Monday, 6 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 06.01.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०६ जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

औरंगाबाद तसंच उर्वरित मराठवाड्यासह राज्यात आणि देशाच्या अनेक भागात थंडीची लाट कायम आहे. उत्तर भारताच्या बहुतांश भागात थंडीची लाट असून हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीरच्या काही भागांमध्ये पुढचे तीन दिवस पाऊस तसंच बर्फवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये कडाक्याची थंडी पडली असून  अनेक ठिकाणी दाट धुकं पसरलं आहे.

****

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सायंकाळी  जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत. गृह मंत्रालयानं जेएनयूमधल्या स्थितीबाबत दिल्ली पोलिसांकडून अहवाल मागवला असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत.

****

दर्पण दिन अर्थात पत्रकार दिन आज राज्यभर साजरा होत आहे. हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दर्पण दिनाच्या पूर्वसंध्येला काल विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना दर्पण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नांदेड इथं राज्य मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार काल प्रदान करण्यात आले.

****

मराठवाड्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या मुलांना दत्तक घेण्यासह पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक  अग्रवाल कुटुंबानं एक झाड लावावं आदी ठराव जालना इथं अग्रवाल समाजाच्या विभागीय अधिवेशन समारोप प्रसंगी काल घेण्यात आले. सुधांशू महाराज तसंच जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा, संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या संमेलनाचा समारोप झाला.

****

नांदेड जिल्ह्यात आज सोळा पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांची निवड करण्यात येत आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील गढाळा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला आज सकाळी लागलेल्या आगीमध्ये शाळेचा संगणक कक्ष जळून खाक झाला. ही आग विद्युत पुरवठ्यातील दोषामुळे लागल्याची माहिती समोर आली आहे.

****

भारत - श्रीलंकेदरम्यान तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना काल पावसामुळे रद्द झाला. मालिकेतला दुसरा सामना उद्या इंदूर इथं खेळला जाणार आहे.

****




No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...