Monday, 27 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 27.01.2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 January 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७  जानेवारी २०२० दुपारी१.०० वाजता
****
मराठवाड्याच्या पाण्यासाठी पुकारलेलं आजचं लाक्षणिक उपोषण सरकारच्या विरोधात नव्हे तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी असल्याचं, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे, त्या आज औरंगाबाद इथं लाक्षणिक उपोषणाला प्रारंभ करताना बोलत होत्या. मुंडे यांच्या नेतृत्वात पुकारण्यात आलेल्या या लाक्षणिक उपोषणात विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झाले आहेत.
यावेळी केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी, आपल्या कार्यकाळात कार्यान्वीत केलेल्या योजना विद्यमान सरकारनं पुढे सुरू ठेवून मराठवाड्याचा दुष्काळ दूर करावा, असं आवाहन केलं. या योजना बंद झाल्यास, तीव्र आंदोलनाचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. जलयुक्त शिवार योजना ही जनतेची योजना असून, ती बंद करू नये, असं आवाहन फडणवीस यांनी यावेळी केलं.
****
चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत देशभरात तीन हजार शंभर कोटींपेक्षा अधिक रकमांचे व्यवहार डिजिटल माध्यमातून झाले असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशभरात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी गेल्या अर्थसंकल्पात अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. देशभरात जवळपास अकरा लाख आधार संलंग्नित भीम ॲप पॉइंटच्या माध्यमातून डिजिटल आर्थिक व्यवहार केले जात असल्याचं, या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दिल्लीतल्या निर्भया लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला एक दोषी मुकेशकुमार सिंह याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, दाखल आपली याचिका तातडीनं सुनावणीला घ्यावी, अशी मागणी केली आहे. मुकेशकुमार याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला होता, त्या विरोधात त्यानं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या प्रकरणातल्या चारही दोषींना येत्या एक फेब्रुवारीला फासावर चढवलं जाणार आहे, यासाठीचं डेथ वॉरंटही जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे मुकेशकुमार याची याचिका प्राधान्यानं  सुनावणीला घेण्यास न्यायालयानंही मंजुरी दिली आहे. यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं, मुकेशकुमार यांच्या वकिलांना दिले आहेत.
****
भारतीयांच्या भावनांशी संलग्नीत “भारत पर्व-२०२०” महोत्सव नवी दिल्लीतल्या लालकिल्ला मैदानावर कालपासून सुरु करण्यात आला. हा महोत्सव एक फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. भारतीयांना आपल्या देशातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी प्रोत्साहित करणं, तसंच “आपला देश पाहणं ही भावना वाढवणं हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. या पर्वात सर्वसामान्य जनतेसाठी प्रजासत्ताक दिवसाच्या पथसंचलनाच्या काही क्षणांचं प्रदर्शन तसंच सशस्त्र दलाच्या बँड पथकासह इतरही आकर्षणं ठेवण्यात आली आहेत.
****
पाकिस्ताननं युद्धविरामाचं पुन्हा एकदा उल्लंघन केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यातल्या डेगवार भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं काल सायंकाळी उखळी तोफगोळ्यांचा मारा तसंच गोळीबार केला. भारतीय सैन्यानं याला चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानच्या या माऱ्यात परिसरातल्या काही घरांचं नुकसान झालं आहे. अखेरचं वृत्त हाती येईपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच होता, असं यावृत्तात म्हटलं आहे.
****
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर इथं श्रीमती साळुंकाबाई राऊत कला आणि  वाणिज्य महाविद्यालयातल्या, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यामुळे भूजल पातळीत वाढ होणार असून उन्हाळ्यात पशू पक्षांची तहान भागवली जाऊ शकणार आहे.
****
मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात २८३ अंकांची घसरण झाली आणि तो ४१ हजार ३३० अंकांवर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ८९ अंकांची घसरण झाली आणि तो १२ हजार १५९ अंकांवर आला. चलन बाजारात रुपया १० पैशांनी घसरला. आज सकाळी विनिमय दर प्रति डॉलर ७१ रुपये ४३ पैसे एवढा होता.
****
अमेरीके पीटर्सबर्ग इथं सुरु असलेल्या खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या सौरव घोषालनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत घोषालनं इजिप्तच्या उमर मोसादला ११-६, १६-१८, ११-१७, १२-१० अशा फरकानं हरवलं. अंतिम फेरीत सौरवचा सामना इजिप्तच्या फेरेस डेसाउकी सोबत होणार आहे.
****

No comments: