Friday, 3 January 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 03.01.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 January 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ जानेवारी २०२० सायंकाळी ६.००

****

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्तानं सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद इथं विविध सामाजिक संघटना तसंच शैक्षणिक संस्थांमधून सावित्रीबाईंना आदरांजली वाहण्यात आली. शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी औरंगपुरा भागात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
जालना इथं, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आपल्या कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
बीड इथं जिल्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला अत्याचार विरोधी प्रबोधन फेरी काढण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी यावेळी मार्गदर्शन करताना, मोठंमोठी स्वप्ने साकार करण्यासाठी विद्यार्थीनींनी स्वत:ला आत्मनिर्भर होऊन यशस्वी कारकीर्द घडवावी, असं आवाहन केलं.
नांदेड इथं सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्यावतीनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. जिल्ह्यातल्या अनेक शैक्षणिक संस्थांमधून विविध उपक्रमांच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
परभणी इथं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात, सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला शेतकरी मेळावा घेण्यात आला. विविध विषयांवर यावेळी उपस्थित महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं.

विभागात सर्वच ठिकाणी सावित्रीबाईंच्या कार्याचं स्मरण करत, त्यांना अभिवादन करण्यात आलं.

****

धुळे जिल्ह्यातल्या नरडाणा इथं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज जिल्हा परिषद तसंच पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. महायुतीअंतर्गत राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १०५ जागा मिळाल्या, आमच्या भरवधावर लढून जनतेशी बेईमानी करत शिवसेनेनं सरकार स्थापन केलं असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. सत्तास्थापनेनंतर सरसकट कर्जमाफीची घोषणा करुनही अद्याप शेतकऱ्यांना ही मदत दिली नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. अटीशर्तीची कर्जमाफी करुन शिवसेनेनं शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचं ही ते म्हणाले.

****

जळगाव जिल्ह्यातल्या पंधरा पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक आठ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेनं पाच जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन जागा जिंकल्या.

****

औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या विद्यमान अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरल्यानं, निवडणुकीत चुरस निर्माण झाली. भाजप उमेदवारानं माघार घेतल्यानं, काँग्रेसच्या मीना शेळके आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोणगावकर यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समसमान मतं मिळाल्यानंतर वैधानिक पेच निर्माण झाला, त्यामुळे आजची विशेष सभा स्थगित करून, यावर उद्या पुन्हा सभा बोलावून निर्णय घेतला जाणार आहे.

****

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत लढताना वीरमरण आलेले सैनिक संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थिव देहावर आज सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातल्या मुंडे या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सावंत यांना निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

****

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारतीय कृत्रीम अवयव निर्माण निगम आणि जिल्हा परिषद लातूर यांच्या वतीनं लातूर जिल्ह्यातल्या दिव्यांगाना आवश्यक ते कृत्रीम अवयव देण्यासाठी दिव्यांगाच्या तपासणीच्या शिबिराचं जिल्ह्याच्या दहा ही तालुक्यात आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय दिव्यांग संस्थाचे कार्यकारी सदस्य सुरेश पाटील यांच्या हस्ते आज या तपासणी शिबीराना सुरुवात झाली. लातूर महानगर आणि तालुक्यातील दिव्यांगाच्या तपासणीसाठी विविध स्टॉलची उभारणी केली आहे.

****

उस्मानाबाद इथं होत असलेल्या त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विविध कार्यक्रमाची माहिती उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यात पोहोचवण्यासाठी आज उमरगा तालुक्यातल्या अचलबेट इथून साहित्य ज्योत काढण्यात आली. उमरगा शहरातल्या शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना साहित्य संमेलनाची माहिती दिल्यानंतर ही साहित्य ज्योत यात्रा लोहारा मार्गे तुळजापूरकडे मार्गस्थ झाली.

****

तुळजापूर इथं कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास आजपासून प्रारंभ झाला. संभळाच्या कडकडाटात विधीवत घटस्थापना करण्यात आली.

****

No comments: