Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 24 January 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जानेवारी २०२० सायंकाळी ६.००
****
नागरिकत्व सुधारणा कायदा
आणि ढासळत्या आर्थिक व्यवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीनं आज पुकारलेल्या बंद दरम्यान
काही ठिकाणी दगडफेक झाली. मुंबईत दगडफेकीत
एक बसचालक जखमी झाल्याचं तसंच बहुतांश ठिकाणी जनजीवन सुरळित होतं, असं अधिकाऱ्यांनी
स्पष्ट केलं आहे. हा बंद यशस्वी झाल्याचं आघाडीचे नेते विधिज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी
म्हटलं आहे. बंदच्या काळात जोर जबरदस्तीनं जनजीवन बंद पाडण्यात आलेलं नाही तसंच शांततापूर्ण
बंद पुकारण्यात आला होता, असं त्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. या बंदमुळे
कार्यालयातील उपस्थिती तुरळक होती तसंच व्यापारी दुकानंही बंद होती, असंही त्यांनी
यावेळी सांगितलं. देशात पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर असल्याचा मनसे अध्यक्ष राज
ठाकरे यांचा आरोप निराधार असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. राज यांनी घुसखोरांचे
आकडे आणि पुरावे सादर करावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. येत्या नऊ फेब्रुवारीचा
मनसेचा प्रस्तावित मोर्चा हा केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी
केला आहे.
****
वंचित बहुजन आघाडीच्या
आजच्या बंद दरम्यान परभणी जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली होती. औरंगाबादमध्ये
महापालिकेच्या शहर वाहतूक बसवर तसंच परिवहन महामंडळाच्या बसवर पैठण मार्गावर दगडफेक
करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील भोकर इथंही बंद पाळण्यात आला. अमरावती शहरात बंददरम्यान
दुकानांवर दगडफेक करणाऱ्या सुमारे चाळीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
यवतमाळ इथं मात्र व्यापाऱ्यांनी बंदला विरोध केला आणि व्यवहार सुरू ठेवले.
****
भाजपच्या नेतृत्त्वाखालील
राज्यातील सरकारच्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस
आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे दूरध्वनी `टॅप` केले जात होते तसंच या प्रकरणी चौकशीचे
आदेश देण्यात आल्याचं गृहमंत्री अऩिल देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यावेळी विरोधी पक्षांत
असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे दूरध्वनी `टॅप` करण्यासाठी
तत्कालीन सरकारनं काही अधिकाऱ्यांना आवश्यक प्रणाली खरेदी करायला इस्त्रायलला पाठवलं
होतं, असा आरोप असल्याचंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, पुर्वीच्या सरकारनं असं का
केलं, याची चौकशी झाली पाहिजे असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज म्हटलं
आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून दूरध्वनी
`टॅप` करणं ही राज्याची संस्कृती नसल्याचं नमूद केलं आहे.
****
प्रजासत्ताक दिनी सुरु
होणाऱ्या शिवभोजन योजनेचा लाभ देताना स्वच्छता आणि शुद्ध जेवणाकडे लक्ष ठेवण्याचे तसंच
जनतेच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून गरीब आणि गरजू लोकांनाच शिवभोजनाचा लाभ देण्याचे
निर्देश अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
मंत्रालयात आज सर्व पुरवठा उपायुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या
समवेत शिवभोजन योजनेच्या तयारीचा आढावा दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे घेण्यात आला,
त्यावेळी ते बोलत होते.
****
कृषी प्रदर्शनातून आधुनिक
तंत्रज्ञानाची माहिती मिळते त्यामुळे शेतकऱ्याला शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं,
असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी
केलं आहे. त्यांनी आज अकोले तालुक्यात कळस इथं चार दिवसांच्या कृषी प्रदर्शनाचं उद्धाटन
केलं, त्यावेळी ते बोलत होते.
****
जालना इथं आज सार्वजनिक
आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची
बैठक झाली. जिल्हा वार्षिक योजनेतून वर्ष २०२०-२१ मध्ये करावयाच्या विविध विकास कामांसाठी
२५७ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्याला नियोजन समितीनं यात मान्यता
दिली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन
ठेवून काम करण्याचं आवाहन मंत्री टोपे यांनी यावेळी केलं.
****
जालना इथं जैन गुरु गणेशलाल
महाराज यांच्या ५८व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हजारो भाविकांनी गुरु गणेश तपोधान
इथं महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं होतं.
****
भारतानं न्यूझीलंडविरुद्ध
ऑकलंड इथं झालेल्या पहिल्या टीट्वेंटी सामन्यात सहा गडी आणि सहा चेंडू शिल्लक असताना
दिमाखदार विजय नोंदवला.
****
No comments:
Post a Comment