आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०३ जानेवारी २०२० सकाळी
११.०० वाजता
****
बंगळुरु इथं आयोजित एकशे साताव्या इंडियन सायन्स काँग्रेसचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. बंगळुरु इथल्या कृषी विज्ञान
विद्यापीठात होत असलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, कर्नाटकचे मुख्यमंत्री
येडियुरप्पा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. 'विज्ञान तंत्रज्ञानः ग्रामीण विकास'
हा यंदाच्या परिषदेचा विषय आहे. पाच दिवस चालणाऱ्या या परिषदेत नोबेल पारितोषिक विजेते,
शास्त्रज्ञ, विचारवंत, शिक्षणतज्ञ, धोरणकर्ते, संशोधक, विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या
प्रतिनिधींसह सुमारे १५ हजार व्यक्ती सहभागी होत आहेत. विविध विषयांवरची २८ चर्चासत्र
या परिषदेत आयोजित होणार आहेत.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज राजस्थानातल्या जोधपूर
इथं नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय
नागरिक नोंदणी पुस्तिकेविषयी जनजागृती अभियानाला प्रारंभ करणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या
वतीने हे राष्ट्रीय अभियान आयोजित करण्यात आलं आहे. यावेळी काढण्यात येणाऱ्या नागरिकत्व
सुधारणा कायद्याच्या समर्थन फेरीलाही अमित शाह संबोधित करणार आहेत. जोधपूरमध्ये पाकिस्तानातून
आलेल्या आणि भारताचं नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या निर्वासितांची संख्या लक्षणीय
आहे.
****
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई
फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्तानं
शैक्षणिक संस्थांसह, विविध सामाजिक संस्था संघटनांकडून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात
येत आहे.
****
रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी
आणि त्यांना माहिती देण्यासाठी असलेल्या रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकांचं रेल्वेनं
१३९ या एकाच क्रमांकात एकत्रीकरण केलं आहे. सध्याच्या सर्व हेल्पलाईन क्रमांकांच्या
जागी १३९ हा नवा क्रमांक कार्यरत होईल. प्रवाशांना हा क्रमांक लक्षात ठेवणं सोयीचं
होईल आणि प्रवासादरम्यान त्यांच्या कोणत्याही गरजांसाठी ते रेल्वेशी संपर्क साधू शकतील.
या क्रमांकावर १२ भाषातून माहिती उपलब्ध असेल. कोणत्याही मोबाईल फोनवरून या क्रमांकावर
फोन करता येणार आहे.
****
No comments:
Post a Comment