Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 30 January 2020
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ३० जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचांची निवड करण्याच्या
निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
** गर्भपातासाठीची मुदत पाच महिन्यावरून सहा महिने करण्याची तरतूद
असलेल्या सुधारित
वैद्यकीय गर्भधारणा निरस्तीकरण विधेयकाला केंद्र सरकारची मान्यता
** ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
** नागरिकत्व सुधारणा कायदा
आणि
राष्ट्रीय
लोकसंख्या नोंदणी कायद्याविरोधातल्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद
आणि
** न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा सुपरओव्हरमध्ये विजय; पाच सामन्याची मालिकाही जिंकली
****
सरपंचांची निवड थेट जनतेतून न करता, निवडून आलेल्या सदस्यांमधूनच करण्याच्या निर्णयावर राज्य
मंत्रिमंडळानं काल शिक्कामोर्तब केलं. यासाठी संबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्याकरता अध्यादेश
काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर महाराष्ट्र ग्रामपंचायत
अधिनियमामधल्या काही कलमांमध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
या निर्णयामुळे
सरपंच आणि सदस्य यांच्यामध्ये सुसंवाद वाढून ग्रामपंचायतींचं कामकाज अधिक सुलभ आणि
गतिमान होईल, अशी
प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
सध्या सुरु
असलेल्या सरपंचांच्या थेट निवडीच्या पद्धतीमुळे त्याचा विपरीत परिणाम गावाच्या
विकास कामावर झाल्याचं दिसून येत असून. सरपंच एका विचाराचे आणि सदस्य दुसऱ्या विचाराचे असे चित्र अनेक
ग्रामपंचायतींमध्ये दिसत असल्याचं मुश्रीफ म्हणाले. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय
घेण्यात आल्याचं ते म्हणाले. विद्यापीठ आणि महाविद्यालयातल्या पीएच डी धारक प्राध्यापकांना
१ जानेवारी १९९६ पासून दोन आगाऊ वेतनवाढी देण्यासही मंत्रीमंडळानं काल मान्यता दिली.
दरम्यान, थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया रद्द
करण्याच्या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा, असं सरपंच परिषदेचे
अध्यक्ष दत्ता काकडे यांनी म्हटलं आहे. थेट जनतेतून सरपंच निवडीचा
निर्णय राज्य सरकारनं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयाविरोधात
सरपंच परिषदेनं काल अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव इथं तहसील कार्यालयावर मोर्चा काढला,
त्यानंतर काकडे बोलत होते. यासंदर्भात राज्य पातळीवर
एक समिती नियुक्त करून अभ्यास करावा, जनमत घ्यावं, असं काकडे यांनी म्हटलं आहे. निर्णय रद्द न केल्यास,
राज्यभरात तीव्र आंदोलनाचा इशारा काकडे यांनी दिला आहे
****
गर्भपातासाठीची मुदत
पाच महिन्यावरून सहा महिने करण्याची तरतूद असलेल्या सुधारित वैद्यकीय गर्भधारणा निरस्तीकरण
-मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी विधेयक २०२० या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळानं काल
मंजुरी दिली. हे नवे विधेयक येत्या संसदेच्या अधिवेशनात मांडले जाणार आहे. यामध्ये
गर्भपातासाठीची मुदत २० आठवड्यांवरून वाढवत २४ आठवडे करण्यात आली आहे. यामुळे देशातल्या
माता मृत्यूदरात घट होण्यास मदत मदत होणार आहे, असं मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती
देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना राज्य शासनाचा
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि ५ लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप असून सांस्कृतिक कार्य मंत्री
अमित देशमुख यांच्या हस्ते उद्या मुंबईत उषा खन्ना यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात
येणार आहे. पुरुष संगीतकारांचं वर्चस्व असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीत
संगीत दिग्दर्शक म्हणून यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या उषा खन्ना यांनी बिन फेरे हम तेरे,
लाल बंगला, सबक, हवस,
हम हिंदुस्थानी, आप तो ऐसे ना थे, साजन बिना सुहागन, साजन की सहेली, अनोखा बंधन, शबनम, सौतन,
आओ प्यार करे यासारख्या अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा तसंच राष्ट्रीय
लोकसंख्या नोंदणी या कायद्यांना विरोध करण्यासाठी
बहुजन क्रांती मोर्चा, काही
कामगार संघटना तसंच सामाजिक संघटनांच्या वतीनं पुकारलेल्या भारत बंद ला काल राज्यभरात संमिश्र
प्रतिसाद मिळाला.
औरंगाबाद शहरातल्या काही भागांमध्ये दुकाने बंद
करण्यासाठी फिरत असलेल्या जमावाला व्यापाऱ्यांनी विरोध केला असता काही काळ तणाव निर्माण
झाला होता. जिल्ह्यातल्या
खुलताबाद शहरातला आठवडी बाजार भरला नाही, अजिंठा चौफुली इथं मोर्चा
काढण्यात आला. तर, सिल्लोड, बिडकीन, करमाड, शेकटा परिसरात बंदला
समिश्र प्रतिसाद मिळाला.
नांदेड शहरातल्या
व्यापाऱ्यांनी बंद पाळण्यास नकार देत आपली व्यावसायिक प्रतिष्ठानं सुरू ठेवली. हिंगोलीतही किरकोळ दुकानं बंद होती,
मात्र त्याचा बाजारपेठेवर परिणाम जाणवला नाही. परभणी जिल्ह्यात सेलू गंगाखेड तालुक्यात बंदला काहीही प्रतिसाद मिळाला नाही,
उर्वरित जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. लातूर इथंही बंदला प्रतिसाद दिसून आला नसल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
यवतमाळ तसंच धुळे
शहरात मात्र बंदला हिंसक वळण लागलं, धुळ्यात आंदोलकांनी अनेक वाहनांवर दगडफेक केली तर काही वाहनं पेटवून दिली.
यवतमाळ इथं आंदोलकांनी दगडफेक केल्यामुळे वातावरण
चिघळलं, व्यापारी आणि आंदोलक
आमने सामने आल्याने दोन्ही गटात वाद झाला. पोलिसांना लाठीमार
करून, परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
सांगली जिल्ह्यात मिरज इथही बंदला हिंसक वळण
लागलं. आंदोलकांनी ऑटो रिक्षांच्या काचा
फोडून रिक्षा वाहतूक बंद पाडली. वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांपैकीकी दोघांना पोलिसांनी
ताब्यात घेतलं आहे.
कोल्हापूर, सातारा, नाशिक तसंच ठाणे जिल्ह्यातही बंदला
फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र उपनगरी रेल्वेसेवा काही अंशी
विस्कळीत झाली. मुंबईत कांजूरमार्ग इथं रेल्वेमार्गावर आंदोलन
करणाऱ्या सुमारे शंभर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
लातूर इथं कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी
आंदोलन मागे घेऊन नियमित वर्गांना सुरुवात केल्यावरच सर्व समस्या सोडवल्या जातील, असं वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ अशोक ढवण यांनी स्पष्ट
सांगितलं आहे. कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बदली करावी
या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थी विद्यार्थिनींनी
ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. काल कुलगुरु डॉ ढवण यांनी लातूर
इथं विद्यार्थ्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेतल्यावर समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं.
मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी
सांगितलं आहे.
****
औरंगाबाद इथं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
उपस्थितीत जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ चं नियोजन करण्यासाठी राज्यस्तरीय बैठक होणार आहे. मराठवाड्यातल्या
सर्व जिल्ह्यांचा सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा
या बैठकीत अंतिम केला जाईल. संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, अन्य लोकप्रतिनिधी
तसंच प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील.
****
बीड इथं काल नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय
लोकसंख्या नोंदणी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलतांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संविधानानं देश चालवण्याच
आवाहन केलं ज्यामुळं देशातल्या सर्व सामान्य नागरिकांना सन्मानानं जगता येईल असं मत
व्यक्त केलं. आंदोलनाच्या अध्यक्ष स्थानी माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील हे होते.
****
न्यूझीलंड इथं झालेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी
सामन्यात भारतानं सुपरओव्हर जिंकून विजय पटकावला. काल झालेल्या
या सामन्यात भारतीय संघानं केलेल्या एकशे एकोणऐंशी धावांशी न्यूझीलंडच्या संघानं बरोबरी केली. त्यामुळे सुपर
ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने सतरा धावा
केल्या, रोहित शर्माच्या दोन षटकारांच्या बळावर भारतानं अठरा
धावा करून, सुपर ओव्हर आणि सामनाही जिंकला. पाच सामन्यांच्या या मालिकेत तीन सामने जिंकून भारतानं मालिकेत विजयी आघाडी
घेतली आहे. मालिकेतला पुढचा सामना उद्या वेलिंग्टन इथं होणार
आहे.
****
महाविद्यालयीन शिक्षणात गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच
कौशल्य विकास प्रशिक्षणाचा अंतर्भाव केल्यास शहराकडे धाव घेणारे विद्यार्थ्यांचे लोंढे
थांबतील, असं राष्ट्रीय उच्चतर
शिक्षा अभियान - ‘रुसा’चे ज्येष्ठ सल्लागार
डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं नारायणराव वाघमारे महाविद्यालयात डॉ.
पाब्रेकर यांच्या हस्ते आज पदवी प्रदान समारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागातली गुणवत्ता तंत्रशुद्ध
पद्धतीने विकसित होण्यावर डॉ पाब्रेकर यांनी यावेळी भर दिला.
****
ग्रंथालय चळवळ तसंच शिक्षण क्षेत्रातले ज्येष्ठ
कार्यकर्ते अनंतराव चाटे यांचं काल बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं निधन झालं, ते ६६ वर्षांचे
होते. गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेले चाटे यांच्यावर
अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार
सुरू होते, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं, त्यांच्या पार्थिव देहावर वरवटी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
वाळूनं भरलेला हायवा
ट्रक सोडण्यासाठी एक लाख
रूपयांची लाच घेताना गेवराईचे नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडेसह
खाजगी व्यक्ती माजीद शेखला लाचलुचपत प्रतिबंधक
विभागानं काल रंगेहाथ पकडलं. गेवराई पोलिस
ठाण्यात लोखंडे आणि माजीद शेख विरूध्द गुन्हा
नोंदवण्यात आला आहे.
****
नाशिक जिल्ह्यात
देवळानजिकच्या अपघातातल्या
मृतांची संख्या २६ झाली आहे. बस आणि ॲपे रिक्षामध्ये टक्कर
झाल्यानंतर ही दोन्ही वाहने एका विहिरीत पडली होती. या
दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दुःख
व्यक्त केलं आहे. मानवी चुका तसंच
तांत्रिक दोषांमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचे होणारे अपघात रोखण्यासाठी लवकरच आवश्यक त्या सुधारणा करण्यात येईल असं आश्वासन परिवहन मंत्री अनिल
परब यांनी काल मालेगाव इथं वार्ताहरांशी बोलताना दिलं. अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना
दहा लाख आणि रिक्षामधल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी
दोन लाख रुपये खास बाब म्हणून मदत देण्याची घोषणाही परब यांनी यावेळी केली.
****
No comments:
Post a Comment