Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 January 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ३१ जानेवारी २०२० दुपारी ०१.०० वाजता
****
केंद्र सरकारला मिळालेला जनादेश नवभारताच्या निर्माणासाठी असल्याचं, राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे, ते आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ
करताना, दोन्ही सदनांच्या संयुक्त सभेला संबोधित करत होते. इज ऑफ डुईंग बिजनेसमुळे
जगभरात भारताच्या मानांकनात ७९ अंकांची सुधारणा झाल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. नागरिकत्व
सुधारणा कायदा, आणि जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासह केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांचा
राष्ट्रपतींनी आढावा घेतला. राष्ट्रपतींनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उल्लेख करताच,
विरोधी पक्षांच्या खासदारांनी याविरोधात घोषणाबाजी केली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेच्या दोन्ही सदनांच्या कामकाजाला आजपासून
प्रारंभ झाला. लोकसभेत नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन
यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनासमोर सादर केला. त्यानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला
यांनी सदनाची कारवाई उद्या सकाळपर्यंत स्थगित केली.
****
या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून आगामी दशकाची भक्कम पायाभरणी होईल, यासाठी सर्वांनी
प्रयत्न करावेत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज संसद भवन
परिसरात पत्रकारांशी बोलत होते. समाजातल्या दुर्बल घटकांच्या सशक्तीकरणावर केंद्र सरकार
भर देत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. अधिवेशन काळात संसदेच्या दोन्ही सदनात विविध मुद्यांवर
सकारात्मक चर्चेची अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
****
महाराष्ट्र सरकार लवकरच ३५४ सरकारी शाळांमधे एसपीसी अर्थात छात्र पोलीस उपक्रम
सुरु करणार आहे. या कार्यक्रमातंर्गत सरकारी शाळांमधल्या इयत्ता आठवी आणि नववीच्या
निवडक विद्यार्थ्यांना कम्युनिटी पोलिसिंग, रस्ते सुरक्षा, महिला आणि बालकांची सुरक्षा,
भ्रष्टाचार प्रतिबंधक उपाययोजना, तसंच आपत्ती व्यवस्थापन इत्यादी बाबींचं प्रशिक्षण
दिलं जाणार आहे.
****
औरंगाबाद जालना मार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात चार जण ठार तर नऊ जण जखमी
झाले. नाशिक जिल्ह्यातून देवदर्शनाला गेलेल भाविक जालन्याकडे परतत असताना, त्यांची
जीप, औरंगाबाद हून जालन्याकडे जाताना करमाड इथं रस्त्यावर उभ्या ट्रकवर मागून धडकल्यानं
हा अपघात झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या संत एकनाथ रंग मंदिराच्या दुरुस्तीसाठी सात कोटी त्रेसष्ट लाख
रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीचं पत्र आमदार अंबादास दानवे यांनी सांस्कृतिक
मंत्री अमित देशमुख यांना सादर केलं आहे. गेल्या सुमारे दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून
हे नाट्यगृह दुरुस्तीकामासाठी बंद आहे. एकूण दुरुस्तीसाठी नऊ कोटी त्रेसष्ट लाख रुपये
निधी आवश्यक असताना, यापूर्वी दोन कोटी रुपये निधी प्राप्त झाला, त्यातून काही काम
झालं आहे, काम पूर्ण करण्यासाठी उर्वरित निधी देण्यात यावा, असं आमदार दानवे यांनी
या पत्रात म्हटलं आहे.
****
चीनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या, रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या तीनही
मुली सुखरुप असून त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
यांनी सांगितलं. या तिघींपैकी एका मुलीशी थेट संपर्क साधला असता ही माहिती मिळाल्याचं
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे चीनमधल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधून
या तिघींना लवकरात लवकर भारतात आणण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचं जिल्ह्याधिकारी
म्हणाले.
दरम्यान, हा विषाणू चीनमधून जगभरात पसरण्याची शक्यता लक्षात घेता जागतिक आरोग्य
संघटनेनं आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. यात चीनवर अविश्वास व्यक्त करण्याचा
विचार नसून परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुरेसे सक्षम नसलेल्या इतर देशांना मदत करण्याचा
हेतू आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या विषाणूचा उद्रेक टाळण्यासाठी
जलद उपाययोजना केल्याबद्दल त्यांनी चीन सरकारचं कौतुक केलं.
****
भारतीय हॉकीपटू कर्णधार राणी रामपाल हिला वर्ल्ड ॲथलीट ऑफ दी इयर हा पुरस्कार
जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळणारी ती पहिली हॉकीपटू आहे. जागतिक क्रीडा संस्थेनं
क्रीडा प्रेमींच्या मतदानानंतर राणीची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
****
भारत आणि न्यूझीलॅँड यांच्यातला चौथा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट सामना आज वेलिंग्टन
इथं खेळला जात आहे. न्यूझीलॅँड संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी
पाचारण केलं. भारताचा सलामीवीर संजू सॅमसन आठ धावा करून तंबूत परतला. अखेरचं वृत्त
हाती आलं तेव्हा भारताच्या दोन षटकांत एक बाद सोळा धावा झाल्या होत्या. पाच सामन्यांच्या
या मालिकेत भारतानं तीन-शून्य अशी विजयी आघाडी घेतलेली आहे.
****
No comments:
Post a Comment