Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 23 January 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ जानेवारी २०२० सायंकाळी ६.००
****
राज्य दहशतवाद विरोधी पथकानं २०१८ मधील नालासोपारा शस्त्रास्त्र
साठा आणि २०१७ मधील पुण्यातील सनबर्न महोत्सवावरील हल्ल्याचा कट या प्रकरणी हव्या असलेल्या
आरोपीला अटक केली आहे. पश्चिम बंगालच्या या रहिवाशाला दक्षिण चोवीस परगणा जिल्ह्यातील
नैनपूर इथं या आठवड्याच्या प्रारंभी अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज मुंबईत
दिली. प्रताप जुदिष्ठर हाजरा असं या आरोपीचं नाव असून न्यायालयानं त्याला तीस तारखेपर्यंत
दहशतवाद विरोधी पथकाची कोठडी सुनावली असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केलं. यावेळी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी मंत्री
अर्जुन खोतकर उपस्थित होते.
जालना जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती
आज साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज नांदेड
इथं रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं. वाशीम शहरात शिवसेनेच्यावतीनं दुचाकी फेरी काढण्यात
आली. अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे युवा सेनेनं बोरगाव धंदे इथल्या मातोश्री वृद्धाश्रमात वृद्धांना उपयोगी कपडे आणि
अल्पोपहाराचं वाटप केलं. तसंच येरली इथल्या
जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं.
****
दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी
भाजपतर्फे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद इथं सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर
लाक्षणिक उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी
एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. या उपोषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय
राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान
परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणातल्या दोषींवर कारवाई केली जाईल असं
कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे. ते सांगली इथं बातमीदारांशी बोलत
होते.
****
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्रानं अव्वल
स्थान पटकवल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खेळाडुंचं अभिनंदन केलं आहे. स्पर्धेत
महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षीही सर्वसाधारण विजेता ठरला, ही बाब अभिमानास्पद आहे, या
युवा खेळाडुंना यापुढंही अशीच चमकदार कामगिरी करता यावी, यासाठी सर्वतोपरी पाठबळ दिलं
जाईल, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल
केदार यांनीही सर्व खेळाडुंचं अभिनंदन केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ
घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचं आवाहन जिल्हा
प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे. योजनेची अमलबजावणी सुरू झाल्यापासून जिल्ह्यातल्या
एकतीस हजार पाचशे चौरेचाळीस शेतकऱ्यांपैकी तेवीस हजार सतरा शेतकऱ्यांचे बँक खाते आधार
क्रमांकाशी संलग्न करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी
दिली आहे.
****
औरंगाबाद जिंतूर या राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी कंटेनर आणि
दुचाकीची धडक होऊन दोन जण मृत्यूमुखी पडले. औंढा तालुक्यातील गोळेगाव जवळ हा अपघात
झाला. शिवाजी यादवराव शिंदे आणि आकाश किशन
शिंदे हे काका - पुतणे या अपघातात मृत्यूमुखी पडले.
****
धुळे जिल्ह्यात आज सकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील कुंडाणे फाट्याजवळ
ट्रकशी झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. राजेंद्र बन्सीलाल भावसार यांचा
या अपघातात मृत्यू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी महामार्गावर गतिरोधक टाकण्यात यावं
अशी मागणी करत `रस्ता बंद` आंदोलन केलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातील मूळज इथले शिवाजीराव
प्रतापराव चालुक्य यांचं आज दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. ते एकोणसत्तर
वर्षांचे होते. उमरगा इथल्या छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे तसंच शिवशक्ती सहकारी
साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते. शिवाजीराव चालुक्य यांचा राजकीय आणि शैक्षणिक
क्षेत्रात सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार केले
जाणार आहेत.
****
No comments:
Post a Comment