Friday, 3 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 03.01.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 January 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ जानेवारी २०२० दुपारी

****

विकासाच्या मार्गावर देश अग्रेसर व्हावा, यासाठी शास्त्रज्ञांनी नावीन्य, पेटंट, उत्पादन आणि समृद्धी या चतु:सूत्रीवर मार्गक्रमण करावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज बंगळुरु इथं एकशे साताव्या इंडियन सायन्स काँग्रेसचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान, आणि नावीन्यता याचं चित्र बदलण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या यशावरच भारताच्या विकासाचं स्वप्न अवलंबून असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. बंगळुरु इथल्या कृषी विज्ञान विद्यापीठात होत असलेल्या या पाच दिवसीय परिषदेत नोबेल पारितोषिक विजेते, शास्त्रज्ञ, विचारवंत, शिक्षणतज्ञ, धोरणकर्ते, संशोधक, विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींसह सुमारे १५ हजार व्यक्ती सहभागी होत आहेत. विविध विषयांवरची २८ चर्चासत्र या परिषदेत आयोजित होणार आहेत. 'विज्ञान तंत्रज्ञानः ग्रामीण विकास' हा यंदाच्या परिषदेचा विषय आहे.

****

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. सावित्रीबाईंनी त्यांचं जीवन शिक्षण, सामाजिक ऐक्य आणि महिला सशक्तीकरणासाठी अर्पण केलं, सामाजिक जागरुकतेसाठी सावित्रीबाईंनी केलेला संघर्ष समाजासाठी सतत प्रेरक ठरेल, असं पंतप्रधानांनी एका ट्वीट संदेशात म्हटलं आहे.



देशभरात सावित्रीबाईंना आज अभिवादन केलं जात आहे. शैक्षणिक संस्थांमधून आज अभिवादन सभांसह व्याख्यान आदी कार्यक्रमातून सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात कमलेवाडी इथल्या विद्यालयात विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, आदरांजली वाहिली.

****

नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी भारतीय जनता पक्षानं मिस कॉल देण्याकरिता ८८ ६६ २८ ८६ ६२ हा क्रमांक जाहीर केला आहे. येत्या रविवार पासून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं १० दिवसांचं अभियान राबवण्यात येणार असून या अभियानात नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन मिळवण्यासाठी तीन कोटी परिवारांशी संपर्क साधला जाणार आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज राजस्थानातल्या जोधपूर इथं  नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेविषयी जनजागृती अभियानाला प्रारंभ करणार आहेत.

****

राज्य मंत्रिमंडळाचं अद्याप खातेवाटप होऊ न शकणं, हे महाविकास आघाडीचं अपयश असल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मंत्रिमंडळाचा गेल्या सोमवारी विस्तार झाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांच्या एकूण २६ मंत्र्यांनी या वेळी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली, मात्र पाच दिवस उलटून गेल्यानंतरही मंत्र्यांना खातेवाटप झालं नसल्यावरून आठवले यांनी टीका केली आहे.

दरम्यान, खातेवाटपाबाबत काँग्रेस पक्षानं आपली भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्पष्ट केली असल्याचं, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात काल रात्री उशीरा महाविकास आघाडीच्या तीनही नेत्यांमध्ये बैठक झाली, त्यानंतर चव्हाण यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे एकनाथ शिंदे उपस्थित असल्याचं, या बातमीत म्हटलं आहे.

****

मराठी विज्ञान परिषदेचं चौपन्नावं अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन येत्या १८ आणि १९ जानेवारीला रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड इथं होणार आहे. कवी केशवसुत स्मारकात होणार असलेल्या या अधिवेशनाचं अध्यक्षपद होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त संचालक प्राध्यापक हेमचंद्र प्रधान भूषवणार असून कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत. या विषयावरची चर्चासत्रं, आंबा, फणस, काजूच्या उपयुक्ततेविषयीचं व्याख्यान, कवितावाचन, विज्ञान एकांकिकेचं सादरीकरण आदी कार्यक्रम या अधिवेशनात होणार आहेत

****

लाकडाची विनापरवाना साठवणूक करणाऱ्या पाच मिस्त्रींच्या विरोधात कारवाई न करण्यासाठी लाच घेतल्या प्रकरणी अलिबाग जिल्ह्यातल्या वडखळ इथले वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता सूर्यवंशी आणि वनपाल बापू गडदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल रंगेहाथ पकडलं. तक्रारकर्त्याकडे या अधिकाऱ्यांनी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

****


No comments: