Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 06 January 2020
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०६ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर; अजित पवार अर्थमंत्री तर अनिल देशमुख यांच्याकडे
गृह खातं
** अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक उपक्रम वगळून सार्वजनिक
बांधकाम, राजेश टोपे - आरोग्य आणि कुटुंब कल्याण, अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण, संदिपान
भुमरे - रोजगार हमी तर धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालय
** आज दर्पण दिन; विभागात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि
** न्यायदान व्यवस्था समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्याची
आवश्यकता न्यायमूर्ती पी.बी.वराळे यांच्याकडून व्यक्त
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित केलेल्या मंत्रिमंडळाच्या
खातेवाटपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल मंजुरी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री
कार्यालयानं मंत्रिनिहाय खातेवाटपाची यादी ट्वीटरवरून जाहीर केली. या यादीनुसार मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्याकडे, सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती आणि जनसंपर्क,
विधी आणि न्याय, तसंच इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय आणि खात्यांची
जबाबदारी राहणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन,
अनिल देशमुख - गृह, सुभाष देसाई - उद्योग आणि खनिकर्म, तसंच मराठी भाषा, छगन भुजबळ
- अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, दिलीप
वळसे- पाटील - कामगार, राज्य उत्पादन शुल्क, बाळासाहेब थोरात - महसूल, बाळासाहेब पाटील - सहकार, पणन, तर जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा
आणि लाभक्षेत्र विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दादा भुसे - कृषी, नवाब मलिक - अल्पसंख्याक विकास, कौशल्य
विकास आणि उद्योजकता, राजेंद्र शिंगणे - अन्न आणि औषध प्रशासन, हसन मुश्रीफ - ग्राम
विकास, नितीन राऊत - उर्जा, वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण, जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण,
एकनाथ शिंदे - नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), सुनिल केदार - पशुसंवर्धन,
दुग्धविकास, क्रीडा आणि युवक कल्याण, तर विजय वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासवर्ग,
सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग
कल्याण, ही खाती देण्यात आली आहेत.
उदय सामंत यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण, माजी सैनिक
कल्याण, संजय राठोड - वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन, गुलाबराव पाटील -
पाणी पुरवठा आणि स्वच्छता, के. सी. पाडवी - आदिवासी विकास, अनिल परब - परिवहन, संसदीय
कार्य, अस्लम शेख - वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास, यशोमती ठाकूर - महिला
आणि बालविकास, शंकराराव गडाख - मृदा आणि जलसंधारण, तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन,
पर्यावरण, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहेत.
मराठवाड्यातल्या मंत्र्यांपैकी अशोक चव्हाण यांच्याकडे
सार्वजनिक उपक्रम वगळून सार्वजनिक बांधकाम, राजेश टोपे - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब
कल्याण, अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य, संदिपान भुमरे - रोजगार
हमी, फलोत्पादन, तर धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य खाते देण्यात
आले आहे. तर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी
विकास, तसंच विशेष सहाय्य विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
****
राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल पैठणचे शिवसेनेचे
आमदार संदिपान भुमरे यांचा औरंगाबाद जवळ बिडकीन इथं काल भव्य सत्कार करण्यात आला. उदगीरचे
आमदार पर्यावरण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांचं काल लातूर
रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यावर कार्यकर्त्यांनी
जल्लोषात स्वागत केलं. राजेश टोपे तसंच धनंजय मुंडे यांचंही त्यांच्या मतदारसंघांमध्ये
कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केलं.
****
नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा मिळवण्यासाठी भारतीय
जनता पक्षानं कालपासून दहा दिवसांची जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून अनेक केंद्रीय मंत्री आणि
भाजप नेते देशाच्या वेगवेगळ्या भागात घरोघरी जाऊन नागरिकांना कायद्याची माहिती देत
आहेत.
****
मराठवाड्याला साहित्य संस्कृतीचा संपन्न वारसा असल्याचं
मत, ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांनी व्यक्त केलं आहे. कवयित्री अनुराधा पाटील यांना
साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल काल त्यांचा मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं
विशेष सत्कार झाला, त्यावेळी ते बोलत होते.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
दर्पण दिन अर्थात पत्रकार दिन आज राज्यभर साजरा होत आहे.
यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या पुढील वाटचालीत पत्रकार आणि प्रसार
माध्यमांचं योगदान महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सरकार नेहमीच सकारात्मक भूमिका घेईल, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दर्पण दिनाच्या
पूर्वसंध्येला काल विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना दर्पण पुरस्कारानं
सन्मानित करण्यात आलं. यात स्थुलता निवारण तज्ञ डॉ.जगन्नाथ दीक्षित, पत्रकार मकरंद
बांगर, छायाचित्रकार सुनील पाठक, सामाजिक योगदानाबद्दल गॅलक्सी सेवा संस्था, पर्यावरण
क्षेत्रातल्या योगदानासाठी के.डी.देशमुख, शैक्षणिक योगदानकरता बोल्डावाडी इथल्या ज्ञानेश्वर
शिक्षण संस्थेला सन्मानित करण्यात आलं.
नांदेड इथं राज्य मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार काल
प्रदान करण्यात आले. ‘साप्ताहिक मराठी स्वराज्यचे’ संपादक आणि आकाशवाणीचे वार्ताहर
आनंद कल्याणकर यांना रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्कार, खाजगी वृत्त वाहिनीच्या निवेदक वैशाली यादव-सारंग यांना शंकरराव चव्हाण स्मृती
पत्रकारीता पुरस्कार, औरंगाबादचे पत्रकार शोएब खुसरो यांना सुधाकर डोईफोडे पुरस्कारानं
सन्मानित करण्यात आलं.
दर्पण दिनानिमित्त आज औरंगाबाद इथल्या एमजीएम वृत्तपत्रविद्या
आणि जनसंवाद महाविद्यालयात नागरिकत्व कायदे : संभ्रम आणि वास्तव या विषयावर परिसंवाद
होणार आहे.
नांदेड इथं आज “पत्रकारितेसमोरील आव्हानं, पत्रकारांची
जीवनशैली आणि आरोग्याची काळजी” या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
विविध शासकीय योजनांबरोबरच न्यायदान व्यवस्थाही समाजाच्या
शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठाचे न्यायमूर्ती पी.बी.वराळे यांनी म्हटलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं
काल कायदेविषयक, शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा तसंच महाशिबीर घेण्यात आलं, त्यावेळी
ते बोलत होते. जिल्हाधिकारी पी शिवशंकर यावेळी उपस्थित होते. या महाशिबिरात ११० शासकीय
योजनांची माहिती देण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यात विविध विकास कामं वेळेत आणि दर्जेदार
करावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. नांदेड
इथं काल विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
दरम्यान, तेलगंणाचे मुख्यमंत्री के.
चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा करून, बाभळी बंधाऱ्याचा
प्रश्न मार्गी लावणार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. धर्माबाद
इथं चव्हाण यांचा काल जाहीर सत्कार
करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
****
औरंगाबाद शहरातल्या, चिकलठाणा औद्योगिक परिसरातल्या,
कलाग्राम आणि गरवारे क्रीडांगणावर येत्या नऊ ते १२ जानेवारी दरम्यान, अॅडव्हान्टेज
महाराष्ट्र एक्स्पो २०२०, हे औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. मराठवाडा असोसिएशन
ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रिकल्चर, मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे यांनी काल
पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
भारत-श्रीलंकेदरम्यान तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेतला पहिला सामना काल पावसामुळे रद्द झाला. मालिकेतला दुसरा सामना उद्या इंदूर इथं खेळवला जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment