Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 23 January 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २३
जानेवारी
२०२० दुपारी ०१.०० वाजता
****
नेताजी सुभाषचंद्र बोस
यांची एकशे तेवीसावी जयंती आज देशात सर्वत्र साजरी होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद,
उपराष्ट्रपती एम वेंकैय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र
बोस यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशातल्या सर्वात
लाकप्रिय नायकांपैकी एक असुन ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले प्रमुख सैनिक आहेत, असं
राष्ट्रपती कोविंद यांनी या संदर्भातील आपल्या संदेशात म्हंटलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या योगदानाबद्दल
भारत नेहमीच कृतज्ञ राहील असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. सुभाषचंद्र
बोस हे देशाच्या प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी झटत होते, असंही त्यांनी नमुद केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचे संस्थापक
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेबांना भारतीय
नितीमूल्यांचा नेहमीच गर्व होता तसंच त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी असलेले मुद्दे मांडण्यासाठी
नेहमी पुढाकार घेतला, असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी अर्थात राष्ट्रीय
नागरिक नोदंणीबाबत मुस्लीम समाजाला वाटणारी चिंता दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी काल मुस्लीम समाजाच्या वीस सदस्यीस शिष्टमंडळाशी चर्चा केली. मुंबई प्रत्येक
भारतीयाची आहे आणि जे इथं पिढया न पिढ्या राहत आहेत त्यांना हटवलं जाणार नाही, अशी
ग्वाही ठाकरे यांनी या शिष्टमंडळाला दिली. केरळ आणि पंजाबप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेत
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ठराव आणण्याच्या या शिष्टमंडळाच्या मागणीवर मात्र
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही.
****
राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगानं आज औरंगाबाद
इथं निवडणूक आयोग आणि जिल्हा परिषद समाज कल्याण
विभागाच्या वतीनं दिव्यांग मतदाता जागरूकता अभियाना अंतर्गत दिव्यांग कर्मचारी फेरी
काढण्यात आली. उप जिल्हा निवडणूक अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी या फेरीला हिरवा
झेंडा दाखवून सुरुवात केली. जिल्ह्यातल्या दिव्यांग आणि मूकबधिर शाळेतील विद्यार्थी
या फेरीत सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद पर्यंत असा या फेरीचा
मार्ग होता.
****
मौलाना आझाद विचार मंच
आज औरंगाबाद इथं राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेत आहे. या शिबीराचं उद्घाटन
एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या हस्ते झालं. विचार मंचचे अध्यक्ष
खासदार हुसेन दलवाई, डॉ. भालचंद्र मुणगेकर, सुभाष लोमटे, माजी खासदार उत्तमसिंह पवार
उदघाटन समारंभात सहभागी झाले होते.
****
औरंगाबादच्या महावितरण प्रादेशिक कार्यालय आणि महावितरण
परिमंडळ कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आज कार्यक्रम घेण्यात
आला. या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेला प्रभारी
प्रादेशिक संचालक सुरेश गणेशकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात
आलं.
****
राज्य वृतपत्र वितरक
संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन येत्या रविवार, सोमवारी सांगली इथं आयोजित करण्यात आलं
असल्याची माहिती संघटनेचे राज्य सरचिटणीस बालाजी पवार यांनी आज नांदेड इथं दिली. या
अधिवेशनाचं उद्घाटन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
गेल्या एक जानेवारी रोजी प्रारंभ झालेल्या अहमदाबाद - मुंबई तेजस एक्स्प्रेसला
काल सुमारे दीड तास उशीर
झाल्यानं सुमारे तीन हजार तीस प्रवाशांना प्रत्येकी शंभर रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल, असं रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे.
मुंबईच्या बाहेरील भागात तांत्रिक अडचणीमुळे तेजस एक्स्प्रेस आणि काही
इतर उपनगरी आणि बाहेरील गाड्या थांबविण्यात आल्यानं या रेल्वेला
उशीर झाल्याचं रेल्वे अधिकाऱ्यानी म्हटलं आहे.
****
गुवाहाटी इथं तिसऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत
महाराष्ट्र संघानं अठ्ठ्याहत्तर सुवर्ण पदकांसह एकूण दोनशे छप्पन्न पदकं जिंकून प्रथम
स्थान पटकवलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या यशाबद्दल राज्या संघाचं अभिनंदन केलं
आङे. या स्पधेर्धेत अडूसष्ठ सुवर्ण पदकं मिळवून हरियाणा दुसऱ्या आणि एकोनचाळीस सुवर्ण
पदकांसह दिल्ली संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू,
आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा काल समारोप
झाला.
****
बल्गेरियात सुरु असलेल्या स्ट्रँडजा स्मृती मुष्टीयुद्ध
स्पर्धेत भारताच्या निखात झरीन आणि चार वेळचा विजेता शिवा थापा यांनी उपांत्यपूर्व
फेरीत धडक मारली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment