरोधात त्यानं सर्वोच्च न्यायालयात दाद
मागितली आहे. या प्रकरणातल्या चारही दोषींना येत्या एक फेब्रुवारीला
फाशी दिली जाणार आहे, यासाठीचे मृत्यू आदेशही जारी करण्यात आले
आहेत.
****
प्रवाशांच्या सुविधेसाठी
अत्याधुनिक बसस्थानकांचे आराखडे सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी महामंडळाच्या
अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईत मंत्रालयात
राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस.टी.च्या बसस्थानकांबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत ते
बोलत होते. बस स्थानकांच्या स्वच्छतेसह, आसन व्यवस्था-
स्वछतागृहे, पिण्याचं पाणी याकडे महामंडळानं विशेष लक्ष देण्यची गरज परब यांनी व्यक्त केली.
***
भारतीय जनता पक्ष सरकारच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या योजना विद्यमान सरकारनं
बंद केल्यास, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
पक्षाच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काल औरंगाबादमध्ये
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. त्यावेळी
ते वार्ताहरांशी बोलत होते. जलयुक्त शिवार योजना ही जनतेची योजना असून,
ती बंद करू नये, असं आवाहन फडणवीस यांनी यावेळी
केलं.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी
मराठवाड्याच्या पाण्यासाठी पुकारलेलं लाक्षणिक उपोषण सरकारच्या विरोधात नव्हे तर सरकारचं
लक्ष वेधण्यासाठी असल्याचं सांगितलं.
मुंडे यांच्या
नेतृत्वाखाली झालेल्या या लाक्षणिक उपोषणात विधानसभेतले विरोधी
पक्षनेते फडणवीस, विधान परीषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब
दानवे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर,
विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल
सावे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झाले होते.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
दुधाची स्वच्छता आणि गुणवत्तेसाठी
दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्लास्टिकच्या कॅन वापरू नयेत, असा सल्ला औरंगाबाद
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी दिला आहे.
औरंगाबाद इथं दूध उत्पादक संघाच्या गांधेली इथल्या दुग्धशाळेचं विस्तारीकरण
आणि आधुनिकीकरण प्रकल्पाचं उद्घाटन रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे
यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते
बोलत होते. दूध उत्पादक शेतकरी आत्महत्या
करत नसल्याचं सांगतांना ते म्हणाले.
दुध उत्पादक
कुठेही आत्महत्या केल्याचं चित्र मला दिसत नाही. म्हणुन दुधाचा व्यवसाय या व्यवसायामुळे
गावातील गरिबांच्या हाताला काम मिळेल शेतकऱ्याला खत
शेनखत मिळेल आणि ते शेन खत शेतात गेलं की उत्पादकन वाढेल ही भुमिका होती. म्हणुन ही
देअरी स्थापन केली. आज दुध उत्पादकाला
फायदा होतो.
मंत्री भुमरे
यांनी खाजगी संघापेक्षा आपला सहकारी दूध संघ सरस ठरल्याचं सांगत दूध संघाच्या कार्याची
प्रशंसा केली. ते म्हणाले
आपल्या मराठवाड्यात असा एक आपला संघ आहे. शेतकऱ्याला फरक पण आणि बोनस पण देणारा आपला
संघ आहे. तुम्हाला मी सांगतो Private संघापेक्षा आपला सहकारी संघ नंबरचा एक आहे. Private संघ आपण पाहिलेली आहेत आणि सहकार संघ हे लयास गेलेली आहेत. आपला संघ आहे
जो नफ्यात आहे.
****
केंद्र सरकार देशाच्या हिताचे
कायदे बनवत आहे, मात्र अशा कायद्यांना विरोध करण्यासाठी जातीय तेढ निर्माण करण्याचं काम विरोधी
पक्षं करत आहेत असा आरोप, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांनी केला आहे. ते काल नांदेड इथं खासदार प्रतापराव पाटील
यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
****
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेचे संचालक तथा बीड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत शेजुळ यांनी संचालक पदाचा काल
राजीनामा दिला. या राजीनाम्याचे कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं, तरी बीड
जिल्हा परिषदेच्या सभापती पदावर वर्णी न लागल्यानं नाराजीतून हा राजीनामा दिल्याचं
बोललं जात आहे.
****
लातूरच्या विलास सहकारी साखर
कारखान्याच्या अध्यक्षपदी वैशाली देशमुख तर उपाध्यक्षपदी रविंद्र काळे यांची बिनवीरोध
निवड झाली. काल या पदांच्या निवडीसाठी संचालक मंडळाची सभा झाली.
****
नांदेड शहरातल्या वजीराबाद
इथल्या मुथा चौकात काल सौर ऊर्जेवर चालणारं सिग्नल यंत्र बसवण्यात आलं आहे. शहरात वीज बील बचत
करण्याच्या दृष्टीनं महानगर पालिकेच्यावतीनं प्रायोगिक तत्त्वावर यंत्र बसवण्यात आलं
आहे.
****
जालना जिल्ह्यात काल दोन वेगवेगळ्या
घटनांमध्ये दोन बालकांचा मृत्यू झाला. जालना शहरातल्या शीशटेकडी भागात नगरपालिकेच्या
घंटा गाडीच्या धडकेत गुफरान ऐजाज शेख या दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तर भोकरदन तालुक्यातल्या दानापूर इथं, दंतमंजन समजून
विषारी कीटकनाशक पावडर खाल्ल्यानं स्वरा दळवी या चार वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला.
****
नांदेड जिल्हा नियोजन
समितीच्या पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत साडेचारशे
कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास काल मंजुरी देण्यात आली. यावेळी जिल्ह्यातल्या सर्व आमदारांनी पाणी टंचाई
आराखड्याच्या बैठका घेऊन त्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे येत्या १० फेब्रुवारी
पर्यंत सादर करण्याचं सूचित करण्यात आलं.
***
जालना जिल्ह्यात बदनापूर इथल्या नगर
पंचायत कार्यालयातला कर निर्धारक गणेश सूरवसेला वीस हजार रुपयांची लाच घेतांना काल रंगेहाथ पकडण्यात
आलं. मद्य विक्रेत्याला ना हरकत प्रमाणपत्र
देण्यासंदर्भात त्यांन ही लाच मागितली होती.
****
शौचालय बांधून त्याचा नियमित
वापर करावा असं आवाहन परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातल्या शालेय विद्यार्थ्यांनी
आपल्या पालकांना केलं आहे. शौचालयाबाबत विद्यार्थ्यांनी पालकांना पत्र लिहिण्याची अभिनव कल्पना
मानवत पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी प्रणोती श्रीमाळ यांनी तालुकाभर राबवली.
गट शिक्षणाधिकारी संजय ससाणे आणि शिक्षण विस्तार अधिकारी डी आर रणमाळे
यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
****
No comments:
Post a Comment